श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पुरीच्या पुजाऱ्यांनी त्यांना (एका पारशी व्यक्तीशी लग्न केले म्हणून) जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश नाकारला. पद पंतप्रधानाचे आणि व्यक्ती इंदिरा गांधींसारखी, पण त्यांनी परंपरेला आव्हान दिले नाही. रस्त्यावर उभे राहूनच जगन्नाथाचे दर्शन घेतले. तसेही कळसास नमस्कार केला तरी तो देवाला पावतो अशी हिन्दू धर्मातील मान्यता आहेच. विख्यात गायक येसूदास ख्रिश्चन असल्याने केरळातील गुरुवायूर मंदिरात त्याला प्रवेश नाकारला तेव्हा मंदिराच्या कुंपणापलीकडून का होईना त्याने आपली गानसेवा बजावली. पण परंपरेचा अनादर केला नाही. शिखांच्या कोणत्याही गुरुद्वाऱ्यात जायचे तर ‘नंगे सर’ न जाण्याची परंपरा आहे. तिलादेखील आजवर कोणत्याही कथित पुरोगाम्याने आव्हान देण्याची हिंमत दाखविलेली नाही. मग शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीलाही परंपरा मानून तिचा आदर करणे म्हणजे महिलांचा अपमान नव्हे असे विधान पंकजा मुंडे यांनी केले तर त्यांच्यावर स्वत:स पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी इतके तुटून पडायचे कारण काय? सध्या ज्या विषयाची देशभर चर्चा सुरू आहे त्या सहिष्णुता आणि असहिष्णुता यांचा याच संदर्भात विचार करायचा झाला तर इंदिराजी, येसूदास आणि आता पंकजा मुंडे यांनी केलेले वर्तन हेच खरे सहिष्णुतेचे द्योतक ठरत नाही काय? ग्रामीण भागातल्यासारखे बोलायचे तर कोणताही देव कोणत्याही भक्ताला ‘कार्ड पाठवून’ बोलावणे धाडीत नसतो. लोक आपणहून जातात आणि एखाद्या मंदिरात अर्धनग्न जाण्याची किंवा ओलेत्याने जाण्याची परंपरा असेल तर तिचे निमूट पालन करतात. आव्हान देण्याचा प्रयत्न करीत नाहीत. जशी ही एक भूमिका तशीच दुसरी भूमिका म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचे किंवा नाशकातील काळ्या रामाचे दर्शन घेण्यास अवर्णांना मज्जाव करण्याच्या भूमिकेविरुद्ध साने गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन करून तत्कालीन अवर्णांना प्रवेश मिळवून दिला. एरवी सारे भारतीय इंग्रजांच्या रूढीप्रियतेचे आणि परंपरांच्या पालनाचे कौतुक करीत असतात. तसे कौतुक करीत न बसता व्यक्तिगत पातळीवर पंकजा मुंडे आणि त्यांच्याही आधी काहींनी परंपरांचे पालन करण्याचे पत्करले असेल तर त्यांच्या भूमिकेचेही स्वागत करणे हीच खरी सहिष्णुता ठरावयास हवी. पण तसे न होता पंकजा यांना पुरोगामी जे दूषण बहाल करीत आहेत, तेच दूषण श्रीमती गांधींना बहाल करून त्यांनीदेखील अधोगाम्यांचे हात बळकट करण्याची कृती केली असेच म्हणावे लागेल. पंकजांना विरोध करण्यासाठी माध्यमांनी शिर्डीत पोहोचलेल्या हेमामालिनी यांना बोलते केले खरे, पण आपल्या शिर्डी यात्रेत हेमामालिनी यांनी ‘बाबाच्या धुनी’चे दर्शन घेतले वा नाही याचा काही उलगडा केला गेला नाही. कारण तिथे आजही महिलांना मज्जावच आहे.
ही सहिष्णुता नव्हे?
By admin | Updated: December 6, 2015 22:21 IST