उत्तर कोरियाच्या अध्यक्षपदावर आलेला किम जोंग उन हा गुंड प्रवृत्तीचा इसम आहे. आपल्या पदावर तो वंशपरंपरेने आला आहे. देशाला दरिद्री व अर्धपोटी ठेवणारा, त्याला मर्यादित गणवेश धारण करायला लावणारा आणि रात्रीचे अंधारात ठेवणारा हा माणूस कोरियाचे सारे अर्थबळ त्याचे लष्करी व युद्धसामर्थ्य वाढविण्यात खर्ची घालणारा आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह सगळ्या जागतिक संघटनांचे निर्णय आणि अमेरिका व रशियासारख्या महाशक्तींचे आदेश धुडकावून लावून त्याने देशात शक्तीशाली अणुबॉम्ब बनविले आहेत. आताचा त्याचा प्रयत्न त्याची अण्वस्त्रे दूरवर वाहून नेणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे आजचे निर्माते व राखणदार देश अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स व कदाचित चीन हे आहेत. ही क्षेपणास्त्रे सामान्यपणे तीन ते पाच हजार कि.मी.पर्यंत अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. किम उनचा आताचा संकल्प अशी क्षेपणास्त्रे तयार करण्याचा असून त्याचा आरंभ त्याने परवा आपले क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रापर्यंत पोहचवून केला आहे. कोरियाच्या राजधानीतून डागले गेलेले हे क्षेपणास्त्र ५०० कि.मी.चा प्रवास करून जपानच्या समुद्रात उतरले . ते आपल्या समुद्री सीमेचा भंग करू शकले नाही, हे जपानचे सरकार सांगत असले तरी ‘आपण ते अतिशय मोठ्या उंचीवर नेऊन खाली आणले आहे. त्याचा प्रवास मर्यादित राहिला’ असे उत्तर त्याला किम याने दिले. आपण आणखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवून एक दिवस अमेरिकेवर हल्ला करू, असे तो उघडपणे सांगतो. कोणत्याही जागतिक संघटनेचा वा लष्करी मालिकेचा सभासद नसल्याने कोणतेही आंतरराष्ट्रीय निर्बंध मानण्याची किम जोंग उन याची मानसिकता नाही. किमच्या आताच्या हल्ल्याने जपान हादरला आहे. त्या देशाचे पंतप्रधान सिंझो अॅबे हे नेमक्या यावेळी अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वार्तालाप करण्यात गढले होते. मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी व ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा व त्यामागील राजकीय वृत्तीचा निषेध केला. अशा कोणत्याही संकटाच्या वेळी अमेरिका जपानसोबत १०० टक्के उभी राहील, असे आश्वासन ट्रम्प यांनी कॅबे यांना दिले. पुढे जाऊन जपानच्या व दक्षिण कोरियाच्या भूमीवर क्षेपणास्त्रांना अडवू शकणारी यंत्रणा उभी करण्याची घोषणाही अमेरिकेने केली. यातील घटनाक्रम महत्त्वाचा व किम यांचे इरादे उघड करणारा आहे. अॅबे हे अमेरिकेत असताना तर त्यांनी आताचे क्षेपणास्त्र डागलेच; पण त्याआधी अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री मेटिस यांनी पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील अमेरिकेच्या मित्रदेशांना भेट देऊन त्यांना मदतीचे व अभयाचे आश्वासन दिले होते ही बाबही यासंदर्भात महत्त्वाची ठरावी अशी आहे. या दोन्ही घटनांना किम यांनी या क्षेपणास्त्रातून समजेल, असे उत्तर दिले आहे. उत्तर कोरिया, सीरिया आणि इराण ही सध्याच्या जगातील युद्धकेंद्रे आहेत. मात्र त्यातील सीरिया व इराणवर रशिया आणि अमेरिकेचे काहीसे निर्बंध आहेत. उलट कोरिया आणि त्याचे हुकूमशाही सरकार पूर्णपणे अनिर्बंध आहे. अशा अनिर्बंध बेतालांना त्यांच्या देशात भक्तही फार लाभतात. उत्तर कोरियातील दरिद्री व अर्धशिक्षित माणसे किमला देव मानतात. त्याची पूजा बांधतात आणि त्याच्या उद्दाम भाषेची आंधळी प्रशंसाही करताना दिसतात. जगभरच्या सगळ्याच हुकूमशहांना आणि हुकूमशाही प्रवृत्ती असणाऱ्या नेत्यांना असे भगत मिळतात, हे केवळ इतिहासच सांगत नाही तर आताचे वर्तमानही त्या वास्तवाची साक्ष देते. या माणसांना शक्तिपूजा हीच देशभक्ती व धर्मभक्ती वाटते. तिच्यापुढे लोकशाही मूल्यांची वा शांततेची मातब्बरी ते मानत नाहीत. उत्तर कोरियातील हुकूमशहांच्या तीन पिढ्यांनी ही प्रवृत्ती वाढती राहील, याची काळजीही घेतली आहे. या किमने देशाच्या सेनापतिपदावर असलेल्या आपल्या चुलत्याचा स्वत:च गोळ्या घालून खून केला. त्याने आपल्या पत्नीलाही असेच मारले असल्याचे सांगितले जाते. त्याच्या भगतांच्या लेखी मात्र त्याने देशासाठी केलेला तो मोठाच त्याग आहे. अशा भगतांच्या पाठिंब्याच्या व टाळ्यांच्या बळावरच हुकूमशहांची माथी भडकत असतात आणि ती देशाला युद्धाच्या सीमेवर नेऊन पोहचवीत असतात. उत्तर कोरिया हा असा युद्धाच्या सीमेवर आलेला देश आहे आणि जगातली बडी राष्ट्रे त्याला कसा आवर घालतात हे आता बघायचे आहे. एक गोष्ट मात्र विशेष नमूद करण्याजोगी. आपल्या देशवासीयांना उपाशी, अर्धपोटी व अर्धनग्न ठेवून आपले शस्त्रागार वाढविणारे आणि साऱ्या जगाला युद्धाच्या धमक्या देणारे किम जोंग उल हे चीनच्या माओ त्से तुंगानंतरचे आधुनिक जगातले पहिलेच हुकूमशहा आहेत. त्याला जगाचे भय नाही, देशवासीयांची तमा नाही, कायद्याची चाड नाही आणि आपला शब्द साऱ्यांसाठी प्रमाण आहे असे मानणारा हा राज्यकर्ता आहे. त्याच्या देशात त्याचा शब्द प्रमाण आहेच. जगात तो किती काळ व कुठवर चालतो, हा आता साऱ्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. किमच्या युद्धखोरीचा भारतावर कोणताही परिणाम आज होणार नसला, तरी तो साऱ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटू शकतो ही शक्यता मोठी आहे.
युद्धरेषेवर उत्तर कोरिया
By admin | Updated: February 13, 2017 23:39 IST