भले काही काळापुरते का होईना, देवेगौडा जर देशाचे पंतप्रधान आणि मुलायमसिंह यादव देशाचेच संरक्षण मंत्री होऊ शकतात तर मुलायम यांनी पंतप्रधान होण्यास कोणाची काही हरकत असण्याचे कारणच नाही. ते पद मिळविण्यासाठी लोकसभेत किमान आवश्यक डोकी जमविण्याची ज्याची ताकद किंवा पात्रता असेल तो कोणीही पंतप्रधान बनू शकतो. पण या दोन्ही बाबी अजमावून पाहण्याची अजून वेळदेखील आलेली नसताना सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले मुलायमपुत्र अखिलेश यांनी आपले पिताजी ऊर्फ नेताजी यांना पंतप्रधान करायला काँग्रेस पक्ष राजी होणार असेल तर आपण मोठ्या उदार अंत:करणाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उप पंतप्रधानपद देऊ असे म्हटले आहे! उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे आणि तेथून लोकसभेवर जाणाऱ्या सदस्यांची संख्या तब्बल ऐंशी असल्याने पंतप्रधानपदाच्या निवडीत या राज्याची भूमिका बऱ्याचदा निर्णायक ठरत आलेली आहे. परंतु ते राज्य पूर्णत: मुलायम यांच्या समाजवादी पार्टीला कुणी आंदण दिलेले नाही. मायावतींची बसपा, भाजपा आणि काँग्रेस यांचे तिथे सपाला आव्हान असताना बिहारच्या बाबतीत मुलायम यांनी जी भूमिका घेतली ती लक्षात घेता कदाचित संयुक्त जनता दल आणि लालूंचे राजद हेदेखील तिथे आव्हानात्मक भूमिकेत उतरू शकतात. त्यातून लोकसभेच्या निवडणुकीला अजून किमान चाळीस महिने अवकाश आहे. पण आत्तापासूनच आपण काँग्रेसचे सहप्रवासी होण्यास किंवा खरे तर काँग्रेसला आपले सहप्रवासी करून घेण्यास उत्सुक आहोत हे केवळ दाखविण्यासाठी अखिलेश यांनी खेळी खेळली आहे, कारण काँग्रेस-मायावती युती होऊ नये हीच त्यांची आंतरिक इच्छा आहे. तथापि, त्यांच्या या बालीश देकाराला काँग्रेसने मात्र उडवून लावले आहे.
नेताजींची ‘मनशा’
By admin | Updated: December 6, 2015 22:20 IST