विधायक चळवळीत समाज माध्यमे महत्त्वाची भूमिका वठवू शकतात, असा एक समज आहे व तो चुकीचाही नाही. परंतु याच समाजमाध्यमांचा जेव्हा गैरवापर केला जातो तेव्हा ती किती विघातक ठरू शकतात याचे अनेक अनुभव अलीकडच्या काळात आपण घेतले आहेत अन् घेत आहोत. त्यांच्याद्वारे लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. चित्रपट कलावंत सैफ आणि करिना यांनी त्यांच्या नवजात मुलाचे नाव ‘तैमूर’ असे ठेवल्यावर समाजमाध्यमांवर जे मोहोळ उठले, वादविवाद झाला तेवढीच गंभीर चर्चा एखादा राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यासाठी झाली असती तर कदाचित काही लाभही झाला असता. आपल्या मुलाच्या नामकरणाचा मातापित्यांचा हक्कही हिरावून घेण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार होता. तैमूरचा विषय संपत नाही तोच क्रिकेटपटू मोहम्मद शामीला लक्ष्य करण्यात आले. शामीने समाजमाध्यमांवर टाकलेल्या पत्नी व मुलीच्या छायाचित्राने त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला. मुस्लीम असल्याचे स्मरण करून देत आपल्या पत्नीला बुरख्यात ठेव असा अनाहूत सल्ला काही तथाकथित धर्ममार्तंडांनी त्याला देऊन टाकला. अर्थात शामीनेही या उपटसुंभांना सडेतोड उत्तर दिले हे फार चांगले झाले. यापूर्वी टेनिसस्टार सानिया मिर्झालाही समाजमाध्यमांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. एकंदरीतच समाजमाध्यमांच्या या नकारात्मक वापराचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. विशेषत: ही नकारात्मकता आपल्या खासगी आयुष्यासाठी घातक ठरू नये, याची काळजी समाजमाध्यमांवर असणाऱ्यांनीही घेतली पाहिजे. समाजमाध्यमांच्या बाबत आणखी एक वास्तव समोर आले आहे. या माध्यमांचा अतिवापर केल्याने नैराश्याचा विकार जडण्याचा धोका असतो, असे अमेरिकेतील एका संशोधनात निदर्शनास आले आहे. आपण सतत जगाच्या संपर्कात राहिलो नाही तर समाजात मागे पडू, आपल्याकडे कुणी लक्ष देणार नाही, अशी भावना समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर करणाऱ्या तरुणांच्या मनात वाढीस लागली आहे.
नकारात्मक माध्यमे
By admin | Updated: December 30, 2016 02:47 IST