शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

गृहखात्याच्या प्रधान सचिव असलेल्या नीला मॅडमची वाहतूक पोलीस पावती फाडतो तेव्हा...

By राजेंद्र दर्डा | Updated: July 17, 2020 06:45 IST

आपला मुलगा चैतन्य हा स्पेशल चाईल्ड आहे हे माहिती असताना त्यांनी ते कधी लपविले नाही. उलट त्याची काळजी घेताना त्यांनी स्वत:चे आयुष्य त्याच्यासाठी बदलून घेतले होते.

- राजेंद्र दर्डा (एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तपत्र समूह)त्या एकदा मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात स्वत: गाडी चालवत दर्शनासाठी निघाल्या. चुकीच्या ठिकाणी गाडी पार्किंग केली म्हणून वाहतूक पोलिसाने त्यांना दंड लावला. पावती देण्यात आली. तेव्हा आपण कोण आहोत, कोणत्या विभागाच्या सचिव आहोत याची कसलीही ओळख न देता त्यांनी निमूटपणे पावती घेतली. दोन दिवसांनी मंत्रालयात एका बैठकीवेळी त्या मला भेटल्या. मी तेव्हा गृहराज्यमंत्री होतो आणि त्या गृहविभागाच्या प्रधान सचिव..! बैठक झाल्यानंतर त्यांनी मला सगळा प्रसंग सांगितला. पावतीही दाखवली. मी म्हणालो, ‘तुम्ही गृहविभागाच्या सचिव आहात. त्याला सांगितले नाही का तुम्ही?’ त्यावर त्या गालातच हसल्या आणि म्हणाल्या, ‘त्याने त्याचे काम बरोबर केले. मग मी त्याला कशी अडविणार? त्याने पावती दिली. चूक माझी होती. मी पैसे भरले. आपण गृहराज्यमंत्री आहात, आपले पोलीस चांगलं काम करत आहेत हे मला तुम्हाला सांगावं वाटलं...’ असं त्या म्हणाल्या आणि शांतपणे गेल्या. त्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने त्या पोलिसाला बडतर्फ करण्यापर्यंतचा खाक्या दाखविला असता; पण तसं काहीही झालं नाही. त्या होत्या नीला सत्यनारायण..!अभ्यासू व शिस्तप्रिय अधिकारी. गृहविभागात काम करताना माझी त्यांची अनेकवेळा चर्चा होत असे. समोर येणाऱ्या विषयाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यावेळी सरकारमध्ये काही खातेबदल झाले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या सहा महिने आधी मला ऊर्जा विभागाचे राज्यमंत्रिपद दिले. नीला मॅडम गृहविभागातच होत्या. त्यांनी गृहविभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलाविले आणि मला समारंभपूर्वक निरोप दिला. त्यात त्यांनी माझ्यासोबत काम करताना आलेले अनुभव सांगितले. सगळ्यांनी मला पुष्पगुच्छ दिले. असे किती मंत्री असतील, ज्यांना अधिकाऱ्यांनी असा प्रेमाने निरोप दिला असेल. मला ते भाग्य लाभले. तो प्रसंग माझ्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. नीला मॅडम यांचे हेच वेगळेपण होते. आपण उच्चपदस्थ अधिकारी आहोत म्हणजे फार कोणी मोठे आहोत, असे त्यांचे वागणे कधीही नसायचे. साधी राहणी, शांतपणे पण तेवढ्याच ठामपणाने स्वत:चे मत सांगणे ही त्यांची बलस्थानं होती.२००४ ची गोष्ट. राज्यमंत्री असताना महिला दिनाच्या निमित्ताने मी काही महिला अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्याचे ठरविले. प्रशासनात महत्त्वाचे विभाग सांभाळणाऱ्या प्रधान सचिव पदावर कार्य करणाऱ्या त्या सगळ्या रणरागिणी होत्या. त्यात वित्त विभागाच्या चित्कला झुत्शी, विधि व न्याय विभागाच्या प्रतिमा उमरजी, सामान्य प्रशासन विभागाच्या चारुशिला सोहोनी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या चंद्रा अय्यंगार, अल्पबचत व लॉटरीच्या कविता गुप्ता आणि गृहविभाग सांभाळणाऱ्या स्वत: नीला सत्यनारायण यांचा समावेश होता. सत्कारानंतर प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, पुरुष अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळताना अडचणी येत नाहीत; पण आम्हाला जिल्हाधिकारी म्हणून पाठविताना चार वेळा विचार होत होता. आता मी तुमच्या गृहखात्यात सचिव आहे. हळूहळू जुने विचार बदलत आहेत. ही चांगली गोष्ट घडत असल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या. आजही एखाद्या नवीन आयएएस महिला अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग होते, तेव्हा मला सत्यनारायण यांची आवर्जून आठवण येते. त्याच पुढे राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त झाल्या हे विशेष..!आपला मुलगा चैतन्य हा स्पेशल चाईल्ड आहे हे माहिती असताना त्यांनी ते कधी लपविले नाही. उलट त्याची काळजी घेताना त्यांनी स्वत:चे आयुष्य त्याच्यासाठी बदलून घेतले होते. ज्या जिद्दीने त्या चैतन्यसाठी खूप काही करायच्या, ते पाहून मला त्यांचा कायम आदर वाटत आला. चैतन्यशी संवाद साधताना त्या स्वत: लिहित्या झाल्या होत्या. अनुभव कथन, कादंबरी, ललित अशी त्यांनी १३ पुस्तकं लिहिली. ज्या विभागात त्या गेल्या, त्या विभागाला मानवी चेहरा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातून आलेले अनुभव पुस्तकरूपाने आणले. गृहविभागात असताना त्या एकदा नागपूर कारागृहात गेल्या. तेथे एक कैदी त्यांना भेटला. त्याच्याशी त्या बोलल्या. त्यातून त्या कैद्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. त्यातून त्यांना कळाले की, त्या कैद्याला एक मुलगीपण आहे. त्यांनी त्या मुलीला दत्तक घेतले. तिला चांगले शिक्षण दिले. पुढे ती मुलगी वकील झाली आणि या विषयावर ‘बाबांची शाळा’ हा चित्रपटही आला. अधिकाऱ्याने ठरविले तर काय होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. आमच्यात कायम व्हॉटस्अ‍ॅपवरून संवाद होत असे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यातील लेखक अस्वस्थ होता. ४ जुलै रोजी त्यांचा मला मेसेज आला, मी ‘लॉकडाऊन डायरी’ लिहीत आहे. त्यातील रोज एक पान मी तुम्हाला पाठवेन. मी नव्या लिखाणाला शुभेच्छाही दिल्या. ६ जुलै रोजी त्यांनी डायरीचे पहिले पान मला पाठविले. त्यांनी जे लिहिले होते, ते वाचून मी अस्वस्थ झालो होतो. व्हॉटस्अ‍ॅपवरील आमच्या दोघांमधला तो शेवटचा संवाद ठरला...

‘‘जवळ जवळ तीन महिने झाले या लॉकडाऊनला. आधी भाजीपाला मिळायचा. वाण सामानही मिळायचं. आता तेही मिळेनासं झालं. कोणा कोणाला विनंती करून सामान मागवलं. दूर जायचं म्हटलं तर गाडी हवी, बस तर बंदच आहे. रस्त्यात पोलिसांची भीती. ते आपला अपमान करतील, गाडी जप्त करतील याची धास्ती. घरात एक मतिमंद मुलगा. तो सैरभैर झालेला. त्याला कळत नाही की आजूबाजूला काय चाललं आहे, का चाललं आहे. त्याला रोज फिरून यायची सवय आहे. ती त्याची गरज आहे. त्याला मी समजावू शकत नाही. मला फार हताश वाटतं. आपण एकमेकांशी बोलतो. मित्रांना फोन करतो. त्याने काय करायचं? त्याची घुसमट कोणाला समजणार आहे ?’’बारा-तेरा ओळींत त्यांनी किती मोठा अनुभव मांडला होता, ज्याचे उत्तर कोणाकडेही नाही. लॉकडाऊनमुळे अवघ्या जगाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. संयम संपत आलाय. त्यात त्यांच्यासारख्यांनी आपण गृहविभागाच्या प्रधान सचिव होतो, राज्याच्या निवडणूक आयुक्त होतो, आपल्याला कोण अडविणार? असे म्हणून पडायचे ठरविले असते, तर त्या जाऊ शकल्या असत्या; पण नियमाच्या पलीकडे न जाणाऱ्या नीला मॅडमनी हा नियम पाळला आणि आपल्या भावनांना शब्दरुप दिले होेती. आज त्यांच्या जाण्याने एक उत्तम संवेदनशील अधिकारी आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र