शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय आचारसंहितेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:07 IST

देशात सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याची पहिली जबाबदारी सरकारची आहे.

देशात सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्याची पहिली जबाबदारी सरकारची आहे. त्यातून ज्या देशात २० टक्क्यांहून अधिक (सुमारे २६ कोटी) अल्पसंख्य त्यांच्या धार्मिक व सामाजिक चालीरीती आणि संस्कार सांभाळून जगत असतील त्या देशातील सरकारची ही जबाबदारी आणखी मोठी होते. सरकारच्या उपक्रमांनी व पुढाकारांनी प्रतिसाद देण्याचे व सामाजिक सलोखा राखण्याचे उत्तरदायित्व अल्पसंख्याक वर्गांवरही येतच असते. दुर्दैवाने भारतात सरकार याबाबतीत उदासीन व त्याला पाठिंबा देणाऱ्या संघटना आक्रमक व बेछूट आहे आणि त्याचमुळे अल्पसंख्याकांचे वर्गही सरकारी प्रयत्नांकडे अविश्वासाने पाहू लागले आहेत. ही स्थिती समाजात सलोखा निर्माण करणारी नाही. स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली. देशात धर्मनिरपेक्ष व धर्मवादी अशी सारी सरकारे आली. त्यांच्यातील काहींनी या दिशेने प्रामाणिक प्रयत्नही केले. पण देशातील काही संघटनांना व राजकीय संस्थांना समाजातील धार्मिक तेढ हीच त्यांची शक्ती व काही पक्षांना तीच त्यांची राजकीय गुंतवणूक वाटत आली ही या संदर्भातली सर्वात मोठी अडचण आहे. या संघटनांचे प्रवक्ते सरकारात आहेत, मीडियात आहेत आणि समाजातही आहेत. त्यांच्या वक्तव्यांचे बेफामपणे आणि प्रसंगी त्यातून प्रगटणारे नीचपण पाहिले की सलोखा हे आपले स्वप्नच राहील की काय अशी शंका येऊ लागते. गौरी लंकेश या पत्रकार महिलेच्या कर्नाटकात झालेल्या हत्येवर प्रतिक्रिया देताना राम सेनेच्या अध्यक्षपदी बसलेला कुठलासा इसम म्हणाला ‘कर्नाटकात एका कुत्रीची हत्या झाली तर त्यावर पंतप्रधान आणि देशाने एवढे विचलित होण्याचे कारणच कोणते आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे हा आग्रह तरी कशासाठी’. हा इसम हे वाक्य एका पाश्चात्त्य वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बरळला ही बाब लक्षात घेतली की त्याचे व त्याला मानणाºया त्याच्या अनुयायांचे बेजबाबदारपण आणखीच संतापजनक वाटू लागते. मुसलमानांच्या वर्गाला पाकिस्तान, पंचमस्तंभी, देशविरोधी व हिंदू म्हणून वेगळे करण्याचे व समाजात एक मोठी दुही उभी करून तिच्यावर आपल्या राजकारणाची भविते मांडणारे वर्ग मोठे आहेत. दुर्दैवाने सरकारही त्यांच्या छायेखाली वावरणारे आहे. दलितांबाबतची उदासीनता, स्त्रियांबाबतची अनास्था आणि दूरस्थ प्रदेशांविषयीचे अज्ञान या आणखीही काही बाबी आताच्या अविश्वसनीय व अशांत वाटाव्या अशा स्थितीत भर घालणाºया आहेत. शेजारचे देश या साºयांचा फायदा घ्यायला टपले असताना आपल्या जिभांना व लेखण्यांना जरा आवर घालावा एवढे साधे शहाणपण ज्या राजकारणात नसते ते देशकारण कसे करू शकेल? याच दुहीकरणापायी एकेकाळी दक्षिणेत द्रविडीस्तान, पूर्वेत स्वतंत्र बंगालची आणि पंजाबात खलिस्तानची चळवळ उभी राहिली. काश्मिरात तर ती गेली ७१ वर्षे सुरू आहे. घटना आहे, सरकारे आहेत आणि कायदेही आहेत. मात्र त्यांना जनतेचे एकमुखी पाठबळ मिळत नाही तोवर या सगळ्या गोष्टी कागदावर राहणार आहेत. ऐक्यावाचून विकास नाही आणि विकासावाचून ऐक्य नाही. हे सूत्र एवढी वर्षे होऊनही स्वत:ला राष्ट्रीय म्हणविणाºया संघटना लक्षात घेत नसतील तर ते आपल्या साºयांचे दुर्दैव आहे. देशात बहुसंख्याकवादाला धारदार बनविणाºया दोन संघटनांना नुकतेच जगाने दहशतखोर ठरविले आहे. त्यांच्याहूनही अधिक कडव्या संघटनांची देशातील संख्या मोठी आहे. त्यात बहुसंख्याकांच्या संघटनांएवढ्याच अल्पसंख्याकांच्याही संघटना आहेत. ज्यात संवाद नसतो तो समाजही नसतो आणि ज्यात समाज नसेल तो देश संघटितही होऊ शकत नाही. दुर्दैव याचे की यातील उठवळांना आवरायला सरकारसकट कुणीही पुढे येत नाही. उलट त्यांना वारा घालणारी माध्यमे आणि त्यावरचे वाचाळच येथे अधिक सक्रिय आहेत. केंद्र व राज्यातील सरकारांसोबत देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एका समन्वयी सामाजिक आचारसंहितेची निर्मिती करणे ही आताची गरज आहे. निवडणुकीचे आव्हान समोर असले तरी ती गंभीरपणे लक्षात घेऊन तयार केली जाणे हे या काळाचे मागणे आहे.