भारत हा नुसताच एक देश की ते एक राष्ट्रदेखील आहे, असा प्रश्न अधूनमधून डोके वर काढीत असतो. अशी शंका उपस्थित होण्याला बहुतेक वेळा कारणीभूत ठरत असते, ते ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान आणि ‘जन गण मन अधिनायक’ हे राष्ट्रगीत. सार्वजनिक स्तरावर या दोहोंचे गायन अनिवार्य केले जावे असा काहींचा आग्रह असतो तर या दोन्ही कवनांमधील अर्थ आणि भावार्थ आमच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात असल्याने त्याला आमचा विरोध असल्याची देशातील काही मुस्लिसांची भूमिका. अधूनमधून असे वाद न्यायालयातही दाखल होत असतात. राष्ट्रगान किंवा राष्ट्रगीत उच्चारणे हेच केवळ देशभक्ती वा राष्ट्रभक्तीचे एकमात्र गमक नाही, असे निर्वाळेही मग न्यायालयांनी दिले आहेत. तरीही अधूनमधून वाद निर्माण होतच असतो, जसा तो आता उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या एका कॉन्व्हेन्ट स्कूलच्या व्यवस्थापकाच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. झिया-उल-हक नावाच्या या व्यवस्थापकाच्या मते, ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतामधील ‘भारत भाग्यविधाता’ ही संकल्पना आमच्या धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे. त्याचे साधे कारण म्हणजे आमचा भाग्यविधाता परमेश्वर म्हणजे अल्ला आहे, देश कसा काय भाग्यविधाता असू शकतो? अर्थात ती या हक महोदयांची व्यक्तिगत भूमिका झाली. तिचा आदरच केला पाहिजे. पण तसा तो न करता त्यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध तेथील सरकार कारवाई करायला सज्ज झाले आहे. म्हणजे पुन्हा न्यायालयच निवाडा करणार. खरे तर प्रत्येक व्यक्तीचा भाग्यविधाता ती व्यक्ती स्वत:च असते, अशी शिकवण बव्हंशी धर्म देत असतात, पण तोही पुन्हा वादाचाच मुद्दा. पण यातील खरा गंभीर प्रकार पुढेच आहे. अलाहाबादच्या बघारा भागातील एम.ए.कॉन्व्हेन्ट स्कूल नावाची ही शाळा गेल्या तब्बल वीस वर्षांपासून तिथे अस्तित्वात आहे. तिथे शिकवण्याचे काम सुरु होते, विद्यार्थी प्रवेश घेत होते, माध्यमिक शालांत परीक्षांना बसत होते, काही उत्तीर्ण तर काही अनुत्तीर्णही होत होते, थोडक्यात सारे काही व्यवस्थित सुरु होते. पण शाळेचे व्यवस्थापक हक यांनी राष्ट्रगीतातील एका संकल्पनेवरुन त्यांची भूमिका मांडली आणि साऱ्यांचे लक्ष शाळेकडे वेधले गेले. दुसरे कारण म्हणजे हक यांच्या निर्णयाच्या विरोधात त्याच शाळेतील आठ शिक्षकांनी राजीनामे दिले. अर्थात हे शिक्षकदेखील अनधिकृत शाळेचेच सेवेकरी होते. साऱ्यांचे लक्ष वेधले गेल्याने एक महत्वाची माहिती उजेडात आली आणि ती म्हणजे कोणतीही सरकारी परवानगी न घेता दोन दशके ही शाळा खुशाल सुरु होती. या प्रदीर्घ काळात कोणाचेही आणि विशेषत: तथाकथित शिक्षण खात्याचे तिच्याकडे लक्ष जाऊ नये याला काय म्हणणार? आता सरकारने एकीकडे हक यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतानाच दुसरीकडे ही शाळा कायमची बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांची सोय आता अन्य शाळांमध्ये करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. ‘चले थे रोजा बचाने उल्टे नमजा गले पडी’ अशी म्हणच आहे.