शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलढाण्याच्या प्रथमेशचा ‘नेम’.. ग्रामीण जिद्दीला नवी आशा!

By किरण अग्रवाल | Updated: May 24, 2023 07:42 IST

प्रथमेश जावकारने मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जागतिक तिरंदाजीत सुवर्णवेध साधला. अशीच क्षमता ग्रामीण भागातल्या अनेक खेळाडूंकडे आहे..

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

मनगटात रग असली, अडचणींना खांद्यावर घेण्याची हिंमत असली, काही करून दाखविण्याची धमक असली की साधनसंपन्नता नसली तरी त्या जिद्दीच्या बळावर ध्येयाचे शिखर गाठणे अवघड नसते. प्रतिकूलतेवर मात करीत जागतिक तिरंदाजीत विश्वविजेत्यास नमवून सुवर्णपदकावर नाव कोरलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रथमेश जावकार या तरुणाच्या कामगिरीनेही तोच दृष्टांत दिला आहे.

क्रीडाक्षेत्रात, विशेषत: ग्रामीण भागातील मुले चमकदार कामगिरी करून भारताचे नाव उंचावत  असल्याची उदाहरणे कमी नाहीत. भाषेची समस्या, प्रशिक्षण व साधनांची कमतरता अशा अनेक अडचणींवर मात करीत ही मुले सातासमुद्रापार तिरंगा फडकवून येतात. लिंबाराम व मेरी कोम यांचीच नव्हे, आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागातील सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, चांदवडचा रोइंगपटू दत्तू भोकनळ, चाळीसगाव तालुक्यातील बेसबॉलपटू रेखा धनगर, अकोल्याची महिला बॉक्सर साक्षी गायधनी, अशी अनेक नावे यासंदर्भात घेता येतील; ज्यांनी ग्रामीण भागातून येत आपल्या यशाचा डंका वाजविला. नांदुरा तालुक्यातील अलमपूर या अतिशय छोट्याशा गावचा प्रथमेश हा त्यातलाच एक; ज्याने आत्मविश्वास व मेहनतीच्या बळावर जागतिक स्पर्धेवर आपले नाव कोरले. वडील प्रारंभी ‘एमआर’, म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी होते. चार एकरची कोरडवाहू शेती. कमाई ती कितीशी असणार? पण तरी या पित्याने पोटाला चिमटा घेत आपल्या पोराच्या गुणांना, मेहनतीला प्रोत्साहन दिले आणि या पोरानेही थेट विश्वविजेत्या नेदरलँडमधील माइक श्लोसरवर विजय मिळवीत जागतिक तिरंदाजीत सुवर्ण पटकावले.

ग्रामीण भागातून पुढे आलेला व जागतिक पातळीवर चमकलेला प्रथमेश हा काही पहिलाच खेळाडू नाही. अनेकांच्या अशा धडपडीच्या यशोकथा आहेत. प्रश्न एवढाच आहे की, शहरी झगमगाटापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील या अशा हिऱ्यांना जोखणारा जव्हेरी कसा लाभेल? ग्रामीण भागातील खेळाडूंचे सोडा,  शहरातील खेळाडूंनाही गॉडफादर लाभल्याखेरीज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारणे कठीण होऊन बसते. अशा वेळी ग्रामीण भागातील खेळाडूंची मेहनत व त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे.आदिवासी वाडे-पाड्यांवरील दगड-धोंड्यात सराव करणाऱ्या खेळाडूंची नैसर्गिक क्षमता हेरून त्यांना योग्य त्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, अन्यथा गुणवत्ता असूनही ही मुले मुंबईदेखील गाठू शकत नाहीत. जिल्हा व राज्यस्तरापर्यंत ही मुले कशी तरी धडपडत येतात, पण योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाअभावी ते तिथेच अडकून पडतात. धावपटू कविता राऊतला ज्याप्रमाणे विजेंद्रसिंह व तिरंदाज प्रथमेश जावकारला चंद्रकांत इलग यांच्यासारखे प्रशिक्षक लाभले, तसे सर्वांना लाभतील का, हा खरा प्रश्न आहे. 

आपल्याकडे क्रिकेटला जेवढे ग्लॅमर आहे, तेवढे अन्य खेळांना नाही ही वास्तविकता आहे. क्रिकेट संघटनांकडून खेळातील व्यावसायिकता जपली जाते. अन्य क्रीडा प्रकारांच्या संघटनांकडून ते होताना दिसत नाही. आपल्याकडे अनेक शहरांत क्रीडांगणे व हॉल आहेत. मात्र, तेथे क्रीडा सरावांपेक्षा लग्न सोहळेच अधिक उरकले जाताना दिसून येतात.  खेळांकडे करिअर म्हणून फारसे पाहिले जात नाही, त्यामुळे ही अनास्था दिसून येते.  क्रीडा नैपुण्यासाठी प्रशिक्षण हा भाग महत्त्वाचा आहेच; परंतु त्यासोबतच क्रीडा विज्ञानाचा विचार होणेही गरजेचे आहे. दुर्दैवाने आपल्याकडे त्याचा अभाव आहे. खेळाडूंचा आहार, औषधोपचार, मानसोपचार यासारख्या बाबी तर कोणाच्या खिजगिणतीतही नाहीत. खेळ व खेळाडूंच्या चहूमुखी विकासासाठी सर्वंकष पातळीवर प्रयत्नांची अपेक्षा आहे. आगामी आशियाई स्पर्धा व  ऑलिम्पिकची तयारी आतापासून करताना ग्रामीण भागातून पुढे आलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले तर पदक तालिकेतील आपला नंबर नक्कीच वाढू शकेल हे जावकारच्या उदाहरणाने स्पष्ट झाले आहे.    kiran.agrawal@lokmat.com