कोणी काय खावे, काय खाऊ नये यावर कोणाचेही निर्बंध असता कामा नयेत़ कोठे काय खावे हाही प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे़ मल्टिप्लेक्स संस्कृतीला मात्र हे मान्य दिसत नाही़ पाश्चिमात्य संस्कृतीमागे धावताना त्याचा भाग असलेल्या मल्टिप्लेक्सचे आपण भरभरून स्वागत केले़ मात्र त्याबरोबर येणारे दोषही तसेच स्वीकारले़ तिथलेच खाद्यपदार्थ आणि ते ठेवतील तेच खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती प्रेक्षकांवर केली गेली़ त्यांचे दरही इतके प्रचंड की चित्रपटाचे दर कमी आणि पॉपकॉर्नचे दर जास्त अशी स्थिती. मल्टिप्लेक्सची ही मनमानी सर्वांच्याच लक्षात आली असून या मनमानीला सरकारचे छुपे पाठबळ तर नाही ना, अशीही शंका निर्माण होत आहे़ तेथील दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत़ याविरोधात एका राजकीय पक्षाने आंदोलन केल्यानंतर सत्ताधाऱ्यांना जाग आली आणि मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास निर्बंध नाहीत, असे सरकारने जाहीर केले़ सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यामुळे दिलासा मिळाला़ मल्टिप्लेक्समधील दर खरोखर कमी केले गेले आहेत का, याचा मागोवा ‘लोकमत’ टीमने मल्टिप्लेक्समध्ये जाऊन घेतला. मात्र सर्व ठिकाणी संभ्रमाची स्थिती होती़ काहींनी आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, असे सांगितले; तर काहींनी आमचे नियमन करणारा कायदाच नाही, असा दावा केला़ त्यानंतर तरी सरकारने जनहितासाठी ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते़ तसे काहीच झाले नाही़ उलट सरकारने मल्टिप्लेक्सचालकांना दिलासा देणारी भूमिका मांडली़ बाहेरील खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेणे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे, असे दाव्यानीशी सांगितले़ उच्च न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र केले़ पण न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य केले नाही़ विमानात बाहेरील खाद्यपदार्थांस मनाई नाही, तर मल्टिप्लेक्समध्ये असे निर्बंध का, असा सवाल केला़ मल्टिप्लेक्सचे काम आहे चित्रपट दाखविणे, त्यांनी प्रेक्षकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू नये, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले़ उद्या ताज हॉटेलमध्येही बाहेरच्या खाद्यपदार्थांना परवानगी मागितली जाईल, असे अजब प्रत्युत्तर मल्टिप्लेक्सने न्यायालयाला दिले़ ते पाहता सरकारने ठामपणे सामान्यांच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे़ मल्टिप्लेक्सवर निर्बंधाचा कायदाच नाही, असे सरकारने सांगणे हास्यास्पद आहे़ कारण कायदा करण्याचा अधिकार सरकारला आहे़ त्याचा वापर सरकारने करायला हवा़ मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांची किंमत तर प्रचंड आहे, पण ते आरोग्यासाठीही तितकेच घातक आहे़ रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ नक्कीच खाऊ शकत नाहीत. लहान मुलांनाही इथल्या जंकफूडची सवय लागते आणि त्याचे दुष्परिणामही त्यांना भोगावे लागतात़ याचा एकत्रित विचार करून मल्टिप्लेक्सच्या मुजोरीला लगाम हा लावायलाच हवा, तेच शासनाचे धोरण हवे़
मुजोरीला लगाम हवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 05:05 IST