कायद्याच्या पुस्तकातील एक वा अनेक गुन्हे केले असले आणि ते सिद्ध होऊन शिक्षाही झाली असली तरी Þसंबंधित व्यक्ती जर निवडणुकीच्या रिंगणात विजयी ठरली तर ती ‘पाक’ असल्याचे समजण्याची भारतीय परंपरा आहे! लालूप्रसाद यादव वा जयललिता ही याची अलीकडच्या काळातील ठळक उदाहरणे. लोकशाही शासनव्यवस्थेच्या संदर्भात अमेरिका आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे समानमार्गी असली तरी अमेरिकेने याबाबत मात्र भारताचा आदर्श स्वीकारलेला नाही. त्यामुळेच मोदी यांना अमेरिका प्रवेशाचे परवानापत्र (व्हिसा) देण्यावर लागू असलेली बंदी का, कधी आणि कशापायी उठवली असा प्रश्न त्या राष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने बराक ओबामा सरकारला विचारला असून येत्या फेब्रुवारीअखेर ओबामा सरकारला या प्रश्नाचे लेखी उत्तर सादर करायचे आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपा यांचा मोठा विजय झाला आणि त्याबद्दल ओबामा यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले व मोदींनी त्याचा लगेच स्वीकारही केला. दरम्यानच्या काळात मोदींचे अमेरिका दौरे पार पडत गेले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना अमेरिकी सरकारने प्रवासी परवानापत्र जारी केले होते. परंतु २००२च्या गुजरात दंगलीनंतर २००५मध्ये ते रद्द केले गेले. त्यानंतर सलग नऊ वर्षे ही बंदी कायम होती. अशा पद्धतीने अमेरिका बंदीला सामोरे जाणारे मोदी एकमात्र भारतीय होत. त्यांच्यावरील ही बंदी का उठवली गेली अशी पृच्छा अमेरिकेतील ‘शीख्स फॉर जस्टीस’ या संघटनेने गेल्या सप्टेंबर महिन्यात माहितीच्या अधिकाराखाली तेथील सरकारकडे केली असता तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून अखेर तिने न्यायालयात धाव घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींंनी त्या राज्यातील लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण तर केले नाहीच उलट या स्वातंत्र्यावर स्वत:च घाला घातला तेव्हां तो प्रमाद पोटात घालायचे कारण काय असा या संघटनेचा दावा आहे. खरे तर मोदींवर असलेला आरोप मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आहे परंतु त्याच्यावर आक्षेप घेणारी संघटना शीखांची असून ते लोक आज अमेरिकानिवासी असले तरी मूळ भारतीयच आहेत. सव्वाशे कोटी भारतीयांनी पाच वर्षांकरिता आपले भवितव्य मोदींच्या हाती सुपूर्द करताना त्यांचा भूतकाळ मागे टाकण्याची भूमिका घेतली असली तरी अमेरिकेतील शीखांना मात्र अजूनही मोदी ‘फोबिया’ने ग्रासलेले असावे, असे दिसते.
मोदी ‘फोबिया’!
By admin | Updated: December 15, 2015 03:51 IST