शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आधी वंदू तुज मोरया - श्री गणेशपूजेविषयी समज - गैरसमज !

By दा. कृ. सोमण | Updated: August 27, 2017 07:00 IST

बऱ्याच वेळा अशा गोष्टींचे वाचन करून अभ्यास करण्यापेक्षा आपण ती गोष्ट पूर्वीच्या लोकानी सांगितली म्हणून ती करून मोकळे होतो. बदलत्या कालमानानुसार बऱ्याच गोष्टीत बदल करावाच लागतो.

ठळक मुद्देकोकणातील बरेच लोक तेथे जाऊन गणपती आणतात. त्या निमित्ताने सर्व नातेवाईक गावी कोकणात घरी एकत्र जमतात. शास्त्रात असे कुठेही लिहीलेले नाही की अमुक दिवस गणेशपूजन करा म्हणून

आपल्या घरामधील लहान मुलाने जर आपणास कधी धार्मिक विषयासंबंधी प्रश्न विचारला तर बरेचवेळा आपण त्याला सांगतो की --" तू प्रश्न विचारू नकोस, मी सांगतो म्हणून तू कर. ते का, कसे वगैरे प्रश्न विचारत राहू नकोस. मला माझ्या वडिलांनी सांगितले म्हणून मी केले, आणि  आता मी सांगतो म्हणून तू कर. " आपण हे असे बोलल्याने मुले निराश होतात. त्यांच्या विचार करण्याच्या बुद्धीला आपण मदत करीत नाही. बरं त्या गोष्टींची कारण मीमांसा किंवा विचार  करण्याच्या  फंदात आपण पडत नाही. बऱ्याच वेळा अशा गोष्टींचे वाचन करून अभ्यास करण्यापेक्षा आपण ती गोष्ट पूर्वीच्या लोकानी सांगितली म्हणून ती करून मोकळे होतो. बदलत्या कालमानानुसार बऱ्याच गोष्टीत बदल करावाच लागतो.

मला माझ्या लहानपणची गोष्ट आठवते. मी लहान असताना माझ्या वडिलांना मी प्रश्न विचारला होता. " बाबा, गणपतीची सोंड नेहमी डावीकडे वळलेली  का असते. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का? " बाबा मला म्हणाले तूच विचार करून उत्तर शोधून काढ. मी गणपतीची मूर्ती नीट निरखून पाहिली . तेव्हा माझ्या लक्षांत आले की, गणपतीच्या डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो . म्हणून गणपतीची सोंड डावीकडे झुकलेली असते. मी माझे उत्तर बाबाना सांगितले. त्यांनी त्याबद्दल मला दिलेली शाबासकी अजूनही मला आठवते. मग बाबा म्हणाले--- " गणपतीची सोंड जरी उजवीकडे वळलेली असली तरी तो गणपती कडक नसतो. देव हा कधीच कडक नसतो. तो नेहमी कृपाळूच असतो. तो नेहमी अपराधाना क्षमा करीत असतो. म्हणून ईश्वराची पूजा ही कधीही घाबरून , टेन्शन घेऊन करायची नसते. ती प्रेमाने, श्रद्धेने व भक्तीने करावयाची असते."आता आपण गणपतीविषयी नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांविषयी पाहुया.

गणेश चतुर्थीच्या दिवशी पुजावयाची मूर्ती जर पूर्वी आपण गावी आणत असू. आता गावीं जाणे जमत नसेल तर चिंता करायचे कारण नाही. जिथे आपण राहतो, तेथे मूर्ती आणून पूजा केली तरी चालते. म्हणजे आपण जर परदेशात रहायला गेलो तर तेथे गणेश मूर्ती आणून पूजन केले तरी चालते. कोकणातील बरेच लोक तेथे जाऊन गणपती आणतात. कारण त्या निमित्ताने सर्व नातेवाईक गावी कोकणात घरी एकत्र जमतात. या दिवसात कोकणातील विलोभनीय सृष्टीसौंदर्य पाहिल्याने आनंदही मिळतो.

बरेच लोक असाही प्रश्न विचारतात की " पूर्वी आमच्या घराण्यामध्ये दीड दिवस गणपती आणीत होतो आता पाच दिवस गणेशोत्सव करावयाचा आहे तर चालेल का ? " हो चालेल !शास्त्रात असे कुठेही लिहीलेले नाही की अमुक दिवस गणेशपूजन करा म्हणून ! आपण कितीही दिवस ठेवू शकतो. फक्त करीत असलेला बदल आपल्या आप्तेष्ट मित्रांना कळवला गेला पाहिजे. म्हणजे त्यांची गैरसोय होणार नाही.तसेच अनंतचतुर्दशी नंतर पितृपक्ष सुरू होतो( याचवर्षी पौणिमेच्या दिवशी महालयारंभ आहे. ) म्हणून जास्तीत जास्त अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन केले जाते.

काही घरी दरवर्षी उंचीने वाढत जाणारी गणेशमूर्ती आणतात. त्यांना असे वाटत असते गणेशमूर्तीच्या वाढत जाणार्या उंचीप्रमाणे आपली भरभराट होत जाईल. पण तसे ते होत नसते. गणेशमूर्तीच्या  उंचीवर उपासनेचे फळ अवलंबून नसते. ते आपल्या श्रद्धा आणि भक्ती यांवर अवलंबून असते. मोठी गणेशमूर्ती आणणे , सांभाळणे कठीण जाते. 

काही लोक घरात गरोदर महिला असेल तर गणेशमूर्तीचे विसर्जन करीत नाहीत. गणेशमूर्तीचे विसर्जन केले तर जन्मणार्या बाळाला त्रास होईल असे त्यांना वाटते. परंतु तसे काहीही होणार नसते. गणेशमूर्तीचे परंपरेप्रमाणे ठरलेल्या दिवशी विसर्जन केले तरी गणेशाची कृपा होतच असते. इथे एक गोष्ट समजून घ्यावी की, आपण गणेशाचे विसर्जन करीत नसतो, मूर्तीमध्ये मित्राने प्राणप्रतिष्ठा करून देवत्व आणतो, आणि उत्तरपूजा करून ते देवत्व काढून घेतो. नंतर आपण मूर्तीचेच विसर्जन करीत असतो. गणेश देवाचे नाही.

गणेशचतुर्थीच्या दिवसात जर  सुवेर - सुतक आले तर गणेशमूर्ती आणून पूजन केले जात नाही. आणि सुवेर - सुतक संपल्यावर इतर दिवशी मग गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.जर गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना झाल्यानंतर जर सुवेर - सुतक आले  तर लगेच. दुसर्याकरवी  उत्तरपूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे असते. 

वडिलांच्या निधनानंतर त्यावर्र्षापासून मोठ्या मुलानेच गणेशमूर्ती आणून पूजन करायला हवे का ? असाही प्रश्न विचारला जातो. परंतु ते योग्य नाही. वडिलांच्या इस्टेटीवर सर्व मुलांचा अधिकार, पण कौटुंबिक रीतीरिवाज तेव्हढे मोठ्या मुलांने सांभाळावयाचे हे कधीही योग्य नाही. सर्व मुलांनी गणपती आणला तरी चालेल. किंवा कोणालाही आणायचा नसेल तरीही हरकत नाही. किंवा प्रत्येक वर्षी पाळीपाळीने आणला तरी चालेल. त्यानिमित्ताने तरी सर्व भावंडे एकत्र येतील आणि आनंदाचा अनुभव घेतील. 

महिलांनी गणेशपूजा केली तरी चालते. जर कधी हरितालिका आणि गणेशचतुर्थी एकाच दिवशी आली तर कोणतीही पूजा अगोदर केली तरी चालते. कारण ही दोन्ही व्रते स्वतंत्र आहेत.  काही लोक यावर्षी आणलेली गणेशमूर्ती विसर्जन न करता वर्षभर घरात ठेवतात आणि मागच्या वर्षी आणलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. परंतु असे करणे योग्य नाही. कारण गणेशमूर्ती मातीची असते. तिला वातावरणात व तापमानात होणार्या बदलामुळे इजा होण्याची शक्यता असते. काही कलावंत गणेशमूर्तीमध्ये लाइट बल्ब बसवितात हेही करणे योग्य नाही.काही कलावंत गणेशमूर्तीना इतर संत किंवा देवांचे रूप देतात. तेही योग्य नाही.

गणेशाची स्थापना झाल्यानंतर जर काही कारणाने मूर्तीला तडा गेला तर अजिबात घाबरू नये. ते देवाच्या कोपामुळे वगैरे होत नसते. देव कधीही कोणावर कोपत नसतो. तो अपराधानाही क्षमा करतो. मूर्ती मातीची असल्याने हे असे घडू शकते. कधी कधी मूर्तीकाराच्या हातूनही चूक घडू शकते. कधी कधी घरातील लहान मुलांच्या हातूनही होऊ शकते. म्हणून घरात लहान मुले असल्यास मूर्ती उंचावर ठेवतात. पण असे घडल्यास लगेच उत्तरपूजा करून मूर्तीचे विसर्जन करावे. अशावेळी मनाला लावून घेऊ नये. किंवा मध्येच दुसरी मूर्ती आणू नये.

गणपतीची पूजा करताना पूजा साहित्यातली एखादी गोष्ट उपलब्ध झाली नाही. तरी चिंता करू नये. त्या ठिकाणी अक्षतांचा वापर करावा. गणपतीची पूजा करताना स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे. घरात प्रसन्न वातावरण ठेवावे. पुस्तकावरून गणेशपूजा करावयाची असेल तर गणेशचतुर्थी पूर्वी ते पुस्तक वाचून नीट समजून घ्यावे. 

श्रीगणपती नवसाला पावतो का ? असा प्रश्न काही लोक विचारतात. मी आस्तिक असूनही त्यांना नम्रपणे सांगतो की श्रीगणेश हा नवसाला कधीही पावत नसतो. तसे जर असते तर नवस बोलून भारताची गरीबी दूर करता आली असती. नवस बोलून भ्रष्टाचार संपवता आला असता. नवस बोलून गुन्हेगार पकडता आले असते. नवस बोलून आतंकवाद्यांना मारता आले असते. नवस बोलून परीक्षेत चांगले गुण मिळवतां आले असते, नवस बोलून दुष्काळी भागांत पाऊस पाडतां आला असता. नवस बोलून देशापुढचे आणि आपल्या पुढचे सर्व प्रश्न सोडवता आले असते. आणि हो ! नवस बोलून या गोष्टी होत नाहीत.म्हणूनच जगण्यात आनंद आहे आणि यशासाठी प्रयत्न करण्यातच खरे जीवन आहे. जीवनात मिळालेल्या गोष्टींपेक्षा प्रयत्न करून मिळवलेल्या गोष्टी जास्त आनंद प्राप्त करून देत असतात.(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com )

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव