उद्योग-व्यवसायातील यशाचा मंत्र : लीडर व्हा!

By विजय बाविस्कर | Published: June 3, 2023 01:30 PM2023-06-03T13:30:41+5:302023-06-03T13:31:17+5:30

यशस्वी उद्योजक होणं हे एका दिवसात होणारं काम नाही. त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात, मोठी स्वप्नं पाहावी लागतात, लीडर व्हावं लागतं..

Mantra of success in business Be a leader deasra founder dr anand deshpande | उद्योग-व्यवसायातील यशाचा मंत्र : लीडर व्हा!

उद्योग-व्यवसायातील यशाचा मंत्र : लीडर व्हा!

googlenewsNext

विजय बाविस्कर,
समूह संपादक, 
लोकमत

डॉ. आनंद देशपांडे. देशातल्या आयटी आणि उद्योग क्षेत्रात अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव. उद्योग क्षेत्रातला ३२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, देशभरातल्या अब्जाधिशांच्या यादीत नाव, जगभरात २२ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी असूनही अत्यंत साधे, विनम्र ही त्यांची ओळख. याच अनुभवाच्या आधारे देआसरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी नवे उद्योजक घडवणं आणि जे उद्योग-व्यवसाय करताहेत त्यांना मोठी झेप घेण्यासाठी मदत करणं हे मिशन हाती घेतलंय. ‘यशस्वी उद्योजक’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही ते सतत उद्योजकांशी संवाद साधत असतात.

उद्योगात यश मिळवायचं असेल तर प्रत्येक उद्योजकाने तीन गोष्टींवर फोकस केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. त्या तीन गोष्टी आहेत, नेतृत्व, उत्तम टीम आणि आदर्श कार्यपद्धती! लीडर व्हा! 

उद्योजकाने कायम मार्केट लीडर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे काही एका दिवसात होणारं काम नाही. त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. तुमच्याकडे मोठं स्वप्न असेल तर तुमची पावलंही आपोआप तशीच पडतात. म्हणजे तुमचा व्यवसाय १ कोटींचा असेल तर तो ५ कोटी कसा होईल, ५ कोटींचा असेल तर २५ कोटी कसा होईल, असं टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग केलं पाहिजे. 

तुम्ही लीडर तेव्हाच होऊ शकता, जेव्हा तुमचा ब्रँड असतो. ब्रँड तयार करतानाच तुम्ही लीडर म्हणूनही पुढे येत असता. खूप गोष्टींवर फोकस न करता एकाच प्रॉडक्टवर फोकस केलं पाहिजे. त्यामुळे तुमची शक्ती एकाच ठिकाणी खर्च होईल. त्यासाठी मार्केटची सखोल माहिती करून घ्या. 

उदाहरणार्थ, एका तरुणाने ट्रॅव्हल कंपनी काढली. मार्केटचा अभ्यास केल्यानंतर त्याने त्याचा मार्ग निवडला. ज्या मुलांना अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये शिकायला जायचं आहे त्यांना तो सर्व सुविधा देत असे. हेच त्याचं वैशिष्ट्य बनलं आणि त्यात तो लीडर झाला. सगळ्याच गोष्टी करण्यावर त्याने फोकस केला नाही. 

तुम्ही लीडर झाला तर जास्त प्रॉफिटही मिळेल. नवं मार्केट तयार होईल. सुरुवात पहिल्या पाच कंपन्यांमध्ये येण्याची, नंतर तीन आणि नंतर पहिल्या क्रमांकावर असं दीर्घ नियोजन असलं पाहिजे.

उत्तम टीम आणि मिशन
चांगली टीम असल्याशिवाय उद्योगात यश मिळत नाही. उद्योगात सगळा व्यवहार तुमच्या भोवतीच केंद्रीत असतो. सगळे आपल्यासाठीच काम करतात, असं वाटत असतं. असं वातावरण प्रत्येकालाच आवडतं, मात्र ते योग्य नाही. कंपनीचं एक मिशन पाहिजे. काम करणाऱ्या प्रत्येकाने कंपनीसाठी काम करावं. तुम्ही प्रमुख असला तरी तुम्हीसुद्धा कंपनीसाठीच काम केलं पाहिजे. 
‘कंपनीसाठी’ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते कंपनीच्या मिशनसाठी असं अपेक्षित आहे. उद्योग एका विशिष्ट उंचीवर न्यायचा असेल तर एक उत्तम टीम लागते. आणि एक उत्तम टीम तेव्हाच तयार होते जेव्हा त्या टीमला मिशन असतं. त्यांनी एकत्र टीम म्हणून काम करणं सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी Beyond the Summit हे Tood Skinner यांचं पुस्तक वाचावं.

ही आहेत ४ सूत्रं
१  -    मिशन - कार्य प्रवृत्त करणारं ध्येय.
२  -    पॉवर - प्रत्येकाला काम करण्याचं स्वातंत्र्य आणि मोकळीक.
३  -    सुसूत्रता - प्रत्येकजण मिशनशी एकाच सूत्रात बांधिल असणं.
४  -    विश्वास - लोकांचा तुमच्यावर विश्वास हवा.
आपल्या कामाची दखल घेतली जाते, योग्य संधी मिळते, आर्थिक फायदाही होतो असं दिसत असेल तर लोक टिकून राहतील आणि विश्वासाने तुमच्याबरोबर कामही करतील.

आदर्श कार्यपद्धती
उद्योग-व्यवसाय एका उंचीवर नेण्यासाठी तुमची कार्यपद्धती खूप महत्त्वाची आहे. त्यालाच आपण वर्क कल्चर किंवा गव्हर्नन्स असंही म्हणू शकतो. व्यवसाय आपण कशा पद्धतीने चालवतो? त्यासाठी काही प्रोसेस तयार केलीय का? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यासाठी मिशन ओरिएंटेड कार्यपद्धती तयार केली पाहिजे. आपली जमेची बाजू ओळखून ज्या गोष्टींमध्ये गती नाही त्या क्षेत्रातली माणसं जोडली पाहिजे. उद्योग मोठा असो की छोटा, त्यांनी एक बोर्ड तयार करावं. त्यात असे एक्सपर्ट घ्यावेत ज्यांचा व्यवसायाला फायदा होईल. या संदर्भात Harsh Realities हे हर्ष मारीवाला यांचं पुस्तक वाचल्यास खूप नव्या गोष्टी कळतील.

देआसरा फाउंडेशन
रोजगार निर्मिती, उद्योजकतेची भावना रूजवणं आणि तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळणं हेच या समस्येवरचं उत्तर आहे. हे ओळखून डॉ. आनंद देशपांडे यांनी २०१५ मध्ये देआसरा फाउंडेशनची स्थापना केली. ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे आणि असलेला उद्योग वाढवायचा आहे अशा सगळ्या टप्प्यांवर देआसरा फाउंडेशन (www.deasra.in) मदत करतं. याशिवाय ‘यशस्वी उद्योजक’ (www.yashaswiudyojak.com) या माध्यमातून उद्योजकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न अव्याहत सुरू आहे...
vijay.baviskar@lokmat.com

(‘लोकमत’ आणि ‘जितो’ पुणे यांच्यातर्फे पुण्यात उद्योजकांसाठी ‘संवाद’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि देआसरा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी यावेळी उद्योजकांना  सांगितलेले व्यवसायातील यशाचे गुपित.)

Web Title: Mantra of success in business Be a leader deasra founder dr anand deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.