शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण!

By विजय दर्डा | Updated: May 10, 2023 07:37 IST

मला आठवते, कवी ग्रेस यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, सन्मान असे सारे काही टांगलेले ! ते म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांचा बुधवारी ८६ वा जन्मदिन. ते जाऊन अकरा वर्षे झाली. पण, त्यांच्या आठवणी आजही मनात रुंजी घालतात. त्यांची पहिली भेट अजूनही चांगली आठवते. विवेक रानडे यांच्या सोबत मी ग्रेस यांच्या घरी पहिल्यांदा गेलो. दारावर दोन पाट्या दिसल्या. पहिली - फ्लॅट फॉर सेल, बट नॉट फॉर जंटलमेन आणि दुसरी- आय ॲम फ्री बट नॉट अव्हेलेबल ! दुसऱ्या पाटीबद्दल अधिक कुतूहल होते. विचारले तर म्हणाले, ‘ही पाटी तुमच्यासाठी नाही. पण, मीच काय इतरही कुणी कलावंत, कवी-लेखक, विचारवंत रिकामे दिसले तरी तसे ते नसतात. त्यांचे म्हणून काम सुरूच असते. तेव्हा, ते बाजारगप्पा मारण्यासाठी रिकामेच आहेत, असे समजून येणाऱ्यांसाठी ही पाटी आहे.’

- हे केवळ ग्रेस यांच्याबद्दलच होत नसते. एखाद्याभाेवती प्रसिद्धीचे वलय तयार झाले की, हौसे, नवसे, गवसे लोक त्या वलयापोटी त्यांच्याकडे जातात. ग्रेस त्याबद्दल फटकळ म्हणावे इतके स्पष्टवक्ते होते. त्यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, ओळखपत्रे सारे काही टांगलेले. म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’

‘लोकमत’ला काही गोष्टी योगायोगाने लाभल्या. त्यापैकी एक म्हणजे नागपुरात लोकमत भवनजवळ राहणारी थोर माणसे. अशा सान्निध्यासोबतच ती माणसे संस्थेच्या रोजच्या व्यवहारात सहभागी झाली तर आपोआप त्यांचे वलय संस्थेभोवतीही तयार होते. कवी अनिल म्हणजे आत्माराव रावजी देशपांडे व त्यांच्या पत्नी कुसुमावती यांचे घर रामदासपेठेत ‘लोकमत’पासून हाकेच्या अंतरावर. रस्त्याच्या पलीकडे धंतोलीत  ग्रेस व सुरेश भट यांची घरे. कवी अनिलांच्या वार्धक्याच्या काळात लोकमत बाल्यावस्थेत, फारतर किशोरावस्थेत होता. सुरेश भट मात्र प्रारंभापासून लोकमतशी जुळलेले. ते लोकमतमध्ये नियमित लिहायचे. पण, महत्त्वाचे म्हणजे आधी ते अमरावतीला लोकमतचे जिल्हा प्रतिनिधीही होते. ग्रेस थोडे अलिप्त राहणारे. स्वत:हून वृत्तपत्रांकडे न जाणारे. इतकेच काय, पण नेहमीच्या कला-साहित्याच्या कार्यक्रमांकडेही न फिरकणारे. आमच्या भेटी व्हायला लागल्या आणि मी त्यांना ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक बनण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी विचारले, ‘मी कविता करणारा, ललित लिहिणारा माणूस, मला ते संपादन वगैरे कसे जमेल? त्याऐवजी मी तुम्हाला पन्नास कविता देतो’. मग मी विनम्रपणे १९७१ ते ७४पर्यंत त्यांनी केलेल्या विदर्भ साहित्य संघाचे ‘युगवाणी’ व नंतर मुंबईच्या रायटर्स सेंटरच्या ‘संदर्भ’ द्वैमासिकाच्या संपादनाचा संदर्भ दिला. ते तयार झाले. लिखाणासाठी बैठक मारावी तसे त्यांनी किशोर कुलकर्णी, विवेक रानडे यांच्यासोबत अत्यंत मन लावून अंकाचे काम केले. २००७ सालच्या दीपोत्सवावर त्यांच्या संपादनाची अमीट छाप होती आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रेस यांच्या एकवीस कविता हा त्या नितांत सुंदर अंकाचा मेरुमणी होता.

पहिल्याच कवितासंग्रहाला ‘संध्याकाळच्या कविता’ नाव देणारे, दुर्बोध शिक्का मारला गेलेल्या गूढ-गर्भित कविता लिहिणारे ग्रेस नेमके कसे आहेत, हा प्रश्न त्यांच्या हयातीत चर्चेत होता आणि आताही आहे. अनेकजण म्हणतात तसे ते कुणात न मिसळणारे माणूसघाणे, एककल्ली, फटकळ होते का? त्यांना जवळून पाहिले, अनुभवले असल्यामुळे मी नक्की सांगू शकतो की, ते तसे  नव्हते. मैत्री जपणारे होते. नागपुरात अनेकांशी त्यांचे आयुष्यभर मित्रत्वाचे संबंध होते. आमचा प्रदीर्घकाळ पत्रव्यवहार चालला. मला लिहिलेल्या प्रत्येक पत्राची प्रत ते विवेक रानडे यांना पाठवायचे. कारण काय? - तर ज्यांच्यामुळे मैत्री झाली, त्यांनाही मैत्रीचा व्यवहार समजावा.

आयुष्यात त्यांनी दु:खाचे अनेक पदर अनुभवले.. ते दु:ख ते अखेरपर्यंत विसरले नाहीत. त्यांच्या मोठ्या भावाच्या निधनावेळी आम्ही सांत्वनासाठी गेलो तेव्हा ते शांत बसून होते. म्हणाले, ‘बाप गेला तेव्हाही गेलो नव्हतो. ज्याने कधी मुलगा मानला नाही, त्याच्या मृत्यूचा काय शोक करायचा? मी मरणाला व तोरणाला जाणे कधीच बंद केले आहे’.

बालपणीच्या दु:खाने त्यांच्या मनावर इतक्या खोल जखमा केल्या होत्या. त्यांचे बालपण कष्टात गेले. आईच्या अकाली मृत्यूमुळे त्या कष्टावर मायेची पाखरही राहिली नाही. हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले. पुढे  अलौकिक प्रतिभेने त्यांच्या आयुष्यातील उणिवांवर मात केली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही विशेष असलाच तर तो दु:ख गोंजारण्याचा नव्हता तर प्रतिभेचा होता. आयुष्यभर वाट्याला येणारे सारे दु:ख कमी वयातच भोगून झाले असल्यामुळे त्यापुढे आपले घर, आपले लिखाण, आपले आयुष्य आपल्याला हवे तसेच जगायचे, हे त्यांनी ठरवून टाकले होते आणि अखेरपर्यंत ते तसेच राहिले... त्यांना विनम्र आदरांजली!