शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मंडईची पुण्याई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 05:09 IST

पुणे हे नुसते एखाद्या शहराचे नाव निश्चितच नाही. कारण पुलंनी म्हटलं, त्यानुसार नुसतं पुण्यात राहायला येऊन पुणेरी होता येत नाही.

पुणे हे नुसते एखाद्या शहराचे नाव निश्चितच नाही. कारण पुलंनी म्हटलं, त्यानुसार नुसतं पुण्यात राहायला येऊन पुणेरी होता येत नाही. पुणेरी व्हायचंच असेल तर कंबर कसून तयार करावी लागेल आणि पुण्यातील काही गोष्टींविषयी नुसता नाही तर 'जाज्वल्य' अभिमान असावा लागेल. पुण्यातील पर्वती, कसबा गणपती, बालगंधर्व रंगमंदिर अशी पुणेकरांच्या अभिमानाची अनेक ठिकाणं. या पंक्तीत अगदी मानानं विराजमान होईल असा या पुण्याचा मानबिंदू म्हणजे, महात्मा फुले मंडई. शारदा - गणेश आणि दगडुशेठ हलवाई या प्रसिध्द गणपतींच्या मधोमध अगदी कोंदणासारखी शोभून दिसणारी मंडई हे नुसतं भाजी मिळण्याचं ठिकाण नाही तर पुणेकर अभिमानानं ज्याच्याविषयी आवर्जून सांगतील अशी जागा आहे.५ आॅक्टोबर १८८६ रोजी पुणे महानगरपालिकेने ड्युक आॅफ कॅनॉट व लॉर्ड रे यांच्या हस्ते या मंडईचे उदघाटन केले. आज त्या मंडईचे १३१ व्या वर्षात पदार्पण होत असताना या वास्तुचा आणि त्या अनुषंगाने तेथील गौरवशाली इतिहास, रुजलेली संस्कृती, सद्यस्थिती, आणि नव्याने असलेल्या समस्या यांचा वेध घेणे उचित ठरेल.ही ऐतिहासिक वास्तू देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची साक्षीदार आहे. लोकमान्य टिळकांनी ‘काळ’कर्ते शि.म.परांजपे यांच्या साथीने विदेशी कपड्यांंची होळी याच मंडईच्या रस्त्यावर केली होती. अनेक सामाजिक प्रश्नांचे लढे येथूनच सुरु झाले. आजही गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्यापासून होते.यशवंराव चव्हाण, आचार्य अत्रे अशा दिग्गजांच्या भाषणांचे स्वर मंडईच्या भिंतींनी कानात साठवून ठेवले आहेत. या परिसराला 'मंडई विद्यापीठ' असेही म्हटले जाते. कारण नवख्या कार्यकर्त्यांना खरे धडे इथेच मिळतात. कालपरवापर्यंत मंडईतल्याच एखाद्या कट्ट्यावर रात्री-अपरात्री गप्पा मारत बसलेले पुण्यातले नामवंत राजकारणी दिसत असत. चार एकर जागेत विस्तारलेल्या मंडईत भाजीपाल्याचे सुमारे ९०० गाळे आहेत. मंडईतून फेरफटका मारणे ही हजारो पुणेकरांच्या आवडीची गोष्ट असून खरेदीचा आत्मानंद प्रत्येक पिढीत टिकून आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत गर्दी आणि वर्दळ असली तरी महिलांना फिरताना असुरक्षितता कधीच जाणवत नाही. याच मंडईत एक रुपयात झुणका भाकर सुरू होती. त्याचेच विस्तारीत रुप युती शासनाच्या स्वस्त झुणका भाकर केंद्रात दिसून आले. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, खाद्यसंस्कृती अशी नानाविध वैशिष्ट्ये भाजीपाल्याच्या जोडीने रंगणारे हे एकमेव ठिकाण असावे. सतत जाग असणाऱ्या मंडईत अपरात्री कुणी आले तरी त्याला नाश्त्यासाठी एखादे हॉटेल उघडे नक्की मिळते. एखाद्या निराश्रित पांथस्थाला रात्रीचा आसराही देते ती मंडईच! वाढत्या नागरीकरणाने मात्र मंडईचा श्वास कोंडला गेला आहे. अतिक्रमण हा पालिकेपुढचा चिंतेचा विषय आहे. अनेकदा अतिक्रमणे हटवूनही ती पुन्हा तयार होतात. तुळशीबागेच्या रस्त्यापासूनच रस्त्याच्या दुतर्फा बसणारे विक्रेते बाबू गेनू चौकापर्यंत आणि शिवाजी रस्त्याच्या पल्याडच्या अंतर्गत रस्त्यांवरही तळ ठोकून असतात. बुरुड गल्ली ते नव्या विष्णु चौकापर्यंत त्यांची लगबग असते. मंडईच्या मुख्य वास्तुलगतच्या रस्त्यावरचे अतिक्रमण हटवून महानगरपालिकेने बसथांबे उभारले, पण ही वरवरची मलमपट्टी होय. ऐतिहासिक घटना घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या मंडईचे जतन आणि संवर्धन खरोखर महत्त्वाचे आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे केंद्र असलेल्या या मंडईला नुसत्या रंगरंगोटीने झळाळी देऊन भागणार नाही. ही वास्तु, तिचे आगळेवेगळेपण आणि तेथील संस्कृती हे सारे संचितासारखे जपायला हवे. त्यासाठी या मंडईविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा असणाऱ्या पुणेकरांचाच एक दबावगट निर्माण व्हायला हवा. तेव्हाच हा पुणेरी अस्मितेचा वारसा जपला जाईल.- विजय बाविस्कर