शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ममतादीदींचा धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2024 07:46 IST

काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांचा समन्वय कमी पडतो आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ऊर्फ दीदी यांचे व्यक्तिमत्त्व वादळी धडाकेबाज. त्यांच्या अनेक राजकीय भूमिकांनी पश्चिम बंगालच्या राजकारणात धमाका झाला आहे. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांद्वारे त्या निवडणुकीच्या राजकारणात आल्या. जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून तरुण ममतादीदींनी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांचा दणदणीत पराभव करून खळबळ उडवून दिली, तेव्हा पश्चिम बंगाल हा प्रदेश डाव्या आघाडीचा बालेकिल्ला होता. त्यांचे राजकारण पश्चिम बंगालपुरतेच सीमित राहिले असले तरी मागील दोन दशकांतील आघाड्यांच्या राजकारणात त्यांनी अनेक वादळे झेलली आहेत.

सलग ३४ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीविरुद्ध  काँग्रेसने कधी आरपारची लढाई लढलीच नाही, म्हणून संतापून त्यांनी तृणमूल स्थापना केली आणि पंधरा वर्षांचा संघर्ष करीत पश्चिम बंगालमध्ये कधी डाव्या आघाडीचा पराभवच होणार नाही, असे मानणाऱ्यांना २०११ च्या विधानसभा निवडणुकीत धक्का. त्या निवडणुकीत ममतांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. तत्पूर्वी त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही सामील होण्याचा आणि वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्याचा धक्का दिला होता. अशा तडाखेबाज ममतादीदींनी पुन्हा एक धक्का अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दिला आहे.

नितीशकुमार, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव  आदी मातब्बर प्रादेशिक नेत्यांना एकत्र करून ‘इंडिया आघाडी’ स्थापन करण्याची कल्पना मांडण्यात त्यांचा पुढाकार होता. या आघाडीमधील प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. जिथे पक्षाची ताकद नाही, त्या प्रदेशातील प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तेव्हा तसा आग्रह ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने धरला होता. २०१९ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने दोनच जागा जिंकल्या. तेवढ्याच जागा त्यांना देऊन उर्वरित चाळीस जागा लढविण्याचा प्रस्ताव ममतांनी काँग्रेसला दिला होता. मात्र, काँग्रेसने  दहा ते बारा जागांची मागणी केली, ती अमान्य करीत पश्चिम बंगालमध्ये आपला पक्ष ‘इंडिया आघाडी’त राहणार नाही, असे जाहीर करून दीदींनी विरोधकांच्या एकूणच तयारीला धक्का दिला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याययात्रा  आज (२५ जानेवारी) पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात प्रवेश करेल. इंडिया आघाडीतील मित्रपक्ष म्हणून तृणमूल काँग्रेसला या यात्रेत सामील होण्याचे निमंत्रण देण्याचे औदार्यही दाखविले गेले नाही, असा ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. भाजपने बंगालमध्ये पाय रोवले आहेत, हे मान्यच करावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अठरा जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपने आरपारची लढाई केली. भाजपच्या ‘साम दाम दंड भेद’ नीतीला जोरदार धक्का देत ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट बहुमत मिळविले. डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालच्या राजकारणात अदखलपात्र ठरले. असे असताना काँग्रेस दहा ते बारा जागा मागणे तसे गैरच आहे. तृणमूलचा प्रस्ताव आल्यावर त्याची दखल घेऊन निर्णय न झाल्याने ममतादीदी संतापल्या.  काँग्रेस पक्षाचा राष्ट्रव्यापी प्रसार असला तरी प्रत्येक प्रदेशातील परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची गती वाढविणे अपेक्षित आहे. मतदार याद्या जाहीर करून निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभा निवडणुकीची पहिला घंटा वाजविली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांचा समन्वय कमी पडतो आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी महत्त्वपूर्ण प्रदेशात काँग्रेसला पडती बाजू घ्यावी लागणार आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आदी राज्यांत प्रादेशिक पक्षांची ताकद नाही. तेथे काँग्रेसला  मोठ्या भावाची भूमिका बजावण्यास संधी आहे. मात्र, बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आदी मोठ्या प्रदेशांमध्ये आघाडी करताना कसरत करावी लागणार आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रभावी नेतृत्व आहे. सामान्य माणूस आजच ‘त्यांच्याशिवाय कोण?’ अशी चर्चा करतो तेव्हा ‘आम्ही आहोत’ असा संदेश एकसंघपणे जाणे महत्त्वाचे आहे. ममता बॅनर्जी यांचा स्वभावच असा, की त्या कशाची काळजी करीत नाहीत. भाजपशी दोन हात करण्यातही त्या कसूर सोडत नाहीत. त्यांनी उडवलेला धमाका काँग्रेसनेच समजून घेतला पाहिजे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकcongressकाँग्रेस