लहानपणी आजी बाबांना सारखं म्हणायची, जाऊ दे ना भाऊ, तू मन मोठं कर, बाळ लहान आहे. बापूही लहान आहे. मग बाबा चिडायचे. सगळा समजूतदारपणाचा ठेका मी घेतलाय का? मीच सारखं सर्वांना समजून घ्यायचं का? एकदा ज्येष्ठतेचा शिक्का कपाळावर मारला की समजून, सोशिकता, सायुज्यता, समपिता हे सारे गुण पटापट चिकटविले जातात, इतके की ते अवगुण वाटू लागतात. खरंतर कुणीच पूर्ण समंजस वा असमंजस नसतो. वेळकाळ पाहून जो वागतो तो यशस्वी समंजस माणूस ! बाबांचा काळ सरतो. ते वृद्धपणी पश्चात्तापाचा कोळसा उगाळत राहतात. मुलांवर, बायकोवर राग काढत राहतात. त्यांच्या तरुणपणी त्यांच्यावर नाइलाजाने प्रेम (?) करणारी आई त्यांचं ऐकत ऐकत खंगत जाते. आणि त्यांच्या म्हातारपणी नवऱ्याला तिच्या लग्नापासूनचे सगळे हिशेब ऐकवते. तेव्हा बाबाही खोकत तिला समजावतात. जाऊ दे, मन मोठं कर. पोरानातवांना जीव लाव. ऐकत ऐकत मुलगा मोठा होतो. त्याला ताई असेल तर सोसण्याची सवय आणि भार तो सर्व ताईवर सोपवतो आणि मोठा झाल्यावर जाण ठेवलीच तर जाहीरपणे ताईने मला आईसारखं सांभाळलं म्हणत राहतो. म्हणजे लागला ताईचा निकाल ! लग्नापूर्वी बाबा भाऊंचा धाकदपटशा आणि नंतर नवऱ्याचा! ह्या नादात मुलांचे अतोनात लाड करायचे आणि ते पुढे परंपरेने लाथा मारू लागले की टिपं गाळत बसायचे ! एखादी स्त्री मुक्तीवाली चवताळून म्हणेलही हे सर्व आम्ही बदललंय ! आताची स्त्री मुक्त आहे, तिचं विश्व मोठ्ठं आहे ! मान्य ! पण मनाचं काय? ते होतं का मोठं? मन काही फुगा आहे का हवा भरून फुगवायला! शेवटी आयुष्य धक्केचपाटे खात घालवावं लागतं. तो शाळा-कॉलेजात मेणघुण्या, अबोल असला तर सारेजण अधिकार गाजवायला मोकळे. मग त्याची इच्छा असो नसो त्याला मन मोठं करावं लागतं! अशावेळी शांत विचारी बायको, प्रेयसी मिळालीच तर त्याचं नशीब चांगलं. ताणतणाव, शिक्षण, नोकरी, धंदा ह्यातील असुरक्षितता, शरीराचे सर्व पातळ्यांवर होणारे व्यापारीकरण ह्यातून मुली खूप सावध होताहेत. त्यातून शुभ्र फुलांची सोबत कशी मिळवायची हे त्यांना कळतंय. तसे धोके आहेतच. वाट निसरडीच आहे. दोघांचेही पाय घसरणारच आहेत. तेव्हा सांभाळायला निसर्ग आणि मोठ्या मनाचे पर्यावरण असलेली माणसं मिळाली की तो प्रवास सुंदर होतोच. कळत नाही मन कधी मोठं होतं ते! तो तरुणपणी वारंवार मन मोठं कर हे वाक्य ऐकत ऐकवत राहतो. पण एकदा काय करायचं हे नक्की असेल ना तर मनही हवं तसं लहानमोठं होत राहतं. जगणं विविध वाटा वळणांवर खुणावत राहतं. तेव्हा या जगण्यानेच पूर्वापार मन मोठं कर हे वाक्य सटवाईच्या लेखणीत भरून ठेवलंय. ते आजोबांनी ऐकलं, बाबा बोलले, आपण गुणगुणतो आणि मुलांनाही ऐकवू या ! मुलं कदाचित म्हणणार नाहीत पण वागताना मन मोठं होतच राहणार !किशोर पाठक
मन मोठं कर
By admin | Updated: July 18, 2016 05:40 IST