शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे न्याय‘भूषण’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 06:34 IST

या नियुक्तीने देशातील कोट्यवधी दीनदुबळ्या, दलित वर्गाचा ऊर अभिमानाने भरून आला असेल.

भारताची राज्यघटना देशाच्या हाती सोपविण्याच्या पूर्वसंध्येला, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीत बोलताना राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते - ‘राजकीय लोकशाही टिकवायची असेल, तर तिचा पाया सामाजिक लोकशाहीवर आधारित रचला गेला पाहिजे. सामाजिक लोकशाही म्हणजे अशी समाजरचना जिथे समता आहे, बंधुता आहे, परस्परांबद्दल आदर आहे.’ पंचाहत्तर वर्षांनंतर १ ऑगस्ट २०२४ ला सर्वोच्च न्यायालयाच्या सात-सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती व जमातींमधील उपवर्गीकरणाला अनुकूलतेच्या माध्यमातून समाजातील दुबळ्या, खऱ्या अर्थाने वंचित घटकांना दिलासा देताना त्या विधानाचे स्मरण करून दिले. 

लोकानुनयाचा मार्ग सोडून देशाच्या सर्वोच्च न्यायासनाने वास्तववादी, झालेच तर थोडी धाडसी भूमिका घेतली. या ऐतिहासिक निकालातील न्या. भूषण रामकृष्ण अर्थात बी. आर. गवई यांचे योगदान, स्पष्ट नि:स्पृह भूमिका महत्त्वाची होती. क्रिमी लेअरच्या रूपाने मागासांमधील उन्नत वर्गाऐवजी खऱ्या वंचितांना आरक्षणाच्या लाभांसाठी ते आत्यंतिक आग्रही होते. अजूनही प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकलेल्या गरीब घरातील मुलांना आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उन्नत वर्गातील मुलांशी स्पर्धा करता येणार नाही, हे त्यांचे वेधक निरीक्षण होते. याच न्या. गवई यांना बुधवारी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी शपथ दिली. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील दारापूरच्या मातीतून अंकुरलेली, अमरावती शहरातील फ्रेजरपुरा, काँग्रेसनगरमध्ये फुललेली प्रतिभा देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत पोहोचली. शपथविधीनंतर न्या. गवई यांनी मातोश्री कमलताईंना केलेल्या चरणस्पर्शाचा क्षण समारंभाला उपस्थित त्यांचे सहकारी, मित्र, चाहत्यांनी डोळ्यांत साठवून ठेवला. 

या नियुक्तीने देशातील कोट्यवधी दीनदुबळ्या, दलित वर्गाचा ऊर अभिमानाने भरून आला असेल. कारण, न्या. गवई यांच्यापुढे पुढच्या सहा महिन्यांत कोणते खटले सुनावणीसाठी येणार आहेत किंवा आधी त्यांनी कोणते निवाडे दिले आहेत, यापेक्षा ते कोणता वारसा चालविणार आहेत, हे अधिक महत्त्वाचे. पहिला वारसा आहे सामाजिक जबाबदारीचा. दिवंगत आंबेडकरी नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती, लोकसभेचे खासदार तसेच बिहार, केरळ, त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम करतानाही खेड्यापाड्याचा, झोपडपट्ट्यांमधील अतिवंचितांच्या हिताचा विचार करणारे रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांनी हे जबाबदारीचे भान मुलांमध्ये रूजवले. कमलताईंनी त्याला पैलू पाडले. यामुळेच ‘बार’ आणि ‘बेंच’वर काम करताना न्या. गवई चाकोरीबाहेरचा विचार करीत आले. काहीवेळा न्यायदानाची चाैकट मोडली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून त्यांचा एक महिन्याचा पगार पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथाश्रमाला दान देताना त्यांनी परंपरेचा बाऊ केला नाही.  न्या. गवई यांचा बहुमान महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. 

आधी मुंबई प्रांत किंवा नंतर महाराष्ट्राचा झेंडा न्यायव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी फडकविणारे न्या. हिरालाल कनिया, न्या. यशवंत चंद्रचूड, न्या. पी. एन. भगवती, न्या. एस. एच. कपाडिया आदी थोरांच्या पंक्तीत न्या. गवई यांचे नाव जोडले गेले आहे. त्यातही न्या. शरद बोबडे, न्या. उदय लळीत व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पाठोपाठ गेल्या पाच वर्षांमध्ये सरन्यायाधीश बनणारे न्या. गवई हे चाैथे मराठी न्यायमूर्ती आहेत. वकिली किंवा न्यायदानाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडू पाहणाऱ्या अनेकांसाठी गवई यांच्या नियुक्तीने प्रेरणा मिळेल. न्यायालयात तुंबून पडलेले लाखो खटले, उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची रिक्तपदे, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यात दिरंगाई, न्यायव्यवस्थेत पायाभूत सुविधांची कमतरता आदींची जाण त्यांच्या मुलाखतींमधून स्पष्ट झाली आहे. 

न्यायाला मानवीय चेहरा देणारे, सामाजिक न्यायाचे अग्रणी, जनहित याचिकांचे संकल्पक न्या. व्ही. आर. कृष्ण अय्यर, ‘पीआयएल’ संकल्पना मुख्य प्रवाहात आणणारे व न्यायपालिकेच्या स्वायत्ततेचा आग्रह धरणारे न्या. पी. एन. भगवती, ‘विशाखा गाइडलाइन्स’च्या रूपाने लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणारे न्या. जे. एस. वर्मा किंवा सामाजिक सर्वसमावेशकतेवर भर देणारे पहिले दलित सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन आदींचा वारसा न्या. भूषण गवई पुढे नेणार आहेत. यासाठी त्यांना शुभेच्छा !

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय