शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

कंगना नव्हे, हे कर्मवीर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 08:43 IST

साहजिकच पद्म पुरस्कार चर्चेत आले आहेत. तसे ते कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमीच चर्चेत येत असतात.

कंगना रनौत नावाच्या अभिनेत्रीने महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधाऱ्यांना खुश करण्याच्या नादात कंगनाने ‘१९४७ साली मिळाले होते ते स्वातंत्र्य नव्हते, तर भीक होती अन् खरे स्वातंत्र्य २०१४ सालीच मिळाले’ असे वक्तव्य केल्यामुळे स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हजारो स्वातंत्र्यवीरांचा, घरादारावर तुळशीपत्र ठेवून देश परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या, तुरुंगवास भाेगलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा नक्कीच अवमान झाला आहे. तिचा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी होत आहे. तिच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमाखाली जागोजागी पोलीस तक्रारी दाखल होताहेत.

साहजिकच पद्म पुरस्कार चर्चेत आले आहेत. तसे ते कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमीच चर्चेत येत असतात. या पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये सिनेमा व खेळात कामगिरी नोंदविणाऱ्यांचा भरणा असतो. त्यामुळे तोकड्या कपड्यांवर बीभत्स नृत्य करणाऱ्या नायिका किंवा नको त्या जाहिराती करून पैसे कमावणारे खेळाडू व कलावंतांनाच का पुरस्कार मिळतात, असे विचारले जाते. खरे तर या मंडळींकडे पैसा खूप आलेला असतो. त्यांना हवी असते प्रतिष्ठा व ती या पुरस्काराच्या रूपाने मिळत असल्याने त्यासाठी सत्तेजवळ जाण्यासाठी सारे काही करण्याची त्यांची तयारी असते. तेव्हा कंगना किंवा गेला बाजार अन्य कुणामुळे तरी या पुरस्कारांची बेअदबी होत असताना केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जो नवा स्तुत्य पायंडा पाडला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.

‘कर्मण्येवाधिकारस्ते...’ म्हणत, फळाची अपेक्षा न धरता ध्येयनिष्ठेने काम करणारी, त्यासाठी आयुष्य वेचलेली आपल्या एकशेचाळीस कोटींच्या देशातील अनेक झाकली माणके शोधून काढून त्यांना पुरस्कृत करण्याचा हा नवा रिवाज इतर कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणादायी ठरला नाही तरच नवल.  यंदाचीच ही उदाहरणे पाहा - हरेकला हजाब्बा हा कर्नाटकातल्या मंगलोरजवळच्या एका खेड्यातला साधा फळविक्रेता. एका पर्यटकाशी बोलताना शाळा न शिकल्याने झालेले नुकसान त्याच्या लक्षात आले अन् आपल्या गावातल्या पुढच्या पिढ्या तरी अशिक्षित राहू नयेत या ध्येयाने, जिद्दीने त्याने फळविक्रीच्या छोट्याशा व्यवसायातून कमावलेला पैसा गावात शाळा उभी करण्यासाठी वापरला. तुलसी गौडा ही कर्नाटकातल्याच अंकोल्याजवळच्या खेड्यातली वृद्धा. जंगलतोडीने होणारे पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी तिने तब्बल तीस हजार झाडे लावली.

लडाखमध्ये एकहाती ४० किलोमीटरचा रस्ता बांधणारे छुरूतील छोंजोर, बुटक्या लोकांमधील न्यूनगंड दूर करून त्यांना जागतिक क्रीडा स्पर्धेपर्यंत नेणारे व पाचव्या डॉर्फ ऑलिम्पिकमध्ये देशाला सतरा पदके मिळवून देणारे के. वाय. वेंकटेश, मेघालयात हळदीच्या विशिष्ट वाणाचा प्रसार करून त्याद्वारे हजारो कुटुंबांमध्ये समृद्धी आणणाऱ्या श्रीमती त्रिनिती सायवू किंवा हजारो बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करून आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर त्यांचा सन्मान जपणारे जतिंदरसिंग शन्टी, आयोडिन मॅन ऑफ इंडिया म्हणविले जाणारे डॉ. चंद्रकांत पांडव, सेंद्रिय खतांच्या प्रसार करणाऱ्या श्रीमती रंगामल्ल उपाख्य पप्पामल्ल असे कितीतरी लोक यंदाच्या पद्म पुरस्कार सोहळ्याचे खरे आकर्षण होते.  टेराकोटा शिल्पकलेच्या संवर्धनासाठी झटणारे शिल्पकार तामिळनाडूमधील व्ही. के. मुनुस्वामी किंवा चामड्यापासून बनविलेल्या कठपुतळी खेळाची जोपासना करणारे आंध्र प्रदेशातील अनंतपूरचे डी. चलापथी यासारखे अनेक पारंपरिक कारागीर, लेखक, कवी, लोककलावंत आदींनी यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला बहर आला.

महाराष्ट्रही यात मागे नव्हता. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील बीजमाता राहीबाई पोपेरे किंवा याच जिल्ह्यात हिवरे बाजारच्या रूपाने कधीकाळी दुष्काळामुळे उजाड झालेल्या गावात सर्वांगीण विकासाचे माॅडेल उभे करणारे पोपटराव पवार अथवा अनाथांना आधार देणाऱ्या सिंधूताई सपकाळ, भटक्या विमुक्तांसाठी आयुष्य वेचलेले गिरीश प्रभुणे, आपल्या लिखाणातून वंचितांना वाचा देणारे नामदेव चं. कांबळे ही नावे तर महाराष्ट्रात सर्वदूर परिचयाची आहेतच. अशा ध्येयवेड्यांना देशाने सलाम केला. कंगनासारख्यांची वक्तव्ये आज-उद्या विस्मृतीत जातील. त्यामुळे कलंकित व्हावे इतके या कर्मवीरांचे कार्य क्षुल्लक नाही. पुढच्या शेकडो पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील..

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौत