शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

चला, सगळे मिळून महाराष्ट्राचा बिहार करू या..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 07:11 IST

‘प्रभू श्रीरामचंद्रांचे निस्सिम भक्त हनुमान यांना अचानक आलेले महत्त्व’ यावर आपण सांस्कृतिक परिसंवाद घेतले पाहिजेत.

अतुल कुलकर्णी

प्रिय अमित देशमुखनमस्कार. आपण राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहात. सध्या आपल्या राज्यात जे सांस्कृतिक आदानप्रदान सुरू आहे, त्याला तोड नाही. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात जेवढे भव्यदिव्य कार्यक्रम झाले नसतील तेवढे सध्या सुरू आहेत. त्याला आता अध्यात्माची जोड मिळाली आहे. कोणी हनुमान चालीसा वाचत आहेत... कोणी श्रीरामाचा जप करत आहेत... तर कोणी परिस्थितीला शरण जात ‘श्रीराम जय राम, जय जय राम..’ असेही म्हणत आहेत...! आपण सांस्कृतिक मंत्री झाल्यापासून राज्यात हे जे उपक्रम सुरू झाले आहेत त्याची दखल घ्यायला हवी. असे करणाऱ्यांचे गावोगावी सत्कार करायला हवेत... पण आपण असे काही करताना दिसत नाहीत...

‘प्रभू श्रीरामचंद्रांचे निस्सिम भक्त हनुमान यांना अचानक आलेले महत्त्व’ यावर आपण सांस्कृतिक परिसंवाद घेतले पाहिजेत. साऊथच्या सिनेमांमधून हिट अँड हॉट भूमिका करणाऱ्या खा. नवनीत कौर राणा यांना आपण या परिसंवादाचे अध्यक्ष केले पाहिजे... गुगलवर त्यांचे नाव आणि फोटो सर्च केले की, त्यांचे नको ते फोटो येतात ते तातडीने काढून टाकले पाहिजेत, कारण त्या आता हनुमानाच्या निस्सीम भक्त झाल्या आहेत... सर्वपक्षीय नेते गावोगावी चौकाचौकात हनुमान चालीसा म्हणत आहेत. तेव्हा आपण सांस्कृतिक विभागाच्या वतीने हनुमान चालीसाला गाण्याची चाल लावण्यासाठीची स्पर्धा घेतली पाहिजे. नाहीतरी आपल्याकडे गाजलेल्या हिंदी गाण्यावरून नेत्यांची, देवाधर्माची गाणी करण्याची परंपरा आहेच की...

त्यासोबतच चालत्या गाडीवर धावतपळत जाऊन दगड कसे भिरकवायचे... एकमेकांना शिव्याशाप कशा द्यायच्या... जोरजोरात शंख कसा फुंकायचा... आमच्या वाटेला येऊन तर बघा, अशी वाक्ये कोणत्या टायमिंगला वापरायची...  स्वतःचे घरदार सोडून दुसऱ्याच्या घरापुढे जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा करून, वकूब नसतानाही अमाप प्रसिद्धी कशी मिळवायची... संदर्भहीन विधाने कशी करायची... या विषयावरसुद्धा आपल्या सांस्कृतिक खात्यातर्फे विविध परिसंवाद, चर्चासत्रांचे राज्यभर आयोजन केले पाहिजे... जेणेकरून अनेक लोक या क्षेत्रात पारंगत होतील... बाबा आमटे, अण्णा हजारे, प्रकाश आमटे, अभय बंग, पोपट पवार यांसारखे सामाजिक कार्य करणारे लोक आणि त्यांना मिळणारी फुटकळ प्रसिद्धी यामुळे महाराष्ट्र कितीतरी मागे राहिला, असे आपल्याला वाटत नाही का..? यापुढे भविष्यात रवी राणा, नवनीत कौर राणा, किरीट सोमय्या, संजय राऊत, किशोरीताई पेडणेकर अशा लोकांना भरघोस प्रसिद्धी कशी मिळते यासाठी शोधनिबंधांचे नियोजन केले पाहिजे. भविष्यात तरुण पिढीला हे शोधनिबंध कामाला येतील... त्यावर डॉक्टरेट मिळवणेदेखील सोपे जाईल... 

अमितजी, आपण आता जरा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार केला पाहिजे, असे आपल्याला वाटत नाही का...? नुसती बडबड करून, मोठमोठी पाठांतर केलेली भाषणे करून आमदारकी मिळवता येते हाही एक कलाप्रकार आहे. यासाठी अमोल मिटकरी यांच्या भाषणांची मालिकाच आपल्या विभागातर्फे ठेवली पाहिजे. कोणतीही विकास कामे न करता, लोकांचे प्रश्न न सोडवता, नुसत्या भाषणांवर आपले दुकान कसे चालवावे हा सध्याच्या काळातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्या विभागाकडून तो दुर्लक्षित राहू नये म्हणून काय करता येईल, यासाठी एखादी समिती नेमता का..? या समितीत महाराष्ट्रातले वाचाळवीर नेते घ्या, म्हणजे अवघा महाराष्ट्र पोपटासारखा बोलायला लागेल. या बोलण्यातून भविष्यात वीजनिर्मितीही करता येईल का, याचाही विचार करता आला पाहिजे... दूरदृष्टी यालाच म्हणतात हे लक्षात ठेवा..!

आपण या गोष्टी केल्या की इतर राज्य आपले अनुकरण करायला पुढे येतील... भर उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी वणवण... पेट्रोलची दरवाढ... महागडे शिक्षण... ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून झोळीत बाळंतिणीला नेणे... असे किरकोळ विषय दूर ठेवायचे असतील तर आपल्या विभागाला खूप काम करावे लागेल. तेव्हा आता एक विस्तृत धोरण तयार करून त्याला सर्वपक्षीय मान्यता मिळवून घ्या... औषधाच्या गोळीपेक्षा धर्माची गोळी जास्त परिणामकारक असते, हेदेखील आपण वैद्यकीय शिक्षणमंत्री या नात्याने तमाम जनतेला पटवून दिले पाहिजे..! महाराष्ट्राचे राजकारण अराजकाच्या तोंडावर आहे असे ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांना सब झूट हे, असे सांगता आले पाहिजे... आता केवळ आपल्या विभागाकडूनच सगळ्यांना अपेक्षा आहेत. तेव्हा आळस झटका... कामाला लागा... महाराष्ट्रात इरसाल शिव्या देणारी, बेताल बडबड करणारी, फुटकळ गोष्टीतून अमाप प्रसिद्धी मिळवणारी, जनतेच्या सुखदुःखाची घेणे-देणे नसणारी... जातीपातीवरून तणाव निर्माण करणारी, एक दुसऱ्यांना पाण्यात पाहणारी, सुसंस्कृत तरुण पिढी आपल्याला घडवायची आहे हे विसरू नका..! हे स्पर्धेचे युग आहे. आपल्याला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे, हे लक्षात ठेवा... उत्तर प्रदेश, बिहार यांच्या पंक्तीत आपल्याला जायचे आहे हे लक्षात ठेवा....जय हिंद..! जय महाराष्ट्र..!!! आपलाच बाबुराव