डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
दुसऱ्याला नष्ट करण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो, असेच त्या देशाबद्दल जगाचे मत झाल्यामुळे या देशाकडे कायम संशयानेच पाहिले जाते. गेल्या आठवड्यात चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी तिबेटमध्ये यारलुंग सांगोपा नदीवर जगातल्या सर्वात मोठ्या धरणाचे भूमिपूजन केले. त्यानंतर भारतापासून बांगलादेशपर्यंत सगळ्यांना एका चिंतेने ग्रासले आहे : या धरणाचा उपयोग नवे हत्यार म्हणून चीन करणार नाही ना?
त्यामागे कारण आहे. तिबेट ओलांडल्यानंतर यारलुंग सांगोपा नदी भारतात ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणून ओळखली जाते. हिमालयातील कैलास पर्वतावर उगम पावलेली ही नदी सुमारे २९०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते. भारतात ब्रह्मपुत्रा ९९६ किलोमीटर इतके अंतर वाहते. गेल्या काही वर्षांत या नदीचा प्रवाह कमी झाल्याने चीन काहीतरी खोडसाळपणा करत असला पाहिजे, अशी शंका येऊ लागली. ज्या धरणाचे भूमिपूजन झाले, तो चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या स्वप्नातील प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. तिबेट आणि भारताच्या सीमेजवळच्या या धरणामुळे पर्यावरण उद्ध्वस्त होईल. जगभरातील पर्यावरण शास्त्रज्ञ या धरणाला विरोध करत आहेत. या धरणामुळे तिबेट तर नष्ट होईलच, पण भारत आणि बांगलादेशातील खालच्या सखल भागातही त्याचा वाईट परिणाम होईल. उपग्रह प्रतिमा तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी हे धरण कोठे बांधले जाणार आहे, ते सूचित केले आहे. हे स्थान अरुणाचल प्रदेशाला लागून आहे. त्यात पाच जलविद्युत केंद्रे उभारली जातील, असे चीनचे म्हणणे. हे धरण बांधण्यासाठी जवळपास १४,४७३ अब्ज रुपये खर्च होणार असून, हे धरण हरित ऊर्जेसाठी असल्याचा चीनचा दावा आहे. परंतु, भारताला मुळीच तसे वाटत नाही.
भारतीय विशेषज्ञ चीनच्या या धरणाकडे एक नवे हत्यार म्हणून पाहतात. धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर चीन आपल्या मर्जीने पाणी सोडेल. चीन जगात कुणाचे ऐकत नाही. वाटेल तेव्हा तो ब्रह्मपुत्रेच्या पट्ट्यात दुष्काळ पाडेल आणि वाटेल तेव्हा पूर आणेल. वैज्ञानिक या धरणाकडे ‘वॉटर बॉम्ब’ म्हणून पाहतात. चीनने एकदम सगळे पाणी भारताच्या दिशेने सोडून दिले तर काय होईल? अरुणाचल प्रदेशपासून आसामपर्यंत पूर येतील. अशा परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी भारताने आतापासून तयारी सुरू केली पाहिजे, असे जाणकार म्हणत आहेत.
चीनवर अशी शंका घेण्यास सबळ कारणे आहेत. कोविडच्या स्मृती अजून पुसलेल्या नाहीत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील दीड कोटीपेक्षा जास्त लोकांचे प्राण घेतले. कोरोनाचा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेत निर्माण केला गेला, अशी शंका जगाला अजूनही येते. ली वेनलियांग या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम या विषाणूच्या प्रकोपाची माहिती दिली. त्याला चिनी पोलिसांनी अडवले होते. नंतर तो स्वतःच कोरोना विषाणूचा शिकार झाला.
आणखी एका घटनेची आठवण देतो. ६ ऑगस्ट २०१०. ठिकाण लेह. या भागात निळ्याशार आकाशात विहरणारे ढग मोठ्या प्रमाणावर दिसतात. वर्षांत तेथे चार इंचापेक्षाही कमी पाऊस होतो. नोव्हेंबरपासून एप्रिल महिन्यापर्यंत या भागात बर्फाची मोठी चादर पसरली जाते. पाऊस मात्र नेहमीच कमी होतो. लडाख प्रदेशाला शीत वाळवंट म्हटले जाते. लेह हे लडाख प्रदेशातील शहर आहे. २०१० मध्ये तेथे अचानक दोन तासात १४ इंचापेक्षा जास्त पाऊस झाला. तेथील डोंगरं ठिसूळ आहेत आणि इतका पाऊस कधी होत नाही. त्यामुळे तो पाऊस एखाद्या संकटासारखा कोसळला आणि २५० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. शेकडो जखमी झाले. आता ढगफुटीमध्ये चीनची भूमिका काय असू शकते?
एक घटना आठवा : २००८ चे बीजिंग ऑलिम्पिक. हवामानतज्ज्ञ सांगत होते की, उद्घाटन समारंभावेळी पाऊस होऊ शकतो. सर्वजण चिंतेत होते. परंतु, चीनने सिल्वर आयोडाईडने भरलेले १००० पेक्षा जास्त अग्निबाण ढगांवर डागले आणि बीजिंगपासून दूर त्यांना पाऊस पाडायला लावला. चीनमध्ये ढग त्यांच्या मर्जीने पाऊस पाडू शकत नाहीत. या देशानेच लेहमध्ये ढगांना हत्यारासारखे वापरले, अशी शंका आजही घेतली जाते, ती म्हणूनच. नदीचे पाणी ‘वॉटर बॉम्ब’सारखे वापरणे चीनला काय फारसे कठीण आहे? संकट तर भारतावर येणार आहे. हे वॉटर बॉम्ब निकामी करण्याचे मार्ग आपल्याला आतापासून शोधावे लागतील. चीन जगाची महाशक्ती होऊ इच्छितो. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेरिका आणि रशियाने जगाला घाबरवले; चीनही त्याच मार्गाने चालला आहे. मानवतेलाच नख लावायलाही हा देश मागेपुढे पाहणार नाही. परिस्थिती खरोखरच भयावह होत चालली आहे.