शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

इराणी : कहाणी राखेतून रांगोळीची

By admin | Updated: April 3, 2017 00:11 IST

माहीमला नव्यानं सुरू झालेल्या इराण्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय

इराणी हा मुंबईच्या मनाचा कोपरा आहे, हेच माहीमला नव्यानं सुरू झालेल्या इराण्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय. राखेतून काढली गेलेली रांगोळीच जणू! एक बरंय की त्या कारणाने इराण्याच्या दाट पानी कम चहाची दंतकथा उकळती राहणार आहे. तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी सामूहिक उन्मादातून बाबरी मशीद पाडली गेली. त्यानंतरच्या हिंसाचार आणि सशस्त्र कारवाईने शरयू नदी लाल झाली. त्याचे पडसाद देशभरात उमटले. मुंबईही त्याला अपवाद नव्हती. त्यावेळच्या सामूहिक उन्मादाला कसलेच भान नव्हते. माणुसकीचा धर्म वेगवेगळ्या रंगांमध्ये गुंडाळून ठेवला गेला होता. त्यात मुंबईचे वैभव असलेली इराण्याची हॉटेलंही होरपळली. आखाती तेलाचा तवंग झुगारून भारतीय जीवनप्रवाहात बेमालूम मिसळलेल्या विशुद्ध इराण्याला जमावाने भयभीत केले. प्रसंगी इराण्याची हॉटेलं आगीच्या हवाली केली. खरं सांगायचं तर जिच्याविषयी अपार कृतज्ञता बाळगावी अशा इराणी नामक सामाजिक संस्थेशी आपण खूप कृतघ्नपणे वागलो. पण काळाने माणसाच्या निर्दयीपणावर मात केल्याचा एक सुखद अनुभव आता हीच मुंबई घेत आहे. पाव शतकाचे एक छोटेसे आवर्तन पूर्ण होताना मुंबईत एक नवा इराणी उभा राहिला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत मुंबईत नव्याने सुरू झालेलं इराण्याचं हे पहिलं हॉटेल.इराणी हे एका दर्जेदार कल्चरचं आरस्पानी प्रतिबिंब आहे. इराण्यांनी मुंबईकरांना फावला वेळ सस्त्यात विकला. ज्या फाटक्या इसमाला जगात कसलाही आणि कुठलाही मान नाही, त्याची इभ्रत सांभाळली. कफल्लक बेकारांना नवकोट नारायणाची ट्रीटमेंट देणारी असम दुनियेतली ही एकमेव जागा. मुंबईतल्या चार पिढ्यांची मशागत हॉस्पिटॅलिटीच्या या इराणी गालिच्यावर झाली. इराण्याची स्वत:ची मानसिकता भोगण्याची नाही. हे जग नश्वर असल्याचा भाव चेहऱ्यावर चिरंतन बाळगणारा माणूस म्हणजे इराण्याचा मालक. इराण्याच्या गल्ल्यावर लालबुंद गालांचा, टिपिकल मोठ्या नाकाचा आणि निर्विकार चेहऱ्याचा मालक ठाण मांडून असतो. मॅनेजर वगैरे नेमायचा भानगडीत इराणी कधीच पडला नाही. इराण्याचं डेकॉरही कमालीचं टिपिकल. अदृश्य दरवाजे, किमान दोन ठिकाणांहून प्रवेश. एका दारात शिसवी काउंटरचा भला थोरला गल्ला, त्यामागच्या लाकडी कपाटात काचेच्या तावदानांच्या आत मांडलेलं कन्फेक्शनरीचं प्रदर्शन. मेजाच्या चार लाकडी खुरांच्या वर संगमरवरी पाटाचं खोगीर शिवाय भोवताली झोकदार बाकाच्या साध्याच लाकडी खुर्च्या. सगळा मामला शत प्रतिशत पारदर्शक. इराण्याकडे मिळणारी सर्वात मोलाची गोष्ट कुठली, तर निवांतपणा. पंखा, पेपर, माचिस आणि पाणी ही तिथल्या ‘फुकट’च्या पुरुषार्थाची चौकट. मेन्यू काय हा तिथे गैरलागू ठरणारा प्रश्न. कारण हवीहवीशी स्पेस, निवांतपणा, आत्मपरीक्षण, मंथन असला बाबनकशी ऐवज कुठल्या मेन्यूत असूच शकत नाही. दहा-वीस पैसे खाणारा वजनाचा काटा, रफी-लता, मुकेश-मन्ना डे पासून सलीलदा-मदनमोहनपर्यंत अवीट गाणी ऐकवणारे त्याच्याकडले ज्यूक बॉक्स म्हणजे दर्द का इजहार करण्यासाठी सामान्य माणसाला मिळालेलं अनमोल साधन. अनेक वर्षे आपलं ब्रीद सांभाळणारा इराणी स्थित्यंतराच्या लाटेला पुरून उरला. गिरण्यांच्या चिमण्या शांत झाल्या आणि स्क्वेअर फुटाच्या हिशेबात विकासाचा रेटा आला. या रेट्यात अनेकजण वाहून गेले. त्यातही टिकून राहिलेल्या इराण्याला १९९२-९३ च्या दंगलीत धर्मांधतेचा खून सवार झालेल्यांनी लक्ष्य केलं. मंदिर-मशिदीच्या झगड्यात हॉटेल समजून इराणीही जाळला. प्रत्यक्षात आपण हॉटेल नाही, तर आपलं मन जाळलं होतं. या हॉटेलचा मालक अमुक नसून इराणी आहे, हे लिहिण्याची वेळ त्याच्यावर आणली होती. ते करणाऱ्यांना इराण्याचा विश्वधर्म कळलाच नाही. आर्थिक रेट्यातही गर्दीत माणूस एकटा आहे, तोवर इराणी संपणार नाही. इराणी हा मुंबईच्या मनाचा कोपरा आहे, हेच माहीमला नव्यानं सुरू झालेल्या इराण्याच्या निमित्तानं अधोरेखित झालंय. राखेतून काढली गेलेली रांगोळीच जणू! एक बरंय की त्या कारणाने इराण्याच्या दाट पानी कम चहाची दंतकथा उकळती राहणार आहे. मुख्य म्हणजे खुद्द इराणमध्ये असलं इराणी हॉटेल आहे का, याची चिकित्सा लांबणीवर पडली आहे.- चंद्रशेखर कुलकर्णी