शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

भारतासमोर इसिसरूपी दहशतवादाचे संकट!

By admin | Updated: March 9, 2017 03:58 IST

इसिस या दहशतवादी संघटनेचे संकट भारतात इतक्या सहजपणे येईल, असे कोणालाच वाटले नव्हते. कल्याणचे किंवा केरळमधील काही तरुण इसिसमध्ये सहभागी

- संजीव साबडे(समूह वृत्त समन्वयक, लोकमत)इसिस या दहशतवादी संघटनेचे संकट भारतात इतक्या सहजपणे येईल, असे कोणालाच वाटले नव्हते. कल्याणचे किंवा केरळमधील काही तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण ते तरुण भारताबाहेर गेले आणि तिथे इसिसमध्ये सहभागी झाले. पण ती दहशतवादी संघटना भारतात आपल्या कारवाया सुरू करेल, याचा बहुधा केंद्र सरकारलाही अंदाज आला नव्हता. त्यामुळेच मंगळवारी सकाळी मध्य प्रदेशात रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाला, तेव्हाही सुरुवातीला स्थानिक दहशतवादी गटांनी तो घडवला असावा, असेच सर्वांना वाटले होते. पण त्यानंतर उत्तर प्रदेशातून इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून तीन संशयिताना अटक झाली आणि त्यांचे रेल्वे बॉम्बस्फोटांशी संबंध असल्याचे उघड झाले, तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर लखनौमध्ये एका इसिसच्या दहशतवाद्याने पोलिसांवर केलेला गोळीबार आणि त्याला एका घरातून बाहेर काढण्यासाठी १२ तासांहून अधिक चाललेली मोहीम पाहता, आता पोलीस तसेच तपास यंत्रणांना खूपच सतर्क राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत भारतात झालेले दहशतवादी हल्ले आणि कारवाया पाकिस्तानातील गटांनी केलेल्या होत्या. त्यांना भारतातील काही संघटना व व्यक्तींची मदत होती. त्याआधी मुंबईत १९९३ साली झालेले बॉम्बस्फोट पाकिस्तानच्या मदतीने येथील गुन्हेगारी टोळीने घडवून आणले होते. भारतातील काही दहशतवादी कृत्ये बांगलादेशातील अतिरेक्यांनीही केली होती. काश्मीरमधील अनेक कारवाया पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनीच केल्या आहेत. त्यांना काही काश्मिरी लोकांची सक्रिय मदत मिळत असते. काही कारवायांमध्ये काश्मीरमधील तरुणच असल्याचे सर्वज्ञात आहे. पण इसिससारखी आंतरराष्ट्रीय आणि काही देशांना आव्हान देणारी संघटना भारतात पाय पसरू लागली असेल, तर ती निश्चितच चिंतेची बाब म्हणायला हवी. मध्य प्रदेशात रेल्वेमध्ये जो बॉम्बस्फोट झाला, तो मोठ्या क्षमतेचा नव्हता आणि त्यामुळे मनुष्यहानी झाली नाही, हे सुदैव. पण स्फोट घडताच, त्याची छायाचित्रासह माहिती सीरियामधील म्होरक्याला पाठवण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कारवाया करण्याच्या सूचना आणि त्यासाठीचा पैसा त्यांना सीरियातून वा भारताबाहेरून आला होता का, हेही तपासावे लागेल. या प्रकरणात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून दहा जणांना अटक करण्यात आली असली आणि लखनौमधील घरात दडून बसलेला त्यांचा प्रमुख मारला गेला असला तरी इसिसचे काही दहशतवादी या दोन राज्यांमध्ये कारवाया करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली ती तेलंगणच्या तपास यंत्रणांना. त्याआधारेच पुढील कारवाई झाली आहे. दहशतवादी कृत्याचे हे दक्षिण भारतीय मोड्युल असे पोलिसांनी म्हटले आहे. पण अटक करण्यात आलेले दहा जण आणि मारला गेलेला एक हे कोणत्या राज्यातील आहेत, हे पोलिसांनी जाहीर केलेले नाही. त्यांच्यापैकी कोणी याआधी इसिसच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी गेला होता का? की त्यांचे ब्रेनवॉश आॅनलाइनच झाले आहे, हेही उघड केलेले नाही. त्यामुळे आॅनलाइन संपर्क साधून त्यांना अशा कृत्यांमध्ये सहभागी केले जात असेल, तर प्रश्न गुंतागुंतीचा बनू शकतो. मात्र तरुणांना इसिसमध्ये सहभागी करून घेण्यासाठी भारतातही प्रयत्न झाल्याचे यापूर्वी आढळून आलेच आहे. कानपूर रेल्वे अपघातानंतर तो घातपात आहे की काय, अशी शंका व्यक्त झाली होती. तो खरोखरच घातपात असेल आणि त्यातही इसिसचा हात असल्याचे उघड झाले, तर अलीकडील काळात झालेल्या सर्वच रेल्वे अपघातांची नव्याने चौकशी करावी लागेल. लांब पल्ल्याच्या असो की उपनगरी रेल्वे असो, आपल्याकडे त्यात कायम गर्दी असते. तिथे बॉम्बस्फोट वा अतिरेकी हल्ले घडवून आणल्यास मोठी मनुष्यहानी होते. त्यामुळे इसिसचे तेच टार्गेट आहे का, हे तपासावे लागेल. मुंबईत यापूर्वी रेल्वेत बॉम्बस्फोट झाले आहेत आणि मोठी मनुष्यहानीही झाली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा महानगरांमध्ये तर फारच काळजी घ्यावी लागेल. मुळात इसिसला भारतात शिरकाव शक्य का व कसा झाला, हेही शोधून काढायला हवे. त्यासाठी अल्पसंख्याक गटांमध्ये पोलिसांचे खबरी, नेटवर्क असायला हवे. गेल्या काही वर्षांत ते तुटत चालले आहे. पाकिस्तानातील काही गटच इसिसच्या नावाने ही कृत्ये करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या गटांचे इसिसशी उघड संबंध आहेत. त्या संघटनांवर सध्या पाकिस्तानात निर्बंध आहेत. पाकिस्तानवर अमेरिकेचा दबाव वाढत असल्याने. इसिसच्या नावाने भारतात कारवाया केल्या जाण्याची, येथील वातावरण बिघडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित भारतात बंदी असलेल्या सिमी वा तत्सम संघटनाही इसिसच्या नावाने हे करीत असतील. त्यामुळे हा बॉम्बस्फोट खरेच इसिसने घडवला की त्या संघटनेचे नाव घेण्यात आले, हेही समोर यायला हवे. पण वेगळ्या नावाने दहशतवादाचे संकट पुन्हा आपल्यासमोर ठाकले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा मुकाबला सरकार, पोलीस व तपास यंत्रणा आणि आपण सारे कसे करणार, हा खरा कळीचा प्रश्न आहे.