शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

लग्न नको, मूलही नको... परवडतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 10:02 IST

ये लिऊ या चायना इन्स्टिट्यट किंग्ज काॅलेज लंडन येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते चीनमध्ये लिंगभेद मोठ्या प्रमाणावर आहे. नोकरीच्या ठिकाणीही हा भेद प्रामुख्याने दिसून येतो. 

योग्य वयात लग्न होणं, मूल होणं याला भारतात  अजूनही महत्त्व आहेच, तिकडे चीनमध्ये मात्र तरुण मुलींनी योग्य वयात विशेषत: पंचविशीच्या आतच लग्न करावं म्हणून सरकारच मागे लागलं आहे. २५  वर्षांच्या किंवा त्यापेक्षाही कमी वय असलेल्या तरुणींनी लग्न केल्यास त्या जोडप्याला सरकार १,००० युआन (१३७ डाॅलर्स) बक्षीस म्हणून देईल, असं चीनच्या झेजिआंग प्रांतातील चांगशान परगण्यातील स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी wechat या समाज माध्यमावरून जाहीर केलं आहे. चीनमधील तरुण-तरुणींचा मात्र लग्नासाठी नन्नाचा पाढा सुरू आहे. २९  वर्षांची जिंगाई हो चीनच्या  शानक्सी प्रांतातील  शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. जिंगाईने अजून लग्न केलेलं नाही. तिच्या वडिलांनी तिने लग्न करावं म्हणून नाना खटाटोप केले. २०  वेळा लग्नाळू मुलांसोबत तिच्या डेट्स ठरवून दिल्या. जिंगाई त्यापैकी एखाद्याच डेटला कशीबशी गेली. जिंगाईला लग्न महत्त्वाचं वाटत नाही. 

लग्नाचं मनावर न घेणारी जिंगाई ही एकटीच नाही. चीनमधील नागरी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  ३७ वर्षात पहिल्यांदाच २०२३ मध्ये लग्नाच्या नोंदी अतिशय कमी झाल्या आहेत. २०२३ मध्ये आतापर्यंत चीनमध्ये केवळ ६८ लाख इतकेच विवाह नोंदले गेले आहेत. सरकारच्या दृष्टीने लग्नाची ही घसरलेली आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. चीनमध्ये कायदेशीरदृष्ट्या लग्नाचं वय मुलांसाठी २२ तर मुलींसाठी २० वर्षं इतकं आहे. पण २०२२ पर्यंत चीनमधील मुलामुलींच्या  लग्नाचं सरासरी वय २८.६ इतकं झालं आहे. २०२१ पासून चीनचा जन्मदरही घसरत असून तो आता  २.३६ टक्के  इतका झाला आहे. चीनमधील तरुण मुलामुलींना जसं लग्न नको आहे, तसं त्यांना मूलही नको आहे.

ये लिऊ या चायना इन्स्टिट्यट किंग्ज काॅलेज लंडन येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते चीनमध्ये लिंगभेद मोठ्या प्रमाणावर आहे. नोकरीच्या ठिकाणीही हा भेद प्रामुख्याने दिसून येतो. महिला गरोदर राहतात, प्रसूती रजा घेतात, त्यामुळे नोकरीच्या बाजारपेठेत महिलांसाठी असलेल्या राखीव जागांमध्ये घट होते आहे. त्याचा परिणाम तरुण मुलींच्या मानसिकतेवर झाला आहे. लग्न, मूल की करिअर या द्वंद्वात मुली करिअरला प्राधान्य देत आहेत. शिकण्यासाठी गुंतवणूक केलेल्या मुलींना लग्नापेक्षा नोकरी जास्त महत्त्वाची वाटते. 

चीनमधील तरुण मुलंही लग्न, मूल यासाठी नाखूश आहेत. कोरोनाचा उद्रेक, टाळेबंदी त्यामुळे चीनमधील आर्थिक स्थिती खालावलेली आहे. तरुणांमधील बेरोजगारीचा दर २०.८ टक्के इतका झाला आहे. नोकरी शोधण्यासाठी वणवण करणाऱ्या तरुणांमध्ये लग्नासाठी मुली पाहणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे यासाठी काही ऊर्जाच शिल्लक राहत नाही. आपली नोकरी टिकून राहावी,  आपण निरुपयोगी ठरू नये, यासाठी नोकरी हातात असलेले तरुण कामाच्या ठिकाणी ओव्हरटाइम करतात, तो वेगळाच!  नोकरी जाण्याची टांगती तलवार, आर्थिक तंगी यामुळे नोकरी करणाऱ्या तरुणांना लग्न करून, मूल होऊ देऊन आपल्या जबाबदाऱ्या वाढवण्याची अजिबात इच्छा नाही.एकेकाळी चीनची लोकसंख्या वेगाने वाढत होती. ती वाढू नये, नियंत्रित राहावी यासाठी चीन सरकारने एकच मूल या धोरणाची कठोरपणे अंमलबजावणी केली. पण जन्मदर घटतो आहे हे बघून आता हे धोरण मागे पडून चीन सरकार लोकांना तीन मुलं होण्यास प्रोत्साहन देत आहे. ज्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुलं आहेत त्यांना सरकार घर, करात सूट आणि मुलांना शिक्षणाच्या सुविधा पुरवत आहे. 

चीनचा जन्मदर वाढावा, यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या चीन सरकारचे यासाठी कौतुक कमी आणि टीकाच जास्त होते आहे. जिथे तरुण आर्थिक समस्यांचा सामना करतात, नोकरी शोधत वणवण फिरतात तिथे कोण लग्न करण्याचा आणि कुटुंब वाढवण्याचा विचार करेल, असा प्रश्न चिनी तरुण दबक्या आवाजात का होईना विचारत आहेत. सध्याच्या चीनमधील आर्थिक मंदीच्या काळात येथील तरुण-तरुणींना लग्न नको आणि मूलही नको! पैशाचं सोंग आणता येत नाही हेच खरं! 

तुमचे युआन ठेवा तुमच्यापाशी! २५ वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींनी लग्न करावं म्हणून चीन सरकारच्या प्रयत्नांवर टीका होते आहेच, शिवाय  मुलं होऊ देण्यासाठी लवकर लग्न करणाऱ्यांना सरकार १,००० युआन देऊ करत आहे. पण त्या तुलनेत  प्रत्यक्षात मूल जन्माला घालणं, त्याचं पालन-पोषण करणं, त्यांना वाढवणं, यासाठी लागणारा खर्च कैकपट जास्त आहे.  त्यामुळे तुमचे युआन तुमच्यापाशीच ठेवा! असं चीनमधील तरुण उपरोधाने म्हणत आहेत.

टॅग्स :chinaचीन