शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शिक्षणमंत्र्याचे इतिहासज्ञान

By admin | Updated: April 11, 2015 00:42 IST

इतिहास उपसण्यामागे सत्यशोधनाचा हेतू असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. मात्र तसे करण्यामागे त्याला आपल्या वर्तमान राजकारणाच्या गरजा

इतिहास उपसण्यामागे सत्यशोधनाचा हेतू असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. मात्र तसे करण्यामागे त्याला आपल्या वर्तमान राजकारणाच्या गरजा दडविण्याचे एखाद्याच्या मनात असेल तर त्याच्या तशा प्रयत्नांबाबत सावधही झाले पाहिजे. राजस्थानचे प्राथमिक शिक्षणमंत्री वासुदेव देवयानी यांनी अकबराविरुद्ध तब्बल पाचशे वर्षांनी तलवार उपसली असेल तर ती अशाच डोळसपणे पाहिली पाहिजे व त्यांचा तो उपक्रम ऐतिहासिक की राजकीय हे तपासून पाहिले पाहिजे. देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याचे आणि त्यासाठी आजवर चालत आलेला इतिहास बदलण्याचे उद्योग संघ परिवाराने फार पूर्वी सुरू केले आहेत. तसे करताना देशाच्या भूतकाळाला हिंदुत्वाचा भगवा रंग फासण्याचे त्याच्या मनात आहे. देशात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून या प्रयत्नांना वेगही आला आहे. वासुदेव देवयानी या मंत्र्याने याआधी राज्यातील शाळांमध्ये सूर्यनमस्कार आवश्यक केले आहेत. त्याच वेळी इतिहासाच्या पुस्तकातून अकबराची वर्णने काढून टाकायला व कापायलाही त्याने संबंधिताना सांगितले आहे. सगळा मोगल काळच इतिहासातून कसा पुसून काढायचा याच्या प्रयत्नात ते लागले आहेत. त्याही पलीकडे जाऊन आयझॅक न्यूटनसारख्या पाश्चात्त्य संशोधकाची इतिहासाच्या पुस्तकातून हकालपट्टी करण्याचे आदेश त्याने दिले आहेत. गॅलिलिओ ते न्यूटन व पुढे आईनस्टाईन यांच्यापर्यंतच्या संशोधक शास्त्रज्ञांनी जगाच्या विज्ञान व तंत्रज्ञानात केवढी भर घातली याची जाणीव साऱ्यांना आहे. त्यांच्या विषयीचा यथोचित आदरही जगात आहे. परंतु वासुदेव देवयानींना ही सगळी परकी माणसे वाटत असल्याने त्यांचा गौरव हा त्यांना आपल्या मानसिक गुलामगिरीचा भाग वाटतो. तो नाहीसा करण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. विमानांचा शोध ही विसाव्या शतकाच्या आरंभाची देन आहे हे वास्तव जगाने कधीच स्वीकारले आहे. या वासुदेवाला मात्र रामायणातील पुष्पक विमान खरे वाटणारे असून, वर्तमानातले वैज्ञानिक संशोधन त्यापर्यंत नेण्याचा त्याचा इरादा आहे. रामायणातले पुष्पक विमान हा एका दंतकथेचा भाग आहे आणि दंतकथा या विज्ञानातून नव्हे तर कवी व प्रतिभावंतांच्या प्रतिभेतून जन्माला येतात हे ज्यास कळत नाही तो माणूस एखाद्या राज्याच्या शिक्षणमंत्री असणे यापरीस अधिक मोठे त्या राज्याचे दुर्दैवही नाही. दोष या देवयानींचाही नाही. काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणपतीला असलेले हत्तीचे शीर हा प्राचीन काळातील प्लास्टिक सर्जरीचा भाग असल्याचे सांगून स्वत:चे व देशाचे साऱ्या जगात हसे केले होते. गणपतीला हत्तीचे शीर कसे प्राप्त झाले याविषयीची मानववंशशास्त्राची संशोधने आहेत आणि वेदातील पूर्ण मानव शरीरधारी गणपतीला महाभारताच्या उत्तर काळात हत्तीचे शीर कसे ‘चिकटविले’ गेले त्याची कहाणी देवीप्रसाद चट्टोपाध्यायांसारख्या संशोधकांनी लिहिलीही आहे. मात्र ऐतिहासिक सत्याहून वर्तमान राजकारणाला अनुरूप असेच चित्र ज्यांना उभे करायचे असते त्यांना या वास्तवाची चाड नसते. शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलांनाही आता हनुमानाची उड्डाणे ही कवी कल्पना वाटते ही गोष्ट या देवयानींच्या गावी तरी आहे की नाही कुणास ठाऊक? थोर अकबराला लहान करून सांगण्याचा अधिकार प्रत्येकाला जेवढा आहे तेवढाच तो या शिक्षण मंत्र्यालाही आहे. परंतु अकबराच्या राजवटीत प्रथम सारा हिंदुस्थान राजकीयदृष्ट्या संघटित होऊन सुस्थितीत आला याची जाणीव त्यांना आहे काय? ‘तुमचे राज्य मजबूत झाले आता तुम्ही हिंदुस्थानात सक्तीने शरिया लागू करा’ अशी मागणी घेऊन मौलाना जमालुद्दिन या मुस्लीम धर्मपंडिताच्या नेतृत्वात मुल्ला मौलवींचे एक मोठे शिष्टमंडळ अकबराच्या भेटीला गेले होते. त्यांची मागणी फेटाळताना अकबराने या देशाचे धार्मिक स्वरूप आहे तसेच राहील असे त्यांना ठणकावले होते हे तरी त्यांना माहीत आहे काय? त्यामुळे अकबरावर संतापलेल्या धर्मगुरुंनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले तेव्हा ते कठोरपणे मोडून काढून अकबराने एक हजारावर मुल्ला मौलवींना फासावर चढविले होते या सत्याची जाणीव तरी त्यांना आहे काय? पुढे जाऊन अकबराने इस्लामचा त्याग करून ‘दीने इलाही’ हा नवा धर्म स्थापन केला हे तरी त्यांच्या गावी आहे काय? ‘अल्ला हो अकबर’ ही मुसलमान सैनिकांची युद्धघोषणा आपल्या अकबराची नाही. ‘अल्ला’ अमर (अकबर) आहे असे ती सांगते हे तरी त्यांनी समजून घेण्याची तोशीष कधी घेतली आहे काय? इतिहास बदलता येत नाही. बदलता येते ते भविष्य. पण त्यासाठी आपल्या वर्तमानात ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान या आधुनिक शास्त्रांची पेरणी करावी लागते. इतिहासाची क्रमिक पुस्तके बदलूनही इतिहास बदलता येत नाही ही गोष्ट या देवयानींना कळत नसेल तर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी ती त्यांना समजावून सांगितली पाहिजे. नपेक्षा दिल्लीत बसलेल्या, इतिहास, वर्तमान व भविष्य यांचे नाते समजणाऱ्या भाजपाच्या पुढाऱ्यांनी ती त्यांच्या गळी उतरविली पाहिजे. मात्र असेच शिकविले जाणे आणि असाच इतिहास लिहिला जाणे हे त्यांच्या पक्षाचेच धोरण असेल तर मात्र आपल्या देशाला शुभेच्छा देऊन मोकळे व्हायचे आणि ‘सत्यमेव जयते’ या महामंत्राचा उच्चार करायचा एवढेच आपल्यासाठी बाकी राहते.