शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उन्हाचे चटके मोजण्यासाठी हवेत 'हीट इंडेक्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 07:59 IST

केवळ दिवसा नाही, तर रात्रीदेखील उष्णतेची दाहकता (हीट स्ट्रेस) वाढताना दिसते. उष्णतेचे योग्य मोजमाप करायची व्यवस्था तत्काळ उभारणे गरजेचे आहे.

आदित्य चुनेकर, प्रयास ऊर्जा गटअभिराम सहस्रबुद्धे, प्रयास ऊर्जा गट

महाराष्ट्रात फेब्रुवारीपासूनच उन्हाने जोर धरलाय आणि यावर्षीचा उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक तीव्र असायचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत मुंबईत दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा मिळालेला आहे. या अतिउष्णतेमुळे बेशुद्ध पडणे, पुरळ उठणे, स्नायूत गोळे येणे तर उष्माघातामुळे जीवही जाऊ शकतो. अप्रत्यक्षपणे विविध अवयवांवर ताण आल्याने होणारे आजार व मृत्यूंचे प्रमाण हे उष्णतेच्या थेट परिणामांमुळे होणाऱ्या आजार व मृत्यूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात उष्माघाताने ९ मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) यांच्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस (GBD) या अभ्यासानुसार उष्णतेच्या दुष्परिणामांमुळे राज्यात सुमारे १६ हजार मृत्यू (त्या वर्षातील एकूण मृत्यूंपैकी दोन टक्के) झालेले असावेत, असा अंदाज आहे. 

आरोग्याखेरीज इतर सामाजिक आणि आर्थिक बाबींवरही वाढत्या तापमानाचे परिणाम होतात. २०२३ मध्ये उष्णतेमुळे कामगार उत्पादकता कमी झाल्यामुळे भारताने सुमारे १४१ अब्ज डॉलर इतके उत्पन्न गमावले. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक पंखे, कूलर, आणि एअर कंडिशनर वापरतात. ज्यांच्यामुळे विजेची मागणी वाढून विद्युत पुरवठ्यावर ताण येऊ शकतो. जास्त वीजनिर्मितीमुळे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वाढते. कारण भारतातील बहुतेक वीज कोळशापासून तयार होते. हे उत्सर्जन हवामान बदलास कारणीभूत ठरते, ज्यामुळे तापमान आणखी वाढते. तापमानवाढ या जागतिक प्रश्नाची उत्तरे ही स्थानिक पातळीवर शोधावी लागतील. त्यासाठी या प्रश्नाचे स्थानिक स्वरूप योग्यप्रकारे समजून घेणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रातील उन्हाळ्याबद्दल बोलताना आपल्याला नागपूर, चंद्रपूर अशा भागांचीच आठवण येते, जिथे तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाते. पण उष्णतेचा त्रास फक्त तापमानावर आधारित नसतो. हवेतील दमटपणा, वाऱ्याचा वेग, तुम्हाला किती प्रमाणात उष्णतेला सामोरं जावं लागतं, तुमचे सध्याचे आजार आणि अनुकूलन करण्याची क्षमता हे सर्व घटक व्यक्तीच्या आरोग्याला असलेली जोखीम ठरवतात. या सर्व घटकांचा मानवी आरोग्यावर एकत्रित परिणाम मोजण्यासाठी जागतिक स्तरावर काही 'हीट इंडेक्स' विकसित केलेले आहेत. हे हीट इंडेक्स फक्त प्रत्यक्ष तापमानाऐवजी या सर्व घटकांच्या आधारे आपल्या शरीराला किती तापमान भासते, हे मोजतात...

या अनेक हीट इंडेक्सपैकी Universal Thermal Climate Index (UTCI) याचा वापर करून आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्रतेची स्थिती काय आहे, याचा अभ्यास केला. केवळ दिवसा नाही, तर रात्रीदेखील उष्णतेची दाहकता (हीट स्ट्रेस) वाढलेली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ती अधिक आहे. आपल्या शरीराची उष्णता सहन करण्याची क्षमता ही आपल्याला सवय असलेल्या हवामानापेक्षा सद्यपरिस्थितीत किती वेगळी आहे, यावर आधारित असते. म्हणूनच ही असमान वाढ चिंताजनक आहे.

ज्या दिवशी उष्णतेची दाहकता खूप जास्त असते, अशा 'विशेष काळजीच्या दिवसां'नी मागच्या वर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जवळजवळ एक तृतीयांश उन्हाळा व्यापला होता. असे अनेक चिंताजनक दिवस आणि रात्री एकापाठोपाठ एक येताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरीराला थंड होण्यासाठी आवश्यक असलेली उसंत मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम अनेक पटींनी वाढतो. या अभ्यासाबद्दल अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध (http://bit.ly/MHsummer2024). आहे

महाराष्ट्र कोकणपट्टीपासून मध्य भारतातील जंगल क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे. विविध ठिकाणी हवेचा कोरडेपणा, दमटपणा, जंगलांची व्याप्ती, लोकसंख्या आणि तिची घनता, तसेच शहरीकरण यामध्येही मोठा फरक आहे. या सर्व गोष्टींचा हवामानावर आणि लोकांच्या उष्णता सहन करण्याच्या क्षमतेवर किती प्रभाव पडतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक परिस्थितीला अनुसरून स्थानिक हीट इंडेक्स विकसित करायला हवे आहेत. लोकांना उष्णतेच्या जोखमेचा नीट अंदाज देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर उष्णतेचा स्थानिकृत अभ्यास करण्यासाठी आणि लोकांना प्रभावी इशारे देण्यासाठी हवामानाचा डेटा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. भारतीय हवामान खात्याची (IMD) महाराष्ट्रात सुमारे ६० हवामान केंद्रे आहेत. हवामान खाते या केंद्राची संख्या वाढवू शकते आणि हवामानाबद्दलचा डेटा लगेचच (near real time) सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देऊ शकते.

उष्णतेच्या या गंभीर समस्यांचे पद्धतशीरपणे निराकरण करण्यासाठी या दिशेने प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचेदेखील आहे. नाहीतर हा ही उन्हाळा जाईल आणि पुढील वर्षी नेमेचि येतो म्हणत, बहुधा अधिकच तीव्रतेने परत येईल.

aditya@prayaspune.org abhiram@prayaspune.org 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात