शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

‘बाजीराव सिंघम’च्या शोधातली हतबल वणवण

By संदीप प्रधान | Updated: October 13, 2021 14:01 IST

Maharashtra News: सामान्यांना न जुमानणाऱ्या मगरूर व्यवस्थेशी दोन हात करणारे नवनवे ‘सिंघम ’ सतत शोधत रहावे लागणे, हाच खरेतर इथल्या भ्रष्ट व्यवहारांचा सज्जड पुरावा आहे !

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)

शरद पवार आणि कुख्यात दाऊद इब्राहिम याचे घनिष्ट संबंध असल्याचा सनसनाटी आरोप करणारे मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांच्याकडे पत्रकारांनी जेव्हा पुरावे मागितले तेव्हा आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले आणि दुसरे दिवशी ती बातमी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाली. त्यावेळी खैरनार जे बोलत ते छापून येत होते. कारण राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्धच्या लढ्याचे ते आयकॉन बनले होते. गँगवॉर त्याच काळातले. जे जे हॉस्पिटलमधील गोळीबार त्याच जवळपास झालेला. ‘‘तुमचा दाऊद तर, आमचा गवळी’’ ही गर्जना त्याच दरम्यानची !, या व अशा घटनांच्या मालिकांमुळे लोकांना राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने होत असल्याचे दिसत होते. त्या दरम्यान  खैरनार यांच्या रुपाने त्यांना जणू ‘मसिहा’च सापडला. बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचे नाते घट्ट सुशांतसिंग राजपूत या तरुण, उमद्या अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले आणि पाहता पाहता वेगवेगळ्या सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईमुळे समीर वानखेडे या आयआरएस सेवेतील अधिकाऱ्याला वलय प्राप्त झाले. वानखेडे जेव्हा कस्टम्स विभागात होते तेव्हा ड्यूटी भरली नाही म्हणून भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला सुवर्ण चषक त्यांनी अडवून ठेवला होता. वानखेडे यांच्या धडाकेबाज कारवाईची ही पहिली ओळख. पुढे विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा वगैरे सेलिब्रिटींना वानखेडे यांनी विमानतळावर रोखल्याचा इतिहास आहे. विदेशी चलन, सोनेनाणे, महागडी घड्याळे वगैरे घेऊन येणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांना वानखेडे या नावाचा धाक वाटत राहिला. वानखेडे मुंबईतील केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकात दाखल झाल्यावर आतापर्यंत होणाऱ्या कारवायांचे प्रमाण दुप्पट झाले. सुशांतसिंग प्रकरणानंतर वानखेडे यांचा स्वत:च एक सेलिब्रिटी होण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल अशा बड्या धेंडांना तासन् तास बसवून त्यांनी त्यांची चौकशी केली आहे. भारती सिंग, तिचा पती हर्ष आणि आता तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा सुपुत्र आर्यन यांना त्यांनी जेलची हवा खायला लावली आहे. त्यामुळे आता वानखेडेंच्या मागे कॅमेऱ्यांचा, पत्रकारांचा ससेमिरा, मुलाखतींचा सिलसिला सुरु होईल. त्यांना पुरस्कार दिले जातील, भाषणांची निमंत्रणे येतील. ‘अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या बॉलिवूडची नशा-नक्षा उतरवणारा अधिकारी’, अशी त्यांची प्रतिमा  निर्माण करुन मीडिया आत्ताच मोकळा झाला आहे. हळूहळू वानखेडे यांनाही हे सारे आवडू लागेल. प्रसिद्धीच्या लाटेवरील आपले अढळपद टिकवण्याकरिता मग तेही जोमाने अधिक कारवाया करतील. वानखेडे प्रसिद्ध पावले म्हटल्यावर लागलीच त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे व त्यांच्या पथकाची क्रूझवरील कारवाई ही कशी पक्षपाती आहे, याबाबत आरोप केले. जोपर्यंत वानखेडे करतायत ते योग्य आहे, असे बहुतांश जनतेचे पर्सेप्शन आहे तोपर्यंत कुणी कितीही आरोप केले तरी त्यामुळे वानखेडे यांचे काही बिघडणार नाही. एकेकाळी ठाण्यात टी. चंद्रशेखर नावाचे महापालिका आयुक्त होते. त्यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या जमीनदोस्त केल्या आणि रस्ते रुंदीकरण केले. स्थानिक शिवसेना नेतृत्वाशी त्यांचा वाद झाला. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर हेच चंद्रशेखर एमएमआरडीएत गेले. तेथे त्यांचा काँग्रेसच्या नेत्यांशी वाद झाला आणि त्यांनी सनदी सेवेला रामराम ठोकला. अर्थात तोपर्यंत चंद्रशेखर यांचे आधीचे वलय ओसरले होते.-  खैरनार असो की, चंद्रशेखर यांना प्रसिद्धीचे शिखर गाठता आले पण, कालौघात त्यांच्यावर राजकीय शिक्का मारला गेला. खैरनार हे भाजपचे हस्तक म्हणून ओळखले गेले तर, चंद्रशेखर यांना शिवसेनेचे निकटवर्तीय मानले गेले. वानखेडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी ओढवून घेतली आहेच. ‘अर्धसत्य’मधील ओम पुरीचा अनंत वेलणकर असो की, अजय देवगण यांनी साकारलेला बाजीराव सिंघम असो ; आजूबाजूच्या भ्रष्ट व्यवस्थेला विटलेले लोक सतत व्यवस्थेशी दोन हात करणाऱ्या सिंघमच्या शोधात असतातच. लोकांनी निवडलेला सिंघम हा शंभर टक्के निष्पक्ष, प्रामाणिक असतोच असेही नाही. पण, लोकांना तो सिंघम वाटतो व काही काळ तरी लोक त्याची पूजा करतात. सामान्य नागरिकांना सतत व्यवस्थेशी दोन हात करणारे ‘सिंघम’ सतत शोधत राहावे लागणे, हाच खरेतर आपल्या भ्रष्ट व्यवस्थेचा सज्जड पुरावा आहे !

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण