शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

'मैत्री' जपणारी 'प्रेमवेडी' रेखा Happy birthday...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 08:04 IST

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला आणि मैत्री झाल्यावर मागे पुढे न पाहता मनापासून मैत्री जपणारी, मदतीला धाऊन जाणारी आणि दिलेला शब्द पाळणारी रेखा मी वेळोवेळी अनुभवली आहे.

- महेश टिळेकर, निर्माता, दिग्दर्शकजिच्या वयालाही तिच्या सौंदर्याचा हेवा वाटावा अशी केवळ बाह्य रुपानेच नाही तर मनानेही तितकीच सुंदर असणारी माझी सौंदर्यवती मैत्रीण  रेखा.जस जसं वय वाढेल तसा रूपाचा देखणेपणा कमी होतो हा निसर्ग नियमच आहे पण साैंदर्य टिकवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्या बाबतची जागरूकता या दोन गोष्टींमुळे अलीकडच्या काळात फार सिनेमांत न दिसूनही रेखा भोवतीचे प्रसिद्धीचे वलय अर्थात ग्लॅमर जराही कमी झालेले  नाही. आताच्या पिढीतील अनेक हिरोईन, हिरोंना रेखाच्या सौंदर्याचं नेहमीच कुतूहल आणि कौतुक वाटतं राहिलं आहे. सुरुवातीच्या काळात तिला दिसायला सावळी म्हणून नाकारणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीला स्वतःमध्ये बदल घडवून साैंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर सर्वांनाच तिने तिची दखल घ्यायला भाग पाडले.तिची एक झलक पाहायला मिळावी म्हणून लाखो चाहत्यांचे डोळे आतुर असतात, तिचा एक तरी फोटो क्लिक करता यावा म्हणून प्रेस, मिडियाचे तिच्या मागे ’दिवाना’ झालेला पाहायला मिळतो.मी मात्र नशीबवान की अश्या ह्या रूपवान, गुणवान आणि हुशार अभिनेत्री बरोबर माझी मैत्री आहे. जिच्या पर्यंत पोहोचणं आणि तिला भेटायला मिळणं हे अनेकांसाठी स्वप्नं आहे अश्या या रेखाचा सहवास, आशीर्वाद, प्रेम मला मिळणं ही मला वाटतं माझ्यावर परमेश्वराने केलेली कृपा आहे. इतर चारचौघांसारखा मी पण रेखाचा तरुणपणापासून फॅन. पुढे चित्रपटसृष्टीत काम करू लागल्यावर खूपदा मनात विचार येई रेखाला भेटायची संधी कधी मिळेल आपल्याला? तसं दोन तीनदा हिंदीतल्या पुरस्कार समारंभाला तिचं दुरून ओझरते दर्शन झाले. पण तिच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलायला मिळणं सोपं नव्हतं. तिच्या आजूबाजूला असलेली सिक्युरिटी, तिचे फोटो काढायला मिळावेत म्हणून धडपड करत एकमेकांना धक्काबुक्की करणारे फोटोग्राफर आणि प्रेस मिडियाचे रिपोर्टर पाहून घाम सुटला होता आणि कळून चुकल की’ ये अपने बसकी बात नही’. पण निराश होऊनही पुन्हा उभारी घेत मी मनाशी ठरवलं की ’अपना भी टाईम आयेगा’ आणि तो टाईम, ती वेळ यावी म्हणून मी प्रयत्न सुरू केले. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील काहींनी मला सांगितलं होतं की ”रेखा तक पहुंचना बहोत मुश्किल है ,अगर पहुंच गए तो निकलना उससेभी मुश्किल है”. ही ’मुश्किल’गोष्ट आसान करण्यात मला मात्र एकदाचे  यश आले.

काही वर्षांपूर्वी माझा संपर्क झाल्यावर रेखाने घरी भेटायला बोलवले. मी सांगायच्या आधीच माझ्याबद्दल सगळी माहिती तिने आशाताई भोसले आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील काही व्यक्तीनं कडून अगोदरच मिळवली होती. माझ्या ’मराठी तारका’कार्यक्रमाच्या शंभराव्या शो ला तिने गेस्ट म्हणून यावे अशी मी इच्छा व्यक्त केली. खरं तर कार्यक्रमाला एक आठवडाच बाकी होता. त्यामुळे इतक्या कमी दिवसात ती हो म्हणेल का याची शंका होती. पण तिने होकार देऊन मला धक्काच दिला. कार्यक्रमाला ती आल्यावर बसायची काय व्यवस्था आहे? सोफा आहे की खुर्ची? तिचा हा प्रश्न ऐकून मी जरा चक्रावून गेलो आणि वाटलं मोठ्या आर्टिस्टचे मोठे नखरे असणार. याआधी माझ्या कार्यक्रमाला अनेक गेस्ट येऊन गेले पण कुणी तिथं आल्यावर बसायला काय आहे हे विचारले नव्हते. मला जरा गोंधळलेला पाहून तिने लगेच सांगितले की बसायची व्यवस्था काय आहे त्याप्रमाणे तिला चप्पल घालता येईल. जर सोफा असेल तर उंच हिल्सच्या चप्पल घालून नीट बसता येणार नाही.खुर्ची असेल तर हिल्स नसलेल्या चपला घातल्या तर व्यवस्थित बसता येते. कार्यक्रमाला जास्त वेळ बसायचं तर बसताना कंफर्टेबल बसता आलं पाहिजे. तिचं हे उत्तर ऐकून मी विचारात पडलो की किती बारीक गोष्टींवर ही लक्ष देते.कार्यक्रमाला दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच रेखा हजर होती. कार्यक्रमाला आशाताई भोसले आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा उपस्थित होते. रेखाने मात्र तिच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण ’रेखामय’ केले. भाषणात अजितदादांनी ”माझे दोनच आवडते कलाकार आहेत ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा”. असं सांगितल्यावर लाजलेल्या रेखाच्या चेहऱ्यावरचे भाव शूट करण्यासाठी फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्यात चढाओढ सुरू झाली आणि त्यांना ब्रेकिंग न्यूज मिळाली.
कार्यक्रमानंतर तिला गिफ्ट देण्यासाठी मी तिच्या घरी गेलो. आधी तिने नकार दिला आणि पुन्हा मी तुमच्या कार्यक्रमाला येईन तेव्हा गिफ्ट घेईन असं म्हणाली. मी मात्र खूप आग्रह केला आणि फार मोठी वस्तू नाही तर साडी आहे, ती तिनं स्वीकारावी म्हणून विनंती केली. मग मात्र ती तयार झाली गिफ्ट घ्यायला. मी आनंदाने तिच्या समोर पटकन उभा आडवा गिफ्ट पेपर फाडून बॉक्समधील साडी तिला दाखवली. ती ज्या प्रकारच्या मोठी बॉर्डर असलेल्या साड्या नेसते तशीच मी दिलेली साडी पाहून ती जास्तच खुश झाली. "महेशजी आपको मेरी पसंद का अंदाजा है" म्हणत तिने माझी तारीफ केली. कुठल्याही समारंभासाठी एकदा नेसलेली साडी ती किमान एक दोन वर्षे तरी पुन्हा नेसत नाही हे मला समजले. आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलताना तिने मी अस्ताव्यस्त फाडलेल्या गिफ्ट पेपरची, एखाद्या रुमालाची घालावी तशी  नाजूकपणे घडी घातली. उलगडून पाहिलेली साडी, आधी जशी घडी होती तशीच घडी घालून बॉक्समध्ये ठेवली. नीटनेटकेपणा फक्त तिच्या अभिनयातच नाही तर कामातही आहे, ते पाहून माझा तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.पुढे आमची मैत्री वाढत गेली तसे तिच्या व्यक्तिमत्वाचे आणखी पैलू मला उमगत गेले. ती गाते छान, तिचं गाणं ऐकणं हा एक सुखद अनुभव असतो आणि हुबेहूब काही कलाकारांचे आवाज काढण्याची उत्तम कलाही तिला अवगत आहे. अशी ही हरहुन्नरी रेखा बागबान सिनेमात हेमामालिनी ऐवजी जर असती तर तिनं त्या भूमिकेचं ’सोनं’ केलं असतं असं मला नेहमी वाटतं.
  रेखा समोर तर मी कुणीच नाही, पण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला आणि मैत्री झाल्यावर मागे पुढे न पाहता मनापासून मैत्री जपणारी, मदतीला धाऊन जाणारी आणि दिलेला शब्द पाळणारी रेखा मी वेळोवेळी अनुभवली आहे. मी असे ही काही स्वतःला सेलिब्रिटी म्हणून घेणारे कलाकार पाहिलेत की जे स्वतःची लेव्हल खूप मोठी आहे ह्या भ्रमात राहून फेसबुक, इंस्ट्टावर पण फक्त आपल्या लेव्हलच्याच कलाकारांच्या पोस्टला लाईक देतात. अशी आपली बरोबरी पाहून मैत्री करणाऱ्यांची कीव येते.प्रेमात अनेकदा विश्वासघात होऊनही रेखा खंबीरपणे उभी राहिली आहे. स्वतःचं अस्तित्व कामातून दाखवून टीका करणाऱ्यांची तिने कधीच पर्वा केली नाही. माझं बायपास ऑपरेशन झाल्याचं समजताच रेखा भेटायला तर आलीच पण त्यानंतरही वेळोवेळी फोन करून ”अभी आप पेहलेसे ज्यादा जवान हुये है इसलिये बहोत काम करना है आपको, जलदिसे ठीक हो जाईये” असं बोलून ती धीर द्यायची. याच्या अगदी उलट अनुभव माझ्याच कार्यक्रमात नेहमी असणाऱ्या एका मराठी अभिनेत्रीचा आला. जी माझ्या ऑपरेशनचे समजताच ना मला भेटायला आली की नंतरही कधी साधा फोन करून तिला विचारपूस करावी वाटली. आधी वाटले की कदाचित ती बिझी असेल म्हणून नसेल जमलं, पण वेळोवेळी फेसबुकवर कविता लिहून त्या पोस्ट करायला मात्र तिच्याकडे वेळ होता. तिच्या घरातील व्यक्तीचे निधन झाल्याचे समजताच आठवणीने मी केलेला फोनही ती विसरली. एकत्र काम करूनही कामापुरते आणि फायद्यापुरते मैत्री ठेवणारे ’व्यवहारी कलाकार’पाहिले की असं वाटतं यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी असणारी रेखा, जिला माझ्यापासून ना कोणता फायदा, ना मी तिच्या बरोबरीचा कुणी मोठा प्रसिद्ध व्यक्ती. तरीही ती मैत्री जपणारी.
माझ्या ’मराठी तारका’ शो ला तेरा वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला रेखा आणि कंगना राणावत दोघींना मी निमंत्रण दिले. रेखाने पूर्वी शंभराव्या मराठी तारका शो ला आल्यावर तिने मला दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. त्यावेळी स्टेजवर भाषणात तिने जाहीरपणे सांगितले होते की पुन्हा जेंव्हा मी या कार्यक्रमाला येईन तेव्हा  ह्या तारकांच्या सारखं एखादं पूर्ण नृत्य करेल. त्या शब्दाची पुन्हा तिनेच मला आठवण करून दिली आणि विचारलं की आता मी कोणता डान्स करायचा आणि कधी रिहर्सल सुरू करायची ते ठरवून मला सांगा. माझ्यामुळे तुम्हाला चॅनलकडून चार पैसे जास्त मिळून तुमचा फायदा झाला तर मलाही आनंद होईन. तिचं हे बोलणं ऐकल्यावर तिच्या मनाचा मोठपणा आणि आपल्या माणसाचा फायदा व्हावा म्हणून असलेली तळमळ मला दिसली. चॅनेलला जेवढं फुकटात गोष्टी मिळतील त्या हव्याच असतात म्हणून मी हातचा एक्का जरा राखूनच ठेवला. पण रेखाने जरी पूर्ण नृत्य करण्याची संधी तिला मिळाली नाही तरी ती कसर तिने कार्यक्रमाला आल्यावर भरून काढली. स्वतः बरोबर कंगनालाही काही क्षण नाचवून  माझ्या शो ची  तिने उंची वाढवली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक अभिनेत्रीला ती प्रेमाने भेटली. ऑडीएन्समधून तिला जेव्हा स्टेजवर घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा तिच्याच ’सिलसिला’ चित्रपटातील ये कहा आगये हम ह्या गाण्याच्या सुरवातीच्या अमिताभ बच्चनच्या आवाजातील ’मै और मेरी तनहाई अक्सर.... या ओळी  रेकॉर्डवर सुरू झाल्या तश्या सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा उत्सुकतेने रेखावर गेल्या की ती काय प्रतिक्रिया देईन. पण रेखाने मात्र हसून मला विचारले ”महेशजी आपको बस यही एक गाना मिला”. त्यानंतर हशा आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.याच कार्यक्रमाला माझे आई बाबा पण आले होते, असे मी दुसऱ्या दिवशी फोनवर बोलताना सहज रेखाला बोलून गेलो. त्यावर माझी का नाही त्यांच्याशी भेट करून दिली असे तिने विचारले. तिथे प्रेक्षकांची प्रेस, मीडियाची गर्दी असल्यामुळे मी आई बाबांशी भेट करून द्यायचे टाळले होते.
दोन दिवसांनी रेखाने फोनवर चौकशी केली की आई बाबा इथेच आहेत की पुण्याला गेले परत? मी मुंबईत आहे म्हणून सांगताच ती माझ्या आई बाबांना भेटायला आली. आईला साष्टांग दंडवत घालीत स्वतःहून म्हणाली ”आई मला फोटो काढायचा आहे तुमच्या बरोबर”. तिचं ते सहज वागणं, प्रेमानं बोलणं पाहून माझे पालक खुश झाले. त्यांचा विश्वास बसत नव्हता की रेखा त्यांच्या बरोबर पोहे खात गप्पा मारत आहे. माझ्या आईने रेखाचे खुबसुरत, खून भरी मांग, अगर तुम ना होते  हे चित्रपट खूप आवडले असल्याचे  सांगताच प्रेमाने आईला मिठी मारणाऱ्या ’प्रेम वेडी’ रेखाने माझ्या मैत्रीला जपत माझ्याप्रमाणेच माझ्याही आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे अविस्मणीय क्षण दिलेले आहेत. रेखाला वाढदिवसाच्या आभाळा येवढ्या शुभेच्छा.

टॅग्स :Rekhaरेखा