शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:42 IST

महाराष्ट्रात अलीकडे मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. उदा. जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात सवर्णांच्या विहिरीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मातंग मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली.

- बी.व्ही. जोंधळेमहाराष्ट्रात अलीकडे मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. उदा. जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात सवर्णांच्या विहिरीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मातंग मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. कोरेगाव-भीमा दंगलीची साक्षीदार असलेल्या पूजा सकटची संशयास्पद हत्या झाली. उदगीर तालुक्यातील रुद्रवाडी येथे मंदिरात प्रवेश करणाऱ्या मातंगांना मारझोड करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात संदीप जाधव या मातंग तरुणाने लहुजी साळवे या नावाची कमान लावल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला. याशिवाय अजूनही अत्याचाराच्या काही घटना घडल्या. यापूर्वी नामांतर आंदोलनातील पोचीराम कांबळेची हत्या झाली होती. औरंगाबाद जिल्ह्यात तुपेला दगडांनी ठेचून मारण्यात आले होते. प्रेमाची किंमत म्हणून चंद्रकांत गायकवाड या मातंग तरुणाचे डोळे फोडण्यात आले होते. अशा किती घटना सांगाव्यात?राष्टÑीय स्वयंसेवक संघ येथील मुस्लीम-ख्रिश्चनांना आपले मानत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतरही हिंदुत्ववाद्यांना मान्य नाही; पण मातंग समाज तर हिंदू धर्मीयच आहे ना? मग त्यांच्यावर अन्याय-अत्याचार का होतात? मातंगांवरील जुलमाचा संघ परिवार नि हिंदू धर्मपीठे निषेध का करीत नाहीत? (अर्थात, अन्य पुरोगामी वगैरे म्हणविणाºया पक्षसंघटना मातंग वा दलित समाजावरील अत्याचारामुळे फार कळवळून उठतात असेही नाही.) या पार्श्वभूमीवर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या समग्र साहित्यातून व्यवस्था परिवर्तनासंदर्भात जी मानवतावादी भूमिका घेतली ती समजून घेणे इष्ट ठरावे.अण्णाभाऊ कम्युनिस्ट असल्यामुळे ते वर्गलढ्याची भाषा जरूर बोलत होते; पण जातिव्यवस्थेचे चटके त्यांनीही सहन केले होते. गिरणी कामगारांच्या हालअपेष्टा त्यांनीही सोसल्या होत्या; पण म्हणून त्यांच्या साहित्यातून ना आक्रस्ताळेपणा आला, ना त्यांनी समाजास शिव्याशाप दिले. दलित-शोषित-पीडित समाजाने आपणावरील अन्यायाचा प्रतिकार सुशिक्षित-सुसंस्कृत नि संघटित होऊन करावा नि आपले आयुष्य हा सुडाचा नव्हे, तर उन्नतीचा प्रवास ठरावा, असा मानवतावादी संदेशच अण्णांनी त्यांच्या साहित्यातून दिला.अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते; पण त्यांनी आपले पोवाडे, गीते, लोकनाट्य, कथा-कादंबºयांतून हिंसाचाराचा निषेधच केला. अन्याय करणाºयांना संपविण्याची भाषा त्यांनी कधीच केली नाही. स्वत:वर अन्याय होऊ देऊ नका आणि दुसºयावरही अन्याय करू नका, असे त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. अन्याय-अत्याचार सोसूनही या देशावर आम्ही प्रेम का करावे, असा प्रश्न अण्णांच्या समंजस-सोशिक मनाने कधी विचारला नाही. कारण त्यांचा राग देशावर नव्हता, तर विषमताग्रस्त समाजव्यवस्थेवर होता आणि ही व्यवस्था संयत मार्गानेच बदलता येऊ शकते या शांततावादी-सनदशीर मूल्यांवर त्यांचा विश्वास होता. अण्णाभाऊंनी मार्क्सवादी परंपरेतून जरी साहित्य निर्मिती केलेली असली तरी आंबेडकरवादही त्यांनी प्रमाण मानला होता. म्हणूनच त्यांनी म्हटले,‘जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव.’बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊंना रूढी-परंपरेवर घाव घालून समतेचे हक्क मिळवायचे होते. म. गौतम बुद्धाची प्रज्ञा, शील, करुणा आणि बाबासाहेबांचा समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय या मानवी मूल्यांचा स्वीकार आपल्या लेखनातून करताना अण्णाभाऊंनी त्यांची ‘फकिरा’ ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. ही बाब लक्षणीय ठरावी अशीच आहे. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगून अण्णाभाऊंनी हिंदू धर्म - हिंदू तत्त्वज्ञानही नाकारले. आपल्या लेखनातून मानवतेचा पुरस्कार करतानाच त्यांनी स्त्रियांनाही सन्मान दिला, हे खरे अण्णाभाऊंच्या लेखणीचे सामर्थ्य होते नि आहे.अण्णाभाऊंची जयंती साजरी करताना मातंग बंधूंनी जो धर्म आपणाला माणुसकीचे हक्क नाकारतो, रूढी-परंपरा प्रमाण मानून अत्याचार करतो, तो हिंदू धर्म आपला कसा काय असू शकतो, याचा शांतपणे विचार केला पाहिजे. यासंदर्भात मातंग समाजातीलच मुक्ता साळवेंचा निबंध मातंग समाजास मार्गदर्शक ठरावा असाच आहे. वयाच्या १४ व्या वर्षी तत्कालीन ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकात लिहिलेल्या निबंधात त्यांनी म्हटले होते ‘जगाचा निर्माता जगन्नाथ आहे, तर मग माणसामाणसांत भेद का? लाडूखाऊ ब्राह्मण म्हणतात वेद आमची मत्ता आहे. याचा अर्थ आम्हाला धर्मपुस्तक नाही. ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा तो व त्यासारखे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत व अशा धर्माचा अभिमान करावा, असे आमच्या मनातदेखील न येवो, अशी प्रार्थना मी देवाकडे करते.’ मुक्ता साळवेंच्या या निबंधाचा अर्थ असा की, प्रचलित हिंदू धर्म मातंगाचा धर्म नाही. हिंदू धर्मातील रूढी-परंपरा, धर्मग्रंथ व रीतीरिवाजांनी मातंग समाजाला हलगी वाजवीत भीक मागायला लावली, पोतराज करून अंगावर चाबकाचे फटकारे मारून घ्यायला भाग पाडले. शेंदूर पाजून गावोगावच्या गढ्या-किल्ल्याच्या बुरुजातून मातंगाचा बळी दिला, तो हिंदू धर्म आमचा नाही. अर्थात, आज मातंग समाजातील तरुण आंबेडकरवादाकडे वळत आहेत. मातंग समाजातील कार्यकर्ते बुद्ध धम्माचे महत्त्व मातंग समाजास समजावून देत आहेत. मातंग कुटुंबे धम्माचा स्वीकार करीत आहेत, ही बाब निश्चितच अभिनंदनीय नि स्वागतार्ह आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढ्यापासून मागासलेल्या हिंदू दलित जाती दूरच राहिल्या. प्रस्थापित जातिव्यवस्थेने दलितांना आपसात झुंजविल्यामुळे मागासवर्गीयांचे खच्चीकरणच झाले. इतिहासातील ही चूक दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे. कारण भारतीय राज्यघटनेवर ज्यांचा विश्वास नाही, ज्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुभाव मान्य नाही, लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नाही, धर्मनिरपेक्षता ज्यांना कबूल नाही, जाती संस्था ज्यांना आदर्श वाटते, मनुस्मृतीचे जे गोडवे गातात अशा जात्यंध नि धर्मांध शक्तीच्या उदयामुळे दलितहितच धोक्यात आले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या शिथिलतेमुळे दलित अत्याचारांत वाढ होत आहे. अण्णाभाऊंनी ज्या स्त्रियांच्या शील रक्षणाला एक माणूस म्हणून तिच्या प्रतिष्ठेला सलाम केला त्या स्त्रियांवर आज लाजिरवाणे अत्याचार होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित जातींनी आपसातील जातिभेद मिटवून एकत्र आल्याशिवाय दलितोद्धार होणार नाही, असे निक्षून सांगून ठेवले. अण्णाभाऊंनीसुद्धा एकजुटीशिवाय अत्याचाराचा मुकाबला करता येणार नाही, असे नमूद करून ठेवले. अण्णाभाऊंची जयंती साजरी करताना म्हणूनच सर्व दलित-शोषित-पीडित जाती-वर्गांनी एकत्र येऊन मानवी हक्कांचा लढा पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतीस प्रणाम.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र