संजय मोने ( प्रसिद्ध अभिनेते लेखक) - (कुठल्याही घराची पुढची खोली, जिला मराठी नाटकाच्या सुरुवातीच्या रंगसूचनेत नाटककार दिवाणखाना म्हणतो. का म्हणतो? खाडिलकर, विष्णुदास भावे, गडकरी, वरेरकर, अत्रे, कानेटकर, इ. इ. जाणोत)तो- ही का ती?ती- नाही हो. मी काय सत्याग्रह करायला चाललेय? ती.. ती काढा अबोली रंगाची.तो- अबोली रंगाची साडी? पण जिथे जाणारेस तिथे जाऊन बोलायचंय ना तुला?ती- वा!.. म्हणून.. म्हणून तुम्हाला नेहमी सांगते टेलिविजन बघत चला. बरे विनोद असतात त्यावर तुमच्यापेक्षा.तो- विनोद नाही क्लेश आहेत माझे.ती- काय?तो- काही नाही. बरं..तू जाणारेस आणि बोलणार आहेस तो कार्यक्रमही दाखवणार आहेत टेलिविजनवर?ती- हो. (दोनदा हो एकदम म्हटलं तर जसा ऐकू येईल तसा स्वर.. पण तो लिहून काढणं सर्वस्वी अशक्य आहे.) पण आमचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे.तो- पहाटचा नाही गं. पहाटेचा कार्यक्रम.ती- बटाटेवडाला आपण बटाटवडा नाही का म्हणत?तो- तुझं बरोबर.. माझं चुकलं.ती- बरोबर आठ वाजता सुरू होईल कार्यक्रम.तो- रात्री?ती- रात्री कसा? पहाट नाही का?तो- सकाळी आठ वाजता कोणाची पहाट होते?ती- दिवाळी सकाळला कोण विचारतो? पहाटच लागते रसिकांना.तो- हो? त्या तुझ्या रसिकांकडे घड्याळं नाहीत वाटतं?ती- आहेत; पण त्यांच्या सोसायटीत आठ वाजताच सूर्य दिसतो.तो- असा कसा दिसतो? आठ वाजता?ती- त्यांच्या इमारतींसमोर सगळ्या इमारती चोवीस चोवीस मजल्यांच्या आहेत, त्यांच्यामुळे यांचा सूर्य अडतो.तो- पण त्यावाचून तुमचं काहीच अडलेलं दिसत नाही.ती- बहुरंगी कार्यक्रम आहे. गाणी, कविता वाचन, किस्से... शिवाय रसिकांना फराळ कॉफी आहे. मधुमेह असलेल्यांना शुगर फ्री कॉफी आहे वेगळी. शिवाय कपबशी नृत्यही आहे. तारा बेळूब्बीचं आणि हो! सगळ्यात शेवटी राधा-श्रीराम या जोडप्याची मुलाखत.तो- राधा आणि श्रीराम हे जोडपं? ती- अहो! नवीन मालिकेतलं जोडपं आहे. तुझ्या माझ्या संसाराची गोडी आहे अवीट! आपल्या नव्या नात्यावर लागे सोनियाची वीट!तो- हे इतकं मोठं नाव? टायटलचं गाणं संपल्यावर वेळ उरतो का दृश्य दाखवायला?ती- भयानक लोकप्रिय आहे मालिका.तो- लोकप्रिय आणि भयानक? चांगलं आहे.ती- सध्या त्यांच्या मालिकेत फार रंगतदार प्रसंग चालू आहेत. तिचे एका अपघातात डोळे गेलेत आणि तो डॉक्टर झालाय. म्हणजे आधी तो मूर्तीकार होता, पण तो आता सर्जन झालाय.तो- अचानक? अगं याला काही लॉजिक आहे का?ती- आपलं लग्न झालं त्याला काही लॉजिक होतं का?तो- बरं. बरं.. तुझं निवेदन तयार आहे ना?ती- ऐका हं... रसिकहो, आज दिवाळी आहे.. दिवाळी म्हणजे रंगांचा सण, दिव्यांचा सण, फराळाचा सण, आनंदाचा सण...तो- दिवाळी आहे हे सगळ्यांना माहीत असणार ना? ती- कवी केयूर खांडभदाले त्यांच्या कविता सादर करणार आहेत.तो- खांडभदाले? या नावाचा कवी?ती- मग! विद्रदोही आहे म्हणे.तो- विद्रदोही नाही गं, विद्रोही.ती- हो का? जरा सुधारून घेते हां... तर त्यांची नवीन कविता ते सादर करणार आहेत ..काय बरं..हां माये! आली आली तुझी दिपवाळी. माह्या बापाच्या काविळीहून पिवळी. मागे गणपतीत त्यांनी सादर केली होती ती पण छान होती. आजे! आज्जे! आला आला तुझा गजानन. झाला आजोबा धा दिसं टून्न.तो- वा! खूपच विद्रोही आहे हा भदाले.ती- शिवाय होळी, गणपतीचं आयटम साँग, नारळी पौर्णिमेच्या वेळी म्हटलं जाणारं कोळीगीत.. ही गाणी आहेत. मग दोन-तीन विनोदी कलावंतांचे किस्से.तो- हे सगळं दिवाळीत?ती- या वर्षी तर बहुतेक जण दिवसभर बिझी आहेत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात. शिवाय खास म्हणजे दोन हिरोइन्स सादर करणार आहेत त्यांच्या आवडीची दोन नृत्ये. आहे की नाही खास? तुम्ही येणार ना कार्यक्रमाला?तो- तुझ्या कार्यक्रमाला माझ्या इथूनच शुभेच्छा!
भल्या सकाळी दिवाळी पहाट
By admin | Updated: October 24, 2014 03:01 IST