देशातील तरुण वैज्ञानिकांना सरकारनं दिवाळी भेट दिली आहे. विज्ञान संशोधनाची कास धरू इच्छिणा:या तरुण विद्याथ्र्याना त्यांच्या पाठय़वृत्तीत जवळजवळ साठ टक्क्यांची वाढ जाहीर झाली आहे. ही या विद्याथ्र्याची ब:याच दिवसांपासूनची मागणी होती आणि त्यासाठी त्यांना वारंवार आपलं गा:हाणं सरकार दरबारी सादर करावं लागलं होतं हे खरंच आहे. आजवर त्या मागण्यांवर आश्वासनाव्यतिरिक्त काहीच कारवाई झाली नव्हती. पण नव्या सरकारनं कारभार हाती घेतल्यापासून थोडय़ाच काळात निदान या विद्याथ्र्यासाठी तरी अच्छे दिन आणले आहेत, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. सारं जगच आता ज्ञानाधिष्ठित समाजरचनेकडे वाटचाल करत आहे. उद्योगधंदेही केवळ भांडवलाच्या बळावर उभे करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. नवोन्मेषशाली ज्ञानाचं भांडवल हाती असलं तरच आता उद्योगधंद्यांना आर्थिक बळ मिळणार आहे, एवढंच नाही तर तगून राहण्यासाठीही त्यांना वर्धिष्णू ज्ञानाच्या भांडवलाची गरज लागणार आहे. तीही सातत्यानं लागणार आहे. त्या भांडवलाचं सातत्यानं नूतनीकरण करत राहण्याची आवश्यकता आहे.
अद्ययावत ज्ञान हे कोणीही प्रेमाखातर बहाल करत नाही वा ते बाजारात विकतही घेता येत नाही. बाजारात जे उपलब्ध होतं ते कालचं किंवा कालबाह्य झालेलं तंत्रज्ञान असतं. जर ते कालबाह्य झालेलं नसेल तर दुस:या कोणाला तरी ते विकून स्वत:लाच प्रतिस्पर्धी निर्माण करण्याचा धोका कोणीही पत्करणार नाही. त्यामुळं ते स्वबळावरच विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मूलभूत आणि क्षितिजरेखेवरच्या संशोधनाला पर्याय नाही.
विज्ञान संशोधन हे मुख्यत्वे तरुणांचं काम आहे. विज्ञानसंशोधनाचा आणि तंत्रज्ञानविकासाचा इतिहास पाहिल्यास आघाडीच्या वैज्ञानिकांनी चाळिशी गाठण्यापूर्वीच आपलं उच्चतम संशोधन केल्याचं दिसून येईल. नोबेल पारितोषिक विजेत्यांचा इतिहासही हेच सांगतो. त्यांना तो सन्मान मिळेर्पयत ब:याच वेळा तीस-चाळीस वर्षाची प्रतीक्षा करावी लागते हे खरं आहे, पण त्यांनी ते संशोधन तरुण वयातच केलेलं असतं. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 साली वयाच्या सत्तरीत असताना नोबेल पुरस्कारानं विभूषित करण्यात आलं. पण ज्या कृष्णविवराच्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळाला होता, ते संशोधन त्यांनी विशीत असतानाच 193क् च्या आसपास केलं होतं. ज्या डीएनएच्या अंतर्गत रचनेचं गूढ उकलल्यानंतर जैवतंत्रज्ञानानं मुसंडी मारली त्याविषयीचं संशोधन करणारे वॉटसन आणि क्रिक विशीतिशीतच होते. त्यावर नोबेल पुरस्काराची मोहोर उमटण्यासाठी त्यांना चंद्रशेखर यांच्यासारखी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली नाही हे त्यांचं सुदैव.
हे असं असण्याचं कारण प्रतिभेचा आविष्कार तरुण वयातच होत असतो. नवनवीन आव्हानं स्वीकारण्याची आणि त्यासाठी नवनवीन वाटा धुंडाळण्याची जिद्द तरुण वयातच जागी असते. तिच्यावर चाकोरीबद्ध झापडं बसायला लागली, की प्रतिभा कोमेजू लागते. म्हणूनच या तरुण वयातल्या वैज्ञानिकांची उमेद टिकवण्याची, त्यांना जीवनकलहाची झळ पोचून त्यांच्या प्रतिभेला अटकाव होणार नाही याची दक्षता समाजानच म्हणजेच पर्यायानं प्रशासनानं घ्यायची असते. तशी ती फार मोठय़ा प्रमाणावर आजवर घेतली गेली आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्याला उणंपुरं एक वर्ष होण्याआधीच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूयांनी देशाचं विज्ञानतंत्रज्ञान धोरण जाहीर केलं होतं. त्याचं प्रयोजनही त्यांनी नि:संदिग्धपणो सांगून टाकलं होतं. देशात सामाजिक समता प्रस्थापित होऊन आर्थिक प्रगती साधायची असेल तर विज्ञानतंत्रज्ञानाचीच कास धरली पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितलं होतं. अणुऊर्जा, अंतराळविकास, सुरक्षा तंत्रज्ञान, कृषी, उद्योग, अवजड यंत्रं या क्षेत्रंविषयी संशोधन करणा:या प्रयोगशाळांचं एक विस्तीर्ण जाळंच त्यांनी उभं केलं होतं. आणि त्यात रमून जाणा:या संशोधकांना निवांतपणो ज्ञानसाधना करता यावी असं वातावरण प्रस्थापित करण्याचा प्रय}ही केला होता. त्यामुळंच त्यांचं वेतनमान, पाठय़वृत्ती, शिष्यवृत्ती या समाधानकारक असतील यावरही नजर ठेवली होती. ती परंपरा तशी आजतागायत चालूच आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात कुठंतरी या संशोधकांच्या मांदियाळीत प्रवेश मिळवण्याची आकांक्षा धरणारे विद्यार्थी मागे राहिले होते. चलनवृद्धीच्या प्रमाणात त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली नव्हती. ती कसर सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या भरघोस वाढीनं भरून काढली आहे.
परंतु यामुळं आता या तरुण संशोधकांवरची जबाबदारी वाढली आहे. त्यांना आता केवळ देशातच नव्हे तर जगात अव्वल क्रमांकाची कामगिरी करायची आहे. आपण स्वबळावर अत्युत्कृष्टतेचा ध्यास बाळगू शकतो, आजवर जगात इतर कोणीही जो टप्पा गाठलेला नाही तो गाठू शकतो, हे मंगळयानाच्या यशानं दाखवून दिलं आहे. इतर कोणावरही विसंबून न राहता आपण अतिशय गुंतागुंतीचं तंत्रज्ञानही विकसित करू शकतो आणि देशहिताच्या प्रकल्पांसाठी राबवू शकतो हाच मंगळयानाचा खरा संदेश आहे. तोच कित्ता गिरवत राहण्याचं उत्तरदायित्व आता या तरुण संशोधकांवर आहे. त्या कसोटीला उतरण्याची आकांक्षा आता त्यांनी बाळगायला हवी.
डॉ. बाळ फोंडके
पत्रकार व विज्ञान लेखक