मागासलेल्या, कायम दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याने मोठ्या आशाळभूतपणे औरंगाबाद शहरावर गेले चार-पाच महिने नजर लावली होती. मराठवाड्याची जी काही एवंगुणवैशिष्ट्ये आहेत, त्यात काळा रंग सर्वात वरचा. म्हणून आम्हास गोऱ्या रंगाचे काय ते अप्रूप? त्यामुळे स्मार्ट वगैरे प्रकरण आपल्या वाट्याला आलेलेच नाही, असे आम्ही जन्मजात समजतो. जेव्हा औरंगाबाद शहराने स्मार्ट होण्याची घोषणा केली, त्यावेळी आमचे मन हरखून गेले आणि औरंगाबादकरांच्या हिमतीला दाद दिली. हे शहर स्मार्ट होणार म्हणजे काय होणार याकडे डोळ्यात प्राण आणून अवघा मराठवाडा पाहात होता, पण येथेही आमच्या पदरी निराशा पडली. म्हटले होते औरंगाबादपाठोपाठ अवघ्या मराठवाड्याला स्मार्ट होता येईल, पण ‘बोहोणीलाच पनौती’ लागली.औरंगाबादकरांनी स्मार्ट होण्यासाठी जोरदार तयारी केली होती (असे सगळेच म्हणतात); पण एवढी तयारी करूनसुद्धा अवघे ४५ टक्के मार्क मिळाले. म्हणजे कसाबसा काठावरचा दुसरा वर्ग मिळाला. थर्ड क्लासचा शिक्का येथेही बसला नाही, हेही नसे थोडके. नाही तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत आमच्या वाट्याला थर्ड क्लास आलेला आहे. आता स्मार्ट होण्यासाठी आम्ही काय कमी प्रयत्न केले, जसे कोणी म्हणाले दूध-हळद प्या, कोणी म्हणाले अंडे फेटून लावा, फळाचा रस लावा, अशा सतराशे साठ टिप्स मिळाल्या. कोणी सांगितले, जनजागृती करा. आम्ही बैठकांवर बैठका घेण्याचा सपाटा लावला. लोकाना माहीत नव्हते बैठकीत काय बोलायचे. ते रस्ते चांगले करा, पाणी द्या, कचरा उचला याच मागण्या करीत होते. त्यांच्या या मागण्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आमचे कान किटले होते आणि अशा मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष कसे करायचे याचे तंत्र आम्ही इतक्या वर्षांत अवगत करून घेतल्यामुळे त्याचा आम्ही त्रास करून घेत नव्हतो. सवय आणि सरावाने आम्हाला या मागण्यांचा मारा विचलित करीत नव्हता. हळूहळू लोकांची गर्दी ओसरत गेली.पुढे पुढे तर या बैठकांमध्ये आम्हीच होतो. आमची चिकाटी यासाठी की शहर स्मार्ट होता होता आम्ही पण स्मार्ट होऊ ही आशा होती; पण नेमका आमच्या गुरू बळाला शनी वक्री येऊन त्याने राहूशी युती केली आणि केतूच्या हातात हात दिला. शहर स्मार्ट करण्यासाठी वेगळा अधिकारी, समिती नेमणार, दिल्लीश्वराच्या इशाऱ्यावर ती मंडळी काम करणार असा उलगडा झाला आणि स्मार्ट बनण्याच्या आमच्या स्वप्नांचा भंग झाला. आमचे शहर ही बाहेरची मंडळी येऊन स्मार्ट करणार तर आम्ही काय करायचे, असाच प्रश्न आमच्यासह ११३ डोक्यांमध्ये निर्माण होऊन एकच प्रकाश पडला, की या पद्धतीने शहर स्मार्ट होईल; पण आपण मात्र तसेच राहू. आपल्याला स्मार्ट होण्यासाठी आता वेगळ्या मार्गाने तजवीज करावी लागेल. शहर स्मार्ट करण्याच्या कामावरून आमचे लक्ष उडाले. जे आमचे झाले ते सर्वांचे. त्यातच मग आणखी एक बातमी कळली, की शहर स्मार्ट होणार नाही. शहरातील एक भागच स्मार्ट करणार आहेत. यानंतर तर आमचा उरलासुरला इंटरेस्टही संपला. बैठका, जनजागृती, सोशल मीडिया हे अधिकाऱ्यांनाच घेऊ द्या, असे सुचवले. आम्ही काढता पाय घेतला. आमच्या मनात प्रश्न आला, हे शहर स्मार्ट करण्याचा हा फाजीलपणा कोणी सुचवला. मलिक अंबरपासूनचे हे शहर आपसूकच स्मार्ट होत गेले आहे. रस्त्यात खड्डे, उडणारी धूळ, पाणी मिळत नाही वेळेवर, नवीन काय त्यात? कचरा कोणाच्या घरात नसतो? एक गोष्ट मात्र खरी, की आम्हाला डावलले ते मागास आहोत म्हणून, हा आरोप करायला आम्ही मोकळे झालो. कारण आरोप करणे सोपे असते, स्मार्ट बनणे अवघड. आम्ही आपले मागासलेल्या मराठवाड्याचेच बरे आहोत. स्मार्ट होण्याचा फाजीलपणा सांगितला कोणी?- सुधीर महाजन
स्मार्ट होण्याचा फाजीलपणा
By admin | Updated: February 3, 2016 03:01 IST