शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

जे भारतीय ते मागास हे तर्कट आता विसरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 07:28 IST

‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या सूत्रात ‘मेरा’ सूरही येतो, तेव्हाच तो सूर ‘हमारा’ होतो! भारतात भारतीय संगीताचा आग्रह हा सपाटीकरणाच्या विरोधातला सूर आहे.

- विनय सहस्रबुस्दे, खासदार आणि अध्यक्ष,भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद

तुम्ही कधी उझबेकिस्तानला गेला आहात? गेला नसलात तरी हरकत नाही. उझबेकिस्तान एअरलाईन्सची प्रवाशांना सुरक्षाविषयक सूचना देणारी एक फिल्म तुम्हाला यूट्यूबवरही पाहाता येईल. या छोट्या व म्हटलं तर, अतिशय औपचारिक सूचना वजा निर्देश देणाऱ्या फिल्मचा आस्वाद घेता घेता विमान उडण्याआधीच आपण ताश्कंदला पोहोचतो आणि तिथल्या निसर्ग सौंदर्याचा, तिथल्या लोकजीवनाचा आणि मुख्य म्हणजे तिथल्या संगीताचाही मन:पूर्वक आस्वाद घ्यायला सुरुवात करतो. अलीकडे ‘विस्तारा’ या भारतीय विमान कंपनीनेही तिच्या सुरक्षाविषयक सूचनांच्या चित्रफितीचे संपूर्ण भारतीयीकरण केले आहे आणि त्याचे सर्वदूर स्वागतही झाले आहे.

भारतीय विमान कंपन्यांच्या विमानात आणि भारतीय विमानतळांवर जे संगीत वाजविले जाते ते भारतीय असावे अशी मागणी घेऊन एक शिष्टमंडळ अलीकडेच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटले ते नेमके याच पार्श्वभूमीवर. या प्रतिनिधी मंडळाच्या भेटीसाठीचा पुढाकार जरी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा म्हणजेच आय.सी.सी.आर. चा असला तरी त्यात शास्त्रीय, सुगम आणि लोक संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचा समावेश होता. उस्ताद वसिफुद्दीन डागर, श्रीमती रिटा गांगुली, मालिनी अवस्थी, अनू मलिक, शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर, मंजूषा पाटील-कुलकर्णी, कौशल इनामदार इ. मंडळी निवेदन देताना समक्ष हजर होती तर, राज्यसभा खासदार सोनल मानसिंग, कैलाश खेर, कलापिनी कोमकली आदी अनेकजण निवेदनाच्या भूमिकेशी सहमत असूनही समक्ष येऊ शकले नव्हते.

निवेदनाच्या विषयाचं महत्त्व आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमहोदयांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि ते स्वत:च सर्वांना भेटण्यासाठी आय.सी.सी.आर. च्या कार्यालयात दाखल झाले. निवेदन स्वीकारल्यानंतर तीन-चार दिवसातच त्यांनी त्या विषयीची ‘ॲडवायजरी’ प्रस्तुत  करून संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या विनंतीकडे संबंधितांचे लक्ष वेधले.निवेदनामागची भूमिका खरेतर स्पष्टच आहे. प्रत्येक देशाचे संगीत हे त्या देशाच्या अस्मितेचा अविभाज्य भाग असतं. जपानमध्ये विमान प्रवास करताना जपानी संगीत ऐकायला मिळते, तीच गोष्ट मध्य-पूर्वेतून प्रवासात ऐकायला मिळणाऱ्या अरेबियन संगीताची अथवा अन्य देशातून कानावर पडणाऱ्या त्या त्या देशांच्या संगीताची. पण, भारतात हे सहज-स्वाभाविक होत नाही. अनेक भारतीय विमान कंपन्या कुणा अमेरिकन पॉप गायकाची गाणी तरी लावतात किंवा पाश्चात्य संगीताच्या सुरावटी ऐकणे प्रवाशांना बंधनकारक करतात. ही परिस्थिती बदलावी म्हणून निदान भारतात तरी, भारतीयांना आणि भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांनाही भारतीय संगीत ऐकायला मिळावे यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने पुढाकार घेतला. असा पुढाकार या संस्थेने घेणेही स्वाभाविकच कारण भारतीय संस्कृतीचा योग्य परिचय आणि त्याबाबतची नीट जाण विशेषत: अभारतीयांमध्ये निर्माण व्हावी हे आय.सी.सी.आर.चे उद्दिष्टच! या उद्दिष्टपूर्तीच्या या प्रयत्नाला भारतातल्या अनेक संगीतकारांनी आणि गायकांनीही साथ दिली हेही उल्लेखनीय. दुर्दैवाने या इतक्या साध्या, सोप्या आणि सरळ विषयावर काही इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांनी, विषय पुरेसा समजून न घेताच टीका केली. त्यांच्या टीकेचा पहिला मुद्दा हा की, खुल्या बाजाराच्या व स्पर्धेच्या सध्याच्या युगात मंत्रालयाने, त्यांच्याकडे आलेली ‘विनंती’ ॲडवायजरीच्या स्वरूपात सुद्धा पुढे पाठविणे कितपत योग्य आणि मुख्य म्हणजे व्यवसायाला पोषक?, 

हे प्रतिपादन म्हणजे अनावश्यक भयकंपने निर्माण करण्याचा खटाटोप म्हणायला हवा. मुळात मंत्रालयाने जारी केलेली ‘ॲडवायजरी’ हा एक प्रकारचा सल्ला आहे. कुठल्याही प्रकारे हा सल्ला बंधनकारक नाही. मुक्त बाजारपेठेच्या जमान्यात खाजगी कंपन्या सरकारी सल्ले  विलक्षण आज्ञाधारकपणे ऐकतात असे मानणे हाच मोठा भाबडेपणा ठरेल. खरेतर सरकारला असा सल्ला द्यावा लागावा हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या त्या देशात, ते ते संगीत वाजविले जाण्याने उलट पर्यटकांचा आनंद वाढेल कारण त्यांना जे संगीत ते त्यांच्या देशात नित्यनेमाने ऐकतात त्यापेक्षा वेगळी काही ऐकायचे आहे, ऐकायचे असणार. वेगळे खाद्यपदार्थ, वेगळी वस्त्रप्रावरणे, वेगळ्या फॅशन्स, वेगळे सृष्टी सौंदर्य आणि त्याच धर्तीवर वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण संगीत हेच तर आकर्षणाचे मुद्दे असतात. अशा स्थितीत भारतीय संगीत ही  विमान कंपन्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरू शकते !  एकीकडे खाजगीकरणाचा बाऊ आणि दुसरीकडे जे जे भारतीय ते ते अनाकर्षक वा मागास या न्यूनगंडाने पछाडलेल्यांनी मात्र अशी तर्कटे लढवावीत हे आश्चर्याचे कमी पण, दु:खद जास्त आहे !

भारतीय संगीत म्हणजे नेमके काय?, असेही एक प्रश्नचिन्ह मांडून टीका करणाऱ्यांनी चर्चेला फाटे फोडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या सूफी संगीतापासून ते कर्नाटक संगीतापर्यंत आणि  सर्व प्रकारचे प्रादेशिक संगीत, लोकसंगीत, फिल्म संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत आणि वाद्य संगीत अशा सर्व प्रकारातले संगीत हे भारतीय संगीताच्या व्यापक परिघात समाविष्ट होते. या निवेदनाचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांचे एकच म्हणणे होते, ते म्हणजे ‘भारतीय मातीचा सुगंध असणारे कोणतेही संगीत वाजवा’ एवढीच आमची विनंती आहे. भारतीय संगीत म्हणजे कोणते हे ठरविणे अवघड आहे हा मुद्दा तर, अगदीच तकलादू म्हणावा असा ! 

वस्तुत: भारतीय संगीत भारतात ऐकविले आणि वाजविले जावे ही अपेक्षा भारतात बाळगायची नाही तर, काय ब्राझीलमध्ये बाळगायची?,  ‘भारतीयतेचा’ पुरस्कार करण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आकस ठेवून तर्कदुष्ट टीका करण्याचा प्रकार खरे तर अनाकलनीयच!बाजार संस्कृतीच्या दबदब्याखालीच नित्य राहणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायला हवे की, जग हा बाजार नव्हे तर, एक समुदाय आहे. या समुदायाची विविधता हे त्याच्या जीवमानतेचे लक्षण आहे. त्यासाठीच वैविध्य टिकवून ठेवायला हवे आणि सपाटीकरणाला विरोध करायला हवा. भारतीय संगीताचा भारतातील आग्रह हा त्या सपाटीकरणाच्या विरोधातला एक ताकदीचा सूर आहे. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या सूत्रात ‘मेरा’ सूरही येतो, तेव्हाच तो सूर ‘हमारा’ होतो हे ध्यानात ठेवायला हवे!vinays57@gmail.com