हजारो वर्षे धार्मिक गुलामगिरीच्या साखळदंडात जखडलेला समाज आणि पुरोहितशाही, चातुर्वर्ण्याचे दास्यत्व पिढ्यान्पिढ्या अंगवळणी पडलेले शूद्रातिशूद्र बहुजन व महिलांना जागे करणारे महात्मा जोतिराव फुले यांच्या द्वितीय जन्मशताब्दीच्या निमित्ताने गेल्या दोनशे वर्षांमधील भारतीयांच्या वाटचालीचे, उत्थानाचे सिंहावलोकन व्हायला हवे. ज्या पुण्यात पेशवाईच्या पराभवाने देशावर ब्रिटिश अंमल सुरू झाला, जगाच्या दारे-खिडक्या उघडल्या गेल्या, आधुनिक जगाचे दर्शन घडू लागले, तिथेच त्यानंतरच्या पाऊण शतकात महात्मा फुले यांनी भारतीय नवनिर्माणाचा, इंडियन रेनेसाँचा पाया घातला.
रेनेसाँच्या पाश्चात्त्य व्याख्येपेक्षा हे कार्य वेगळे होते. ती केवळ सांस्कृतिक चळवळ नव्हती. त्याहीपलीकडे महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे कृतिशील अग्रणी होते. सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कुरीती, कुप्रथा, अनिष्ट परंपरांचे जोखड समाजाच्या मानगुटीवरून उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गुलामगिरीतून मुक्ततेची हाक दिली. समाजापुढे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न ठेवले. समता, न्याय व तर्कावर आधारित नव्या समाजरचनेचा पाया घातला. हजारो वर्षांच्या मूलभूत समाजरचनेला धक्का दिला. आमूलाग्र बदलाची रूपरेषा आखून दिली.
या परिवर्तनाच्या वाटेवर जे जे दुबळे, शोषित, गुलामगिरीचे बळी अशा समाजघटकांना आधार देण्याचा, त्यांच्या पायातील बेड्या तोडण्याचा प्रयत्न केला. पूर्वेकडे बंगालमध्ये राजा राममोहन राॅय किंवा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर सतीप्रथेवर बंदी किंवा विधवाविवाहाला अनुकूल जनमत उभे करीत असताना महात्मा फुले केवळ क्रांतीचे कोरडे हुंकार किंवा शब्दबंबाळ विचारांवर विसंबून राहिले नाहीत. त्यांनी विचारांना कृतीची जोड दिली. त्या प्रत्येक कृतीचा मूलाधार स्त्री-पुरुष समानता होता.
स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी पत्नी सावित्रीबाईंपासून केली. मुलींसाठी पहिली शाळा उघडली. भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. धर्माने शिकण्याचा हक्क नाकारलेल्या कनिष्ठ जातींच्या मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. विधवांच्या हालअपेष्टा, विशेषतः केशवपनासारख्या अवहेलनेतून सुटकेसाठी नाभिकांचा प्रातिनिधिक संप घडवून आणला. ब्राह्मण पुरोहिताशिवाय विधवा विवाह लावले. विधवांच्या पोटी जन्मलेल्या मुलांचे जीव वाचविले. त्यांच्यासाठी तसेच निराधार, अभागी विधवांसाठी आश्रम उघडले.
एका विधवेचा मुलगा स्वत: दत्तक घेऊन सामाजिक क्रांतीचा प्रारंभ स्वत:च्या घरापासून केला. सोबतच यशस्वी व्यावसायिक म्हणूनदेखील त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला. अनेक बाबतीत महात्मा फुले भारतात पहिले होते. भारतीय समाजाचे मूळ अशा जातिव्यवस्थेवर प्रहार करणारे, तसेच ब्राह्मणवाद, पुरोहितशाही, धर्मग्रंथांचा पगडा, माणसाला माणसापासून तोडणाऱ्या चुकीच्या ईश्वरी संकल्पनेला आव्हान देणारे ते पहिले. निर्मिक म्हणून त्यांनी नवा ईश्वर उभा केला. खऱ्या सत्याचा शोध घेतला. पहिले सत्यशोधक ठरले. महात्मा जोतिबा फुले यांची ही कृती पुढे दोनशे वर्षांमधील विविधांगी विद्रोहाची प्रेरणा ठरली.
शिक्षण हाच बहुजनांच्या प्रगतीचा मार्ग आहे हे ओळखणारे ते पहिले. हा मार्ग प्रशस्त व्हावा म्हणून त्यांनी ब्रिटिश सत्तेला सतत साकडे घातले. स्त्रियांना शिक्षण, स्वातंत्र्य दिले तरच समाजाचे उत्थान शक्य आहे, हे उमजणारेही ते पहिले. शेतकऱ्यांची दुरवस्था व शोषणाची मीमांसा करणारेही ते पहिले. ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ अशा ग्रंथांमधून ही मीमांसा त्यांनी शब्दबद्ध केली. महत्त्वाचे म्हणजे सुधारणांच्या चार पावले पुढे जाऊन महात्मा फुले यांनी समाजाला नवी दृष्टी दिली. ही दृष्टी वैश्विक होती. ‘गुलामगिरी’ ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढ्याला समर्पित केला. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा विचार करता महात्मा फुले हा महत्त्वाचा थांबा आहे.
अंधश्रद्धा, कर्मकांड झिडकारणाऱ्या छत्रपती शिवरायांपासून हा प्रवास सुरू होतो. शिवरायांच्या समाधीचा शोध लावून महात्मा फुले यांनी झाकोळलेली परंपरा उजेडात आणली. त्या वारशाला आकार दिला. ते प्रबोधन राज्यकर्ते म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कृतीत आणले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या परंपरेला सामाजिक क्रांतीचा साज चढविला. समता, न्याय ही तत्त्वे भारतीय राज्यघटनेत प्रतिष्ठित झाली. गेली पाऊणशे वर्षे भारतातील सामान्य माणूस पावलापावलावर राज्यघटनेतील मूल्यांचा आग्रह धरताना दिसतो, त्या प्रेरणेचे मूळ महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी, कृतिशील विचारांमध्ये आहे. तरीदेखील फुलेंना अभिप्रेत असलेले नवनिर्माण झालेले नाही. कारण, विचार कृतीत आणण्याचे त्यांच्याइतके धाडस आम्हा सामान्य भारतीयांमध्ये नाही. त्या महात्म्याचे मोठेपण आणि आपले हे वैगुण्य यातील विसंगती हाच त्यांच्या द्वितीय जन्मशताब्दीचा ठळक विशेष आहे.
Web Summary : Mahatma Phule, a social revolutionary, championed education for all, especially women and lower castes. He fought against social injustices and laid the foundation for a new, equitable society, inspiring generations.
Web Summary : महात्मा फुले, एक सामाजिक क्रांतिकारी, ने सभी के लिए शिक्षा, विशेष रूप से महिलाओं और निचली जातियों की वकालत की। उन्होंने सामाजिक अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ी और एक नए, न्यायसंगत समाज की नींव रखी, जिससे पीढ़ियों को प्रेरणा मिली।