शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
2
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
4
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
5
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
6
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी
7
‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश
8
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
9
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
10
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
11
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
12
विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!
13
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान
14
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
15
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
16
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
17
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन
18
IPL 2025 : चहल ठरला PBKS च्या 'ब्लॉकबस्टर' शोचा हिरो! प्रीतीनं गळाभेट घेत थोपटली फिरकीपटूची पाठ
19
ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”
20
IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!

By नंदकिशोर पाटील | Updated: April 16, 2025 08:16 IST

यवतमाळ जिल्ह्यातील केशव शिंदे यांनी एका रक्तचंदनाच्या झाडासाठी दिलेला लढा ही सामान्य माणसाच्या संघर्षाची आणि कायद्याच्या शक्तीची कहाणी आहे !

-नंदकिशोर पाटील (संपादक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर)

यवतमाळ जिल्ह्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे यांची २.२९ हेक्टर जमीन वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. जमिनीबरोबरच विहिरीसाठी मोबदला मिळाला; परंतु त्या जमिनीवर उभ्या असलेल्या शंभर वर्षे जुने रक्तचंदनाचे झाड आणि इतर झाडांना मोबदला नाकारण्यात आला. 

एक झाड, ज्याचे लाकूड औषधी गुणधर्मांनी युक्त, आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत मौल्यवान आणि पर्यावरणदृष्ट्या अमूल्य आहे;  त्याची किंमत शून्य समजली गेली! या अन्यायाविरुद्ध शिंदे कुटुंबाने २०१४ पासून सातत्याने प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू ठेवला. मात्र, आठ वर्षांच्या खेट्यानंतरही न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. 

न्यायालयाने या याचिकेची गांभीर्याने दखल घेतली आणि २०२५ मध्ये मध्य रेल्वेने एक कोटी रुपयांचा अंतरिम मोबदला जमा करण्याचे आदेश दिले. त्यापैकी ५० लाख रुपये तत्काळ शिंदे कुटुंबाला देण्याची परवानगीही न्यायालयाने दिली. इतक्या कमी कालावधीत-एका वर्षाच्या आत निकाल लागणे हीदेखील मोठी बाब म्हटली पाहिजे. 

रक्तचंदन (Pterocarpus santalinus) हे झाड सामान्यतः आंध्र प्रदेशातील शेषाचलम पर्वतामध्ये आढळते. कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन आणि नंतर ‘पुष्पा’ चित्रपटामुळे या रक्तचंदनाची आणि त्याच्या तस्करीची बरीच माहिती झाली. तोवर फक्त पूजेसाठी, सुगंधी द्रवासाठी अथवा साबणासाठी वापरण्यात येणारे पिवळसर चंदन आपल्या परिचयाचे होते. 

रक्तचंदनाचे गडद लालसर लाकूड अतिशय टिकाऊ, सुगंधी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. याचमुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्याची किंमत पाच कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणूनच या झाडाचे योग्य मूल्यांकन होणे अत्यावश्यक आहे. केवळ आर्थिक दृष्टीने नव्हे, तर नैसर्गिक मूल्याच्या दृष्टीनेसुद्धा!

रस्ते, रेल्वेमार्ग, सिंचन प्रकल्प अथवा इतर पायाभूत विकास प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला ठरवला जात असताना भूसंपादन कायद्यातील अनेक किचकट तरतुदींचा आधार घेतला जातो.  संपादित जमिनीतील वृक्षांची किंमत दिली जातेच असे नाही. विशेषत: आंबा, चिंच, जांभूळ आदी फळझाडे, तसेच बाभूळ, पिंपळ, कडुनिंब आणि वडाच्या झाडाची योग्य किंमत ठरवली जात नाही, ही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची तक्रार आहे. 

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधामागील एकूण कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे. शिंदे कुटुंबाच्या शेतातील रक्तचंदनाच्या झाडाबाबतही हेच झाले होते. शंभर वर्षांहून अधिक आयुर्मान असलेले शिंदे यांच्या शेतातील हे झाड नेमके कशाचे, याची कोणालाच कल्पना नव्हती. 

आंध्रातून आलेल्या एका रेल्वे अधिकाऱ्याने हे झाड ओळखले; परंतु त्याचे मूल्य कसे आणि किती ठरवायचे, हा प्रश्न होताच. कारण भूसंपादन कायद्यातील तरतुदीत रक्तचंदनाचा झाडाचा उल्लेखच नव्हता. इथूनच या लढ्याची सुरुवात झाली.

एका झाडासाठी शेतकऱ्याने दिलेल्या न्यायालयीन लढ्यातून हेच सिद्ध होते की, शेतजमिनीबरोबर त्यावरील निसर्गसंपत्तीचे मूल्यही स्वतंत्र आणि न्याय्य पद्धतीने ठरवले जाऊ शकते. आपल्या न्याय्य हक्कासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, धैर्य आणि न्यायप्रविष्ट मार्गाचा अवलंब केला तर कुठलाही अन्याय दुरुस्त होऊ शकतो. ही झाली एक बाजू. 

मात्र संपादित जमिनीतील (आधी नसलेल्या)झाडांच्या मोबदल्यासाठी रात्रीतून होणारी वृक्षलागवड, त्याच्या नोंदीपासून मोबदला मिळवून देण्यापर्यंत कार्यरत असलेली यंत्रणा (रॅकेट),  संबंधित खात्यातील काही अधिकाऱ्यांचा त्यातला सहभाग हा शेतकऱ्यांच्या नावे सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. 

नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मार्गातील संपादित जमिनीतदेखील रात्रीतून वृक्षलागवड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पर्यावरणीय आणि नैसर्गिक मूल्यांच्या दृष्टीने रक्तचंदनाच्या एका झाडासाठी मिळालेला कोटीचा मोबदला मैलाचा दगड ठरू शकतो. (nandu.patil@lokmat.com)

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer Success Storyशेतकरी यशोगाथाCourtन्यायालयIndian Railwayभारतीय रेल्वे