शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

व्रतस्थ जीवनाचे वारकरी: फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 04:44 IST

ख्रिस्त, बुद्ध, गांधी, तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या संस्कारांनी जोपासलेले व विकसित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व धार्मिक, वाङ्मयीन, निर्भीड तसेच प्रेमळ नि श्रद्धाळू आहे.

- जोसेफ तुस्कानो, विज्ञान लेखक आणि पर्यावरण अभ्यासक९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गाढे अभ्यासक आणि तत्त्वज्ञ फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जीवनालेख पाहिला तर त्यांचे वेगळेपण ठळकपणे उठून दिसते. तरुण वयात अभ्यासानिमित्त फादरांची जगभरची भटकंती असतानाही ते वसईतील होतकरू तरुणांना नियमित पत्रे पाठवीत व कॉलेजचा अभ्यास करण्यासाठी उत्साह वाढवीत असत. त्या पत्रापत्रातून त्यांचा मनाचा मोठेपणा, बुद्धिमत्ता, विनम्रता, चांगुलपणा, सामाजिक तळमळ इ. पैलूंचा साक्षात्कार होत असे. लेखनासाठी आणि सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळत असे. उफाळणाऱ्या तरुण मनाला हाताळण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते.

साहित्य हे संवेदना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. संघर्ष, मानवी विकास तसेच विकार आणि विचार या सगळ्यांचा गोफ म्हणजे साहित्य होय. लेखन लिहिणाऱ्याला नि वाचणाऱ्याला बळ देते, हे त्यांचे विचार तरु णाईला कृतिशील बनण्यास खतपाणी घालत. ज्याला भूमी आहे त्याने भूमिका घेतली पाहिजे असे त्यांना ठामपणे वाटत आले. तिथे त्यांनी तडजोड केली नाही. त्यांनी लेखनात जी भूमिका घेतली, त्याच्याशी तडजोड होणार नाही यासाठी ते सतत दक्ष राहिले आणि इतरांचा आदर्श बनले. संवेदनशील लेखकाच्या लिखाणाचा पुढचा टप्पा म्हणजे चळवळ असे ते मानत आले. लेखक व चळवळ या दोन बाबी नाहीत तर त्या एकत्रच असतात हे त्यांनी कृतीने सिद्ध केले. प्रत्येक लेखकाने आपल्या रक्ताने स्वाक्षरी करायची तयारी ठेवली पाहिजे हा त्यांचा संदेश तरुणाईला थरकावून गेला.फादर दिब्रिटो वसईचे आध्यात्मिक नेते, विचारवंत, साहित्यिक आणि समाजसुधारक आहेत. ‘तुम्ही सातत्याने सत्यमार्गाला चला, तोच परमेश्वराचा मार्ग आहे’, ही जाणीव ते सर्वसामान्यांना देत असतात. ख्रिश्चन समाजाने धर्मकलहाच्या विनाशकारी वाटेने जाऊ नये, याची त्यांनी वारंवार काळजी घेतली. विरार-वसईतील दहशतवाद नेस्तनाबूत करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत धैर्याने आणि निर्धाराने उभे ठाकले. त्यांनी सर्वसामान्य माणसाला मनोबल दिले. काही स्वार्थी मंडळींनी आपले वर्चस्व राखण्यासाठी ‘तुम्ही धर्माचे राजकारण करता’ म्हणून आवई उठवली. ‘झगेवाल्याचा कांगावा’ असा प्रचार केला, पण तो सारा अपप्रचार सहन करत त्यांनी आपले काम नेटाने सुरू ठेवले. संघर्षासाठी आसुसलेल्या गुन्हेगारांना त्यांनी शांतीने थोपवून धरले. लोकांना अन्यायाविरुद्ध निर्धाराने उभे राहण्याची आणि गुन्हेगारांना प्रतिष्ठा देऊ पाहणाºयांना आवरण्याची शिकवण त्यांनी दिली. भीतीच्या दडपणाखाली असलेल्या सामान्य माणसातील निर्भयता वाढवली.
चर्चमधील प्रार्थना-प्रबोधन यापलीकडे जाऊन ते समोरच्या माणसाशी, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, सहजपणे संवाद साधत असतात. फादरांच्या लिखाणातून वाचकांना क्षमाशीलता आणि हळवेपणाचे दर्शन होत असते. पण, चळवळीचे नेतृत्व करताना मात्र ते खंबीर होतात. हरित वसई चळवळ, सुबोध बायबल हा महाग्रंथ या महत्त्वाच्या टप्प्याने त्यांनी आपले असामान्यत्व सिद्ध केले. लेखन आणि लढा यातून ते मोठे झाले व इतरांना मोठे करत गेले. केवळ धार्मिक विषयावरील लिखाणानेच नव्हे तर विविध ललित आणि सामाजिक लिखाणाने वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला. त्यांनी समस्त वाचकांच्या मनात पूजनीय स्थान पटकावले. त्यांची एकापेक्षा एक सरस एक डझन पुस्तके आणि ग्रंथ हा सकलांच्या कुतूहलाचा व कौतुकाचा विषय असतो.दिब्रिटो यांची पत्रकारिता सर्वश्रुत आहेच, पण प्रवचने आणि व्याख्याने श्रोत्यांसाठी मेजवानी असते. ख्रिस्ताप्रमाणेच संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली ही त्यांची श्रद्धास्थाने आहेत. तुकोबाचे अभंग आणि ज्ञानदेवाच्या ओव्या त्यांच्या वाणीतून व लेखणीतून झरत असतात. वसईतल्या ‘सुवार्ता’ मासिकाचे तीस वर्षे संपादन करत असताना त्या मासिकाला मराठी शारदेच्या दरबारात मानाचे पान मिळवून दिले होते. समाजाला गरज असलेल्या विषयावर त्यांनी वेळोवेळी तज्ज्ञांकडून आवर्जून लेख लिहून घेतलेत. लहान मुलांच्या बाबतीत बोलायचे तर ते वसईचे ‘साने गुरुजी’ होत. बाळगोपाळासाठी चांगलंचुंगलं लिहून घेण्याचा त्यांचा आग्रह नि अट्टाहास अफलातून असतो. व्रतस्थ जीवनाचे वारकरी असूनही फादरांच्या ठायी अत्याधुनिक वैज्ञानिक विचारसरणीचा सुंदर संगम आढळतो. हिरव्यागार वसईला सिमेंटासुराचे ग्रहण लागले तेव्हा त्यांनी कंबर कसली. पर्यावरण रक्षणाची चळवळ उभारली. तिचे पडसाद जगभर उमटले.
जीवनाचा क्रूस हलका असो वा जड असो; तो ज्याचा त्याला वाहावा लागतो. क्रूसाच्या निवडीचे स्वातंत्र्य आपल्याला नसते. ते आपल्या वाटेला येऊ नये किंवा तो आपल्या मनाप्रमाणे असावा, अशी अपेक्षा न करता देवाला सांगणे, ‘क्रूस कसाही दे, मात्र तो पेलण्याइतका खांदा मात्र मजबूत कर.’ ही त्यांची प्रार्थना असते. त्यामुळेच तर, ख्रिस्त, बुद्ध, गांधी, तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या संस्कारांनी जोपासलेले व विकसित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व धार्मिक, वाङ्मयीन, निर्भीड तसेच प्रेमळ नि श्रद्धाळू आहे. ते परिवर्तनाचा वारसा ल्यालेले ७६ वर्षांचे प्रेममय प्रकाशपुत्र आहेत. त्यांची विद्वत्ता, लेखणी आणि वाणी यांचा मराठी शारदेला खचितच वरची पातळी गाठण्यास साहाय्यभूत ठरेल.