जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांनी अलीकडेच एका पत्रपरिषदेत स्पष्ट केले आहे की, गेल्या काही आठवड्यांत जगभरात कोविड-१९ने बाधित चीनच्या बाहेरील देशातील रुग्णांच्या संख्येत १३ पटीने वाढ झाली असून, ताज्या आकडेवारीनुसार १९८ देशांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. जगभरातील ५,१९,८९९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तसेच उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेले रुग्ण १,२३,२९६ असून, कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या २३,५८८ एवढी भयानक आहे. चीन सोडून हजारोंच्या संख्येने मरण पावलेले लोक प्रामुख्याने इटली, इराण, स्पेन, फ्रान्स आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रातील आहेत. श्रीलंका व बांगला देशात अजून तरी या रोगाने कुणाचा बळी घेतलेला नाही.या महामारीने अनेक देशांतील शेअर बाजार कोलमडले असून, आर्थिक स्थितीने भयानक रूप धारण केले आहे. अनेक देशांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. अर्थकारण कुठे जात आहे, हेच कळेनासे झाले आहे. परिस्थितीने गांजलेल्या अवस्थेत देशांनी अखेर करायचे तरी काय? लोकांनी एकत्र येऊ नये, एकमेकांना स्पर्श करू नये. एकमेकांपासून दूर उभे राहून व्यवहार करावेत, खोकू वा शिंकू नये आणि केवळ घरातच बसून राहावे, हे कितपत शक्य आहे? ही स्थिती लोक किती काळ सहन करू शकतील? हा विषाणू हवेतून पसरतो म्हणून माणसांनी श्वास घेणेही सोडून द्यायचे का? अशा स्थितीत इंग्लंडचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे महत्त्वाचे वक्तव्य केले होते त्याचे स्मरण होते. ते म्हणाले होते, ‘कोणताही पेचप्रसंग उद्भवला तर तो तसाच वाया जाता कामा नये. माणसाने त्याचा फायदा करून घ्यायला हवा.’ तेव्हा आपणही या पेचप्रसंगाचे रूपांतर संधीमध्ये करून घेऊ शकू का?कोविड-१९ ची निर्मिती चीनमधील वुहान या प्रांतातून झाली. चीनमध्ये निर्मित झालेल्या अनेक वस्तू वापरण्याची आपल्याला सवय झाली आहे; पण चिनी भाषा ही इंग्रजीप्रमाणे शब्दांची बनलेली नसून वाक्संप्रदायांची आहे. त्या भाषेत पेचप्रसंग हा शब्द धोका आणि संधी असा दोन्ही अर्थांनी वापरण्यात येतो. चीनमधून निघालेली ही महामारी आपल्या देशात शिरण्यापासून आपण तिला रोखू शकलो नसलो तरी या संकटाचे रूपांतर आपण संधीत करू शकतो का, हे बघितले गेले पाहिजे. त्याचवेळी त्या महामारीवर इलाज शोधायचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या स्पर्शाने हा विषाणू इतरांमध्ये संक्रमित होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला आणि हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम हॅन्क यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशातील दोनतृतीयांश लोकसंख्येला कोरोनाची बाधा झाली आहे. आपल्या देशातील अनेक राज्यांत त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अनेक राष्ट्रांनी त्यांच्या सीमा बंद केल्या असून, लोकांनी सार्वजनिक संपर्क टाळावा, असे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. आपल्या देशातही तीन आठवड्यांची बंदी लागू करण्यात आली आहे; कारण असाधारण परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा तिला तोंड देण्यासाठी असाधारण उपाय योजावे लागतात.
असाधारण परिस्थितीत असाधारण उपायच हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:40 IST