शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

Editorial: एरिक्सन, गेट वेल सून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 06:47 IST

जगणे अधिक स्पर्धात्मक होत असले, त्या स्पर्धेने अगदी गळेकापू वळण घेतले असले तरी नितळ, निव्वळ खेळभावना ही आनंद देणारी असते. एरिक्सन किंवा अन्य कुण्या खेळाडूंच्या अगदी प्राणावर बेतण्याच्या क्षणी हीच खेळभावना प्रार्थनेत बदलते.

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनच्या टेलिया पार्कन फुटबॉल स्टेडियमवरील सोळा हजारांवर प्रेक्षक आणि युरो चषकाच्या ब गटातील डेन्मार्क विरुद्ध फिनलंड लढत टीव्ही, ओटीटीवर पाहणाऱ्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या काळजाचा ठोका शनिवारी चुकला. सामन्याचा पूर्वार्ध संपायला आलेला असताना, ४२ व्या मिनिटाला यजमानांचा मधल्या फळीतला खेळाडू ख्रिश्चियन एरिक्सन एक थ्रो-इन घेताना अचानक कोसळला. शरीराची हालचाल बंद झाली. भांबावलेले संघ सहकारी धावले. पंचांनी खेळ थांबविला. संघाचे प्रशिक्षक कॅस्पर हजुलमंड, वैद्यक चमूतील मार्टिन बोसन व सहकारी धावले. निपचित पडलेला एरिक्सन बेशुद्ध होता. हृदयाचे ठोके थांबले होते. कृत्रिम श्वासोछ्वास देण्यात आला. त्याने तो थोडा शुद्धीवर आला. त्याला इस्पितळात हलविण्यात आले. यादरम्यान,  डॅनिश खेळाडूंनी एरिक्सनभोवती केलेले कडे व उमदा सहकारी वाचावा म्हणून केलेला परमेश्वराचा धावा पाहून जग स्तब्ध झाले.

एरव्ही, आपल्या संघाच्या समर्थनार्थ हाणामारीवर उतरणारे प्रेक्षक भावुक झाले होते. सामना स्थगित झाला. मैदानावर चिटपाखरू नव्हते. तेव्हा एरिक्सनच्या प्रकृतीबद्दल खुशालीची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांपैकी पाहुणे फिनिश समर्थक पार्कन स्टेडियमच्या एका बाजूने ‘ख्रिश्चियन’ अशी साद घालत होते. दुसऱ्या बाजूने यजमान डॅनिश समर्थक ‘एरिक्सन’ असा प्रतिसाद देत होते. नंतर युरोपियन फुटबॉल संघाने, डेन्मार्कच्या संघटनेने बातमी दिली, की इस्पितळात पोचल्यानंतर एरिक्सन शुद्धीवर आला. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. थांबलेला सामना दोन तासांनंतर सुरू झाला. त्याही मनोवस्थेत खेळाडू खेळले. एका गोलाच्या फरकाने पाहुण्यांनी युरो चषकातील पहिला विजय नोंदविला. शेकडो किलोमीटर दूर रशियातील सेंट पिटसबर्ग इथल्या स्टेडियमवर बेल्जियम विरुद्ध रशिया सामन्यात आणखी एक भावुक क्षण अनुभवास आला. एरिक्सन हा इटलीतल्या इंटर मिलान क्लबकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. त्याचा तिथला संघ सहकारी रोमेलू लुकाकू बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदविल्यानंतर टीव्ही कॅमेऱ्याकडे धावला आणि ‘ख्रिस, ख्रिस आय लव्ह यू!’ म्हणत तो गोल त्याने आपल्या मित्राला अर्पण केला. - हे सगळे क्षण वेदनादायी असले तरी त्यांच्या मालिकेने गेले काही महिने कोरोना महामारीमुळे जगावर दाटलेले निराशेचे मळभ जणू दूर झाले. विषाणूशिवाय अन्य विषयावर लोक भावुक होतात, हे स्पष्ट झाले.

खेळता खेळता मैदानावर खेळाडू कोसळण्याची ही काही पहिली घटना नाही. कॅमेरूनचा मार्क व्हिवियन फो, स्कॉटलंडचा फिल ओडिनल, आयव्हरी कोस्टचा चेईक टिओट हे मैदानावरच कोसळलेेले व जग सोडून गेलेले फुटबॉलपटू किंवा आपल्या गोव्यामध्ये २००४च्या डिसेंबरमध्ये ब्राझीलच्या ख्रिस्तियानो ज्युनिअर या उगवत्या ताऱ्याचा डेम्पोकडून खेळताना झालेला अंत, अशा अनेक घटना आधी घडल्या आहेत. एकतर फुटबॉल, रग्बी वगैरे खेळांसाठी प्रचंड शारीरिक क्षमतांची गरज असते. त्याचप्रमाणे खेळातून निर्भेळ आनंद दुर्मिळ झाला असून विजय ही प्रतिष्ठेची बाब बनली आहे. आपण ज्याचे समर्थन करतो, त्या खेळाडूचा किंवा त्याच्या संघाचा पराभव चाहत्यांना मानहानीसारखा वाटतो. मग अद्वितीय कामगिरीसाठी एखाद्या खेळाडूला कधी देवत्व बहाल करायचे तर तोच अपयशी ठरला की त्याच्या घरावर दगडफेक करायची, छायाचित्राची विटंबना करायची, असे टोकाचे प्रेम व तितक्याच टोकाचा राग चाहते व्यक्त करतात. चाहत्यांच्या या प्रेमाच्या दडपणामुळे स्पर्धा अतितीव्र बनते. तिच्यात टिकून राहण्यासाठी खेळाडूंना शारीरिक व मानसिकदृष्ट्या खंबीर राहावे लागते. हे दडपण व ताण खेळाडूंना कधी कधी सहन होत नाही. विजय-पराजयाच्या भावनेपलीकडे निव्वळ खिलाडूवृत्तीने खेळले जाणारे खेळ माणसांमध्ये खेळभावना, सद्भावना व संघभावनाही रुजवितात. संकटसमयी, प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडताना आवश्यक असणारी जिद्द व लढाऊ बाणाही खेळातून येतो आणि यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी गरजेची असणारी विजिगिषू वृत्तीही खेळाच्या मैदानावर जन्म घेते. म्हणूनच खेळ हा माणूसच काय सगळ्याच प्राण्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो.

जगणे अधिक स्पर्धात्मक होत असले, त्या स्पर्धेने अगदी गळेकापू वळण घेतले असले तरी नितळ, निव्वळ खेळभावना ही आनंद देणारी असते. एरिक्सन किंवा अन्य कुण्या खेळाडूंच्या अगदी प्राणावर बेतण्याच्या क्षणी हीच खेळभावना प्रार्थनेत बदलते. मग प्रांत, देश, भाषा, धर्म वगैरे सगळ्या माणसांनी उभ्या केलेल्या भिंती पाडून क्रीडारसिक म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातला माणूस एक होतो. ‘एरिक्सन, गेट वेल सून’ अशी सोशल मीडियावर प्रार्थना करतो.

टॅग्स :FootballफुटबॉलDenmarkडेन्मार्क