शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

सामान्यांची गुदमर कुणा कळेना !

By किरण अग्रवाल | Updated: January 26, 2019 14:51 IST

प्रजासत्ताकाचा ७०वा वर्धापनदिन साजरा करून तो वर्धिष्णू होत राहण्याची कामना एकीकडे करत असताना व ‘जन गण मन अधिनायक जय हे’चे विजयगान गात असतानाच देशातील पन्नास टक्के संपत्ती फक्त नऊ अब्जाधीशांकडे एकवटली असल्याचे वृत्त समोर आले आहे.

 

- किरण अग्रवालप्रजासत्ताकाचा ७०वा वर्धापनदिन साजरा करून तो वर्धिष्णू होत राहण्याची कामना एकीकडे करत असताना व ‘जन गण मन अधिनायक जय हे’चे विजयगान गात असतानाच देशातील पन्नास टक्के संपत्ती फक्त नऊ अब्जाधीशांकडे एकवटली असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘आहेरे’ व ‘नाहीरे’ वर्गातील वाढती दरी यातून स्पष्ट होणारी असून, पैशाकडेच पैसा जात असल्याचा अनुभव अगर समजाला त्यातून बळकटीच मिळून गेली आहे. विशेष, म्हणजे श्रीमंतांच्या यादीत भर पडत असताना रोजीरोटीसाठी रोजचाच झगडा वाट्यास आलेल्या तळाच्या वर्गाची घुसमट व त्यांचा रोखला जाणारा श्वास काही कुणाच्या स्वारस्याचा विषय बनताना दिसत नाही ही बाब चिंताजनक तर आहेच, शिवाय ती चिंतनयोग्यही ठरावी; कारण ही असमानता उत्तरोत्तर वाढत राहिली तर त्यातून प्रजासत्ताकामागील प्रेरणांनाच धक्के बसल्याखेरीज राहणार नाहीत.भूतकाळात ‘गरिबी हटाव’चे तर वर्तमानात ‘अच्छे दिन’चे नारे ऐकायला मिळाले असले तरी, कुणाची गरिबी हटली व कुणाला अच्छे दिन आलेत हे काही कुणापासून लपून राहिलेले नाही. स्वातंत्र्योत्तर सात दशकांच्या वाटचालीत आपण आपली लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली खरी; पण प्रजासत्ताकातील समता, ममता, बंधुतेच्या, तसेच अभिव्यक्तीच्या घटनादत्त प्रेरणा मात्र क्षीण झाल्याचेच दिसून येते. समतेच्याच बाबतीत विचार केला तर, स्री-पुरुष समानतेत काहीअंशी यश लाभते आहे; परंतु सामाजिक, धार्मिक व आर्थिक पातळीवरील समता साकारण्यात नित्य नव्या आव्हानांचे अडथळेच आड येताना दिसत आहेत.

यात आर्थिक असमतोलाचे रुंदीकरण किती वेगाने होत आहे हे ‘आॅक्सफॅम’ने नुकत्याच घोषित केलेल्या अहवालावरून स्पष्ट व्हावे. भारतातील अब्जाधीशांची संपत्ती २०१८मध्ये प्रतिदिनी २,२०० कोटींनी वाढत असताना देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के, म्हणजे १३.६ कोटी लोक २००४ पासून सातत्याने कर्जात बुडालेले असल्याचे हा अहवाल सांगतो; यावरून समाजातील टोकाच्या होत चाललेल्या आर्थिक विषमतेची जाणीव व्हावी. कुणाला आले ‘अच्छे दिन’, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.अर्थात, श्रीमंत अधिक श्रीमंतीकडे वाटचाल करीत असून, गरीब अधिकच गरिबीत लोटला जात असल्याची बाब अधोरेखित व्हावी असे निष्कर्ष ‘आॅक्सफॅम’च्या अहवालात नमूद असल्याने ‘अच्छे दिन’ आलेल्यांचा वर्ग उघड होऊन गेला आहे. भारतातील एक टक्का अतिश्रीमंतांची संपत्ती वर्षभरात तब्बल ३९ टक्क्यांनी वाढली असताना अर्ध्या लोकसंख्येच्या संपत्तीत अवघी तीन टक्क्यांची नाममात्र वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरचा एकुणात विचार केला तर तळाच्या अर्ध्या लोकसंख्येची संपत्ती वाढण्याऐवजी ११ टक्क्यांनी कमीच झाली आहे. ही विषमता केवळ या अहवालावरूनच निदर्शनास येते असे नाही, तर १४ हजार कोटींचा गफला करणारे नीरव मोदी व मेहुल चोकसी आणि विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये बुडवणारे विजय मल्ल्या यांच्यासारखे कर्जबुडवे परदेशी पळून जात असताना हजार-दोन हजारच्या ठेवी परत मिळवण्याकरिता हजारो सामान्य ठेवीदारांना मात्र बँकांच्या अगर पतसंस्थांच्या दाराशी धरणे धरीत बसावे लागते, यातूनही ती उजागर होऊन जाते. त्यामुळे घेणेकरी फरार व देणेकरी रस्त्यावर; हीच आपल्याकडील आर्थिक विषमतेची सच्चाई म्हणता यावी.एकीकडे पंचपक्वानांच्या भोजनावळी उठून ‘उतनाही लो थाली मे, जो व्यर्थ न जाये नाली मे’ असे आवाहन करण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे आश्रमशाळांमधील निवासी विद्यार्थ्यांना चांगल्या व पुरेशा जेवणासाठी आजही संघर्ष करायची वेळ येते, हे कोणत्या समानतेचे लक्षण म्हणायचे? ‘जन गण मन अधिनायक जय हे’चा अभिमानाने जयघोष करीत असताना या जन व गणांतील सामान्यांच्या पायांना आलेले फोड, डोळ्यात तरळणारे अश्रू व अंगाला आलेला घाम इतरांना दिसणार नसेल किंवा ‘अच्छे दिन’ आपल्याच वाट्याला खेचून घेऊ पाहणाऱ्यांच्या गळेकापू स्पर्धेत गुदमरणारा गरिबांचा श्वास जाणवणार नसेल तर या वर्गाच्या अधिनायकांचे जय हो, म्हणण्याला अर्थ तरी काय उरावा?