शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 06:44 IST

एखाद्या बंदिस्त जागेत ‘इमोशनली चार्ज्ड’, पण निर्णायकी समूह मोठ्या संख्येने एकत्र येतात तेव्हा तिथला तणाव हा एखाद्या जिवंत ज्वालामुखीसारखाच असतो.

डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने तब्बल १८ वर्षांनंतर ‘आयपीएल’ जिंकल्यानंतर बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा झाला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर समूहाची मानसिकता, खेळाचे बदललेले स्वरूप आणि त्याचा समाजाच्या मानसिकतेवर झालेला परिणाम याबाबत काही मुद्दे समोर येतात. माणसामाणसांनी एकमेकांशी लढून परस्परांचे जीव घेण्यापेक्षा आपल्यातील खुमखुमी योग्य मार्गाने व्यक्त करावी यासाठी ऑलिम्पिक ही संकल्पना उदयाला आली. त्यातूनच रीतसर प्रशिक्षण घेऊन कुणीही कुणाचाही जीव न घेता आपलं वर्चस्व सिद्ध करावं या विचारातून सांघिक खेळ, स्पर्धा सुरु झाल्या. त्यामुळे सांघिक खेळ, त्यांचे सामाजिक योगदान या सगळ्याचे श्रेय ऑलिम्पिकला जाते.

पूर्वी कसोटी क्रिकेट ही पाच दिवस उत्तरोत्तर रंगत जाणारी जणू एक मैफल असे. मग एकदिवसीय क्रिकेट सुरु झाले.  त्यावेळी बॉबी तल्यारखान आणि विजय मर्चंट यांचे समालोचन अत्यंत लोकप्रिय होते. ‘पाच दिवस खेळण्याचा, उत्कंठा वाढवणारा, रंगत जाणारा खेळ एका दिवसावर आणून तुम्ही त्यातील स्पोर्टिंग स्पिरिट घालवताय, एक दिवसाचा खेळ म्हणजे निव्वळ कोंबडे झुंजवणे...’ असं बॉबी तल्यारखान यांनी त्यावेळी म्हटलेले मला आठवते. मग टी-ट्वेंटी क्रिकेट आले, खेळाडूंच्या नावाने बोली लावणे, त्यांना विकत घेणे. त्यामुळे त्या खेळाशी संबंधित सगळेच बदलले. आपल्या आवडीचा संघ, त्याचं जिंकणं-हरणं यात वर्चस्वाची भावना आली. आपल्या आवडीच्या संघाचं हरणं किंवा जिंकणं याकडे प्रेक्षक हे वैयक्तिक जय किंवा पराभवाप्रमाणे पाहू लागले.  खेळाचे रूप बदलणार तेव्हा तो बघणाऱ्यांची वृत्तीही बदलणार, हे ओघाने आलेच.

बंगळुरूतील घटनेला दुसरीही एक बाजू आहे. स्टेडियम ही ‘कॉम्पॅक्ट’ जागा असते. लोकं रांगा लावून आत जातात, पण तिथून बाहेर यायला उपलब्ध रस्ते अत्यंत चिंचोळे असतात. म्हणजे त्या बंदिस्त जागेत माझ्या आवडीचा संघच जिंकायला हवा असं वाटणारे, ‘इमोशनली चार्ज्ड’ पण निर्णायकी समूह मोठ्या संख्येने एकत्र येतात, तेव्हा तिथला तणाव हा एखाद्या जिवंत ज्वालामुखीसारखाच असतो. त्या प्रचंड भारलेल्या मनस्थितीतील निर्णायकी जमावाला नियंत्रित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, दुर्दैवाने त्यासाठी लागणारी परिपक्वता  आणि शिस्त आपल्याकडे नाही.

प्रेक्षक सामने बघत असतात. सामने खेळत नसतात. अध्यात्मात ‘साक्षीत्व’ अशी एक संकल्पना आहे. आपल्या आवडीच्या संघाच्या समर्थनार्थ स्टेडियममध्ये जमलेल्या प्रेक्षकांकडे या साक्षीत्वाचा अभाव असतो. खेळ ही खेळाडूंसाठी आपलं कौशल्य दाखवण्याची जागा आहे. आवडीचा संघ सामना हरला किंवा जिंकला तरी आपलं आयुष्य आहे तसंच पुढे जाणार आहे, हे प्रेक्षक विसरतात. त्यातच ‘आयपीएल’ सारख्या स्पर्धांमध्ये स्टेडियममधल्या ‘इमोशनली चार्ज्ड’ प्रेक्षकांमुळे तिथलं वातावरणही फक्त जय-पराजयाला महत्त्व देणारंच असतं. त्यामुळे आपल्या आवडीच्या संघाचा पराजय हा वैयक्तिक पराजय मानून लोकं ‘रिॲक्ट’ होतात. खेळात नियम असतात. ते पाळणं बंधनकारक असतं. प्रेक्षकांच्या मारामारीत, ढकलाढकलीत मात्र नियम नसतात, तिथे फक्त हताशपणातून घडणारी कृती असते आणि ती सहसा विघातकच असते.

सोशल मीडियामुळे  घडत असलेल्या घटनांची तीव्रताही प्रचंड वाढली आहे.  सोशल मीडियापूर्व काळात  प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्राधान्यक्रम हे सगळंच वैयक्तिक होतं. आपल्याला आवडणारी गोष्ट इतरांना आवडत नसणं हे सहज स्वीकारार्ह होतं. आता तसं नाही. व्ह्यूज, लाइक्स, कमेंट्स याभोवती फायद्यातोट्यांची गणितं ठरत असल्यामुळे आताच्या घडीला जगात काहीही वैयक्तिक, खासगी, स्वतःपुरतं राहिलेलं नाही. एकत्र कुटुंब, मग न्यूक्लिअर कुटुंब आणि आता थेट हा असा अति-व्यक्तिकेंद्री समाज! 

माणसं कोणत्याही मोठ्या गर्दीचा भाग असतात, तेव्हा त्यांना ‘शेअर्ड आयडेंटिटी’ सोयीची वाटते. आपलं वेगळं मत मांडण्याचं धाडस कोणी करत नाही. या बदललेल्या समाजात बंगळुरुसारखे आणीबाणीचे प्रसंग ओढवतात तेव्हा व्यक्तीची, समाजाची मानसिकता लक्षात घेऊन, बळाचा वापर न करता त्यातून मार्ग काढणं आवश्यक आहे, ते जमलं तर अशा घटना आणि त्यातून होणारी हानी टाळता येणं शक्य आहे. 

                मुलाखत आणि शब्दांकन : भक्ती बिसुरे