डाॅ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
अलीकडेच मी इजिप्तमध्ये होतो. तिथल्या लोकांना बांगलादेशमधील निवडणुकीविषयी माझे मत जाणून घ्यायचे होते. निवडणुकीचा उंट कोणत्या बाजूला कूस बदलेल, कोण निवडून येईल, याचा अंदाज त्यांना हवा होता. ‘लोकशाही वाचवायची असेल तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही’, असे मी त्यांना सांगितले. जमात-ए-इस्लामी आणि नॅशनल सिटीझन पार्टी देशाला कट्टरपंथाकडे घेऊन जाईल, असे मी म्हणालो; आणि मी टाकलेला विश्वास खरा ठरला. बीएनपीचा विजय झाला. याचा अर्थ तेथील लोकांनी लोकशाही वाचवली.
साधारणतः दीड वर्षापूर्वी कट्टरपंथीयांच्या आंदोलनात शेख हसीना यांची राजवट उलथवली गेली. त्यावेळी वाटले होते की, लोकशाही पसंत करणारा बांगलादेश जहाल मतवादाच्या रस्त्याने निघाला आहे. अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या येतच राहिल्या. ते अत्याचार रोखण्याऐवजी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी भावना आणखी भडकवल्या. त्यांच्या भोळ्या चेहऱ्याच्या मागे सैतान लपलेला होता. ते पाकिस्तान आणि चीनच्या मांडीवर बसून खेळू लागले. त्यांनी निवडणूक टाळण्याचे प्रयत्न वारंवार केले... बांगलादेशच्या धमन्यांत धर्मांधतेचे विष पूर्णपणे मिसळल्याची खात्री झाल्यावर त्यांनी निवडणुकीची घोषणा केली. अर्थात निवडणुकीसाठी त्यांच्यावर दडपण वाढू लागले होते. निवडणुकीत कट्टरपंथी विजयी होतील आणि त्यांचे स्थान कायम राहील, असे युनूस यांना वाटत होते. जमात-ए-इस्लामी आणि शेख हसीना यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या नॅशनल सिटीझन पार्टीमधल्या सत्तेच्या वाटावाटीत आपली मुख्य भूमिका राहील, असे युनूस यांना वाटत होते. खालिदा झिया यांच्या अनुपस्थितीत बीएनपीसाठी निवडणूक सोपी असणार नाही आणि १७ वर्षं देशाच्या बाहेर राहणारे तारिक रेहमान ‘दूरस्थ’ वाटतील, असे अंदाज होते. परंतु, तारिक यांनी अचूक नेम साधला आणि बाकी सगळ्यांना धूळ चारली.
तारिक मागच्या डिसेंबरमध्ये देशात परतताच बीएनपीमध्ये नवे प्राण फुंकले गेले. लोकांशी संवाद साधण्याचा अगदी वेगळा मार्ग त्यांनी अवलंबला. निवडणुकीच्या प्रचार काळात १९ दिवसांत ६४ सभा घेतल्या. आपली पत्नी डॉ. जुबेदा रेहमान आणि मुलगी जाईमा रहेमान यांनाही बरोबर ठेवले. ते स्वतःला एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून देशासमोर ठेवू पाहत होते. प्रचारसभांमध्ये त्यांनी सामान्य जनतेला व्यासपीठावर बोलावले; संवाद साधला. प्रश्न विचारले. प्रश्न जाणून घेतले. भरसभेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिले. देशात शांतता, सद्भाव आणि लोकशाहीचा मुद्दा ते सातत्याने मांडत राहिले. ‘ना दिल्ली, ना पिंडी’ अशी घोषणा देत त्यांनी बांगलादेशी अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला. आपण दिल्ली किंवा रावळपिंडी - कुणाच्याही दडपणाखाली राहणार नाही, असे त्यांना सांगायचे होते. ‘बांगलादेशच्या हिताचे असेल तेच आपण करू’, या घोषणेमुळेही मतदार त्यांच्याकडे आकर्षिले गेले. शेख हसीना यांना रेहमान आवडत नसले तरी अवामी लीगच्या समर्थकांसाठी तेच एकमेव आशेचा किरण होते. त्यांना आवामी लीगच्या मतदारांनी मते दिली, यात आश्चर्य राहिले नाही. जमात-ए-इस्लामी आणि नॅशनल सिटीझन पार्टीला रोखणे हे अवामी लीगचे मुख्य उद्दिष्ट होते आणि ते तारिक यांना बळ दिल्यानेच पूर्ण होऊ शकत होते. पुष्कळ प्रमाणात त्यात यश आले. जमातला विरोधी पक्ष म्हणून संधी मिळाली आहे. परंतु, विद्यार्थी आंदोलनातून जन्माला आलेल्या नॅशनल सिटीझन पार्टीचा अवतार मात्र संपुष्टात आला.
आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बांगलादेशला शेख हसीना यांनी आर्थिक स्वआघाडीवर जेवढे पुढे नेले होते, तेवढे रेहमान नेऊ शकतील काय? पाकिस्तान किंवा चीनचा त्यांच्यावर किती प्रभाव असेल? भारताशी असलेल्या नात्यातील कडवटपणा ते कमी करू शकतील काय?
संबंध सुधारतील, असे आत्ताच म्हणता येत नाही. कारण उभय पक्षात कटुता भरलेली आहे. आर्थिक प्रगतीचा मुद्दा तारिक यांच्यासाठी आव्हानात्मक असेल. मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली. ती सावरण्यासाठी तारिक नक्कीच अमेरिकेच्या दिशेने पाहतील. परंतु, चीनकडेही त्यांचे लक्ष असेल. अमेरिका त्यांच्या देशाला सैनिक तळ करू पाहतो. ते परवानगी देतील काय?
प्रश्न अनेक आहेत. पण भारताबरोबरचे संबंध हा सर्वात मोठा प्रश्न होय. बांगलादेश भारताचा सर्वात जवळचा शेजारी. बांगलादेशची ९४ टक्के सीमा भारताला लागून आहे. भारताशी चांगले संबंध ठेवल्याशिवाय हा देश आर्थिक समृद्धीचा विचार करू शकत नाही. परस्पर संबंध सुधारावेत, यासाठी बीएनपीच्या विजयाच्या कितीतरी आधी भारताने पावले टाकली होती. तारिक यांच्या मातोश्री खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर स्वतः गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शोकसंदेश पत्र त्यांनी दिले होते. अर्थात, खालिदा झिया यांनी सत्ता सांभाळली तेव्हा त्यांचे भारताशी संबंध फार चांगले नव्हते. पण राजकारण आणि कूटनीतीत कोणीही मित्र नसते आणि कोणीही शत्रू!
तारिक यांना एक चांगली संधी चालून आली आहे. भारताशी मैत्रीच्या रस्त्यावर पुढे जाण्यातच त्यांचे भले आहे आणि आपलेही. बांगलादेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..! जमातसारख्या कट्टरपंथी ताकदीशी लढण्यासाठी परवरदिगर त्या देशाला असीम शक्ती देवो, हीच कामना.
Web Summary : Bangladeshi people chose democracy by electing BNP. Tarique Rahman's leadership revived the party, engaging directly with the public and focusing on national identity. Despite economic challenges and complex relationships with neighboring countries, Bangladesh has a chance to build a brighter future.
Web Summary : बांग्लादेशी जनता ने बीएनपी को चुनकर लोकतंत्र को बचाया। तारिक रहमान के नेतृत्व ने पार्टी को पुनर्जीवित किया, सीधे जनता से जुड़े और राष्ट्रीय पहचान पर ध्यान केंद्रित किया। आर्थिक चुनौतियों और पड़ोसी देशों के साथ जटिल संबंधों के बावजूद, बांग्लादेश के पास एक उज्जवल भविष्य बनाने का अवसर है।