शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना घाम फोडणारे एलेक्सी नवाल्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 07:50 IST

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना घाम फोडणारे एलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा त्यांच्या पत्नी युलिया जर्मनीतल्या म्युनिच शहरात एका कार्यक्रमात होत्या.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना घाम फोडणारे एलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा त्यांच्या पत्नी युलिया जर्मनीतल्या म्युनिच शहरात एका कार्यक्रमात होत्या. पुतीन सतत खोटे बोलतात, त्यामुळे या बातमीवर लगेच विश्वास ठेवता येत नाही, असे पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतानाच त्यांनी हा सांगावा खरा असेल तर आपल्या पतीने सर्वोच्च बलिदान दिल्याचा अभिमान व्यक्त केला. सभागृहाने त्या बलिदानाला उभे राहून सलामी दिली. दुर्दैवाने, नवाल्नी यांच्या मृत्यूची बातमी खरी निघाली. खतरनाक गुन्हेगारांसाठी आर्क्टिक सर्कलवर बांधलेल्या यातनादायी तुरूंगात कोठडीबाहेर फेरफटका मारताना ४७ वर्षीय नवाल्नी अचानक कोसळले व त्यांचा मृत्यू झाला, असे सरकारने जाहीर केले. नवाल्नी यांच्या प्रवक्त्याने शनिवारी मृत्यूला दुजोरा दिला. ही यंत्रणेने केलेली हत्या असल्याचा आरोप करत आता रशियात जागोजागी निदर्शने सुरू आहेत. ती मोडून काढण्यासाठी पोलिसी बळाचा वापर सुरू आहे. सरकार व देशावरची पुतीन यांची पकड लक्षात घेता या आंदोलनातून काहीही साध्य होणार नाही.

कुणीतरी नवा नवाल्नी उभा राहीपर्यंत सारे काही शांत राहील. पण, नवाल्नी यांच्या रूपाने सरकारपुरस्कृत भ्रष्टाचाराविरोधात प्राणपणाने लढणारा एकांडा शिलेदार जगाने गमावला आहे. एकेका खटल्यात नवाल्नींची शिक्षा वाढवत न्यायालयांनी ती एकोणीस वर्षावर नेली असली, तरी त्यांना तुरूंगातून मत व्यक्त करण्याची, कोठडीबाहेर शतपावलीची परवानगी न्यायालयाने दिली होती. त्यामुळेच नवाल्नीची एफबीके ही भ्रष्टाचारविरोधी संघटना ते तुरुंगात गेल्यानंतरही सक्रिय होती. तो धोका वाढत असल्यामुळे डिसेंबरमध्ये त्यांना मॉस्कोपासून दोन हजार किलोमीटरवर वर्षभर उणे तापमान असलेल्या तुरूंग नावाच्या छळछावणीत गुप्तपणे हलविण्यात आले. तिथे त्यांचा काटा काढला असावा, असा जगाला संशय आहे. कारण, त्यांना मारण्याचे प्रयत्न आधीही झाले होते.

चार वर्षापूर्वी सायबेरियाकडे जाणाऱ्या विमानात नवाल्नी अचानक कोसळले. विमान मध्येच उतरवावे लागले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना एअर एम्ब्युलन्सने बर्लिनला पुढच्या उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांना आढळले की, रासायनिक शस्त्रांमध्ये वापरला जाणारा 'नोविचोक' नावाचा नर्व्ह एजेंट त्यांना चहातून देण्यात आला होता. त्याआधी व नंतरही नवाल्नी यांना मारण्याचे प्रयत्न झाले. कारण, त्यांनी व्लादिमिर पुतीन नावाच्या रशियाच्या सुप्रीम लीडरला आव्हान दिले होते. संपूर्ण जग जाणते की, हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध लढणे सोपे नसतेच मुळी. फॅसिस्ट राजवट ताकदीने तो विरोध मोडून काढण्यासाठी सर्व शक्तींनी सज्ज असते. त्यामुळेच भलेभले सत्तेला शरण जातात, नवाल्नी तसे भेकड नव्हते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून ते सरकार आणि सरकारी यंत्रणेच्या शुद्धीकरणासाठी, पुतीन यांचा भ्रष्टाचार जगापुढे आणण्यासाठी नवाल्नी यांनी स्वतःहून ती लढाई खांद्यावर घेतली होती. भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची त्यांची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती, तेल कंपन्या, बँका किंवा विविध मंत्रालयांच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांचे काही समभाग ते स्वतःच खरेदी करायचे आणि नंतर त्या व्यवस्थेला प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. या संघर्षाचा परिणाम ते जाणून होते. पुतीन राजवटीतल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणारे किंवा त्यांच्या धोरणांवर, निर्णयावर टीका करणारे, राजकीय प्रतिस्पर्धी एकेक करून संपविण्यात आले. देशाला खासगी सैन्य पुरविणाऱ्या वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी गेल्या जुलैमध्ये युक्रेन युद्धादरम्यान सशस्त्र उठाव केला. तो फसला. नंतर पुतीन यांनी त्यांना बाबापुता करून परत रशियात आणले आणि महिनाभरातच विमान अपघातात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

तत्पूर्वी, युक्रेनवरील हल्ल्याचा विरोध करणारे ल्युकऑइल तेल कंपनीचे अध्यक्ष रनील मगनोव्ह मॉस्कोमधील इस्पितळाच्या खिडकीतून मरण पावले. त्याआधी, पुतीन यांचे राजकीय विरोधक बोरिस नेमत्सोव यांची हत्या करण्यात आली. पुतीन यांच्या त्रासाला कंटाळून देश सोडून इंग्लंडला पळून गेलेले बड़े व्यावसायिक बोरिस बेरेजोव्हस्की यांचा मृतदेह बर्कशायरमधील घरात आढळला. कधी काळी रशियासाठी हेरगिरी करणारे अलेक्झांडर लिट्रिनेन्को यांचा लंडनमध्ये चहातून पोलिनियम-२१० विष देऊन बळी घेण्यात आला तर भाडोत्री हल्लेखोरांच्या गोळ्यांनी पत्रकार अन्ना पोलितकोव्हस्काया यांचा जीव घेतला. या हुतात्म्यांच्या यादीत एलेक्सी नवाल्नी हे नाव वाढले आहे. पुतीन यांच्या कारकिर्दीवर आणखी एक काळा डाग पडला आहे.