मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर परवा दिल्लीतील उद्घाटन समारंभात म्हणाल्या की, 'आईच्या तोंडून पहिली ओवी बाळाने ऐकली तेव्हा मराठी भाषेचा जन्म झाला असेल.' हे ऐकून विज्ञान भवनात उपस्थितांचे चेहरे खुलले. टिपेच्या आवाजातील गवळणीची लडिवाळ लकेर कानावरून गेल्यासारखे वाटले. टाळ्यांचा कडकडाट झाला. ताराक्का आजीने बटव्यातील खडीसाखर हातावर ठेवल्यासारखे वाटले. पण, घरोघरी आता ना आजी-आजोबा राहिलेत, ना ते खारीक-खोबरे, ना खडीसाखर. नर्सरी-केजी, स्कूलमध्ये शिकणारी नातवंडे आजी-आजोबांजवळ नाहीत. आई-बापाचा नोकरीधंदा व स्वप्नांच्या पाठलागाने मुलांना आजी-आजोबांच्या रूपाने आपली समृद्ध, संपन्न, ऐतिहासिक मातृभाषा व तिच्याभोवती गुंफलेल्या संस्कृतीपासून दूर नेले आहे. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवला जाणारा सांस्कृतिक संचिताचा प्रवाह संथावला आहे. त्याला गती देण्यासाठी मग सारस्वतांचा मेळा होतो, भाषा संवर्धनाच्या धीरगंभीर सरकारी घोषणा होतात, सरकारी कार्यालयांमध्ये मराठीची, दुकानांवर मराठी पाट्यांची सक्ती होते. एकूणच मराठीचे गोमटे करण्याचा आव आणला जातो. पण, हा सारा भास आहे.
भाषेची गंगा अशी घातल्या पाण्याने वाहात नाही. मुलांच्या संस्कारक्षम वयात, शाळा-विद्यालयांच्या स्तरावर, लोकसंस्कृतीच्या विविध रूपांमध्ये, रोजच्या लोकव्यवहारात वापर हा भाषेचा खरा आरसा असतो. या आरशाचा पारा सध्या निखळतो आहे. शाळांची अवस्था गंभीर आहे. शिक्षक हा सर्वाधिक उपेक्षित घटक बनला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांविषयी ठोस धोरण नाही. शाळा बंद करण्याचे फर्मान अधूनमधून हटकून निघते. थोडा विरोध झाला की ते स्थगित होते. चिमुकल्या खांद्यांवर मराठीचे भविष्य पेलणाऱ्या बिच्चाऱ्या मुलांच्या शिक्षणावर सतत टांगती तलवार राहते. पायाच पोकळ राहतो व नंतर डगमगतो. सरकार मात्र कमकुवत पायावरील इमले सजवण्यात व्यस्त असते. संमेलने हा त्या सजावटीचा आवडता मार्ग आहे. कारण, तिथे सर्वांनाच मिरवता येते. त्यासाठी निधीची खैरात होते. असा निधी वाचन संस्कृतीच्या वाट्याला मात्र येत नाही. वाचनालये कळकटलेली राहतात. वाचनाची गोडी लावणारे मार्ग खडतर असतात. दुसरीकडे मराठी माणूसही भाषेबाबत उदासीन असतो. मोठ्या शहरांमध्ये दोन मराठी माणसेही एकमेकांशी हिंदी-इंग्रजीत बोलतात. खेड्यापाड्यात मराठी बोलली जाते. पण, ती प्रमाण मराठी नव्हे तर बोली असते आणि आपल्या व्यवस्थेने बोलीभाषा अजूनही उंबऱ्याच्या बाहेरच ठेवल्या आहेत.
कुसुमाग्रज म्हणाले होते, 'डोईवर सोनेरी मुकुट, परंतु अंगावर चिंध्या लेवून मराठी भाषा मंत्रालयासमोर कटोरा घेऊन उभी आहे.' तेव्हा खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हता. कुसुमाग्रजांची ती कविकल्पना होती. कारण त्यांचे मातृभाषेवर जिवापाड प्रेम होते. आता अभिजात दर्जाच्या रूपाने मराठीच्या डोक्यावर खरा मुकुट चढवला गेला असला, तरी उपेक्षेच्या चिंध्या मात्र कायम आहेत. हिंदीचे अतिक्रमण व इंग्रजीचा पगडा आधी होताच. आता जग एक विशाल खेडे बनले आहे. स्थलांतर, प्रवास, विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, व्यापार-उदीम व अर्थकारण आदी रूपाने चायनीज मँडरिन, स्पॅनिश आदी भाषांची अतिक्रमणे वाढली आहेत. असा भाषांचा संगम वाईटच असतो, असे नाही. त्यातील लाभही मोठे, तसे धोकेही. मराठीतून वैद्यक किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा अतिरेकी आग्रह धरताना प्रचलित परिभाषांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, त्यांच्यात न्यूनगंड यायला नको, याचे भान ठेवायला हवे. कारण, भाषा जवळ आल्या की आदानप्रदान होते. आपल्या भाषेत नवे शब्द येतात, स्थिरावतात. आपले काही शब्द अन्य भाषांमध्ये जातात आणि सगळ्याच भाषा अधिक समृद्ध बनतात. अशी समृद्ध भाषा म्हणजे मंदिराची उभारणी असते. मंदिराचा कळस लक्षवेधी असला, तरी महत्त्वाचा असतो तो पाया. पाया खचला तर कळसाचे अस्तित्व धोक्यात येते. त्याला बेगडी स्वरूप येते. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. ती अशी बेगडी बनली की, तिच्यातील गोडवा, गांभीर्य, खोली-उंची, विविधता व गुणवत्ता कमी होते. समाजातील सुसंस्कृतपणा आणि चारचौघात बोलण्या-वागण्यातील शालिनता कमी होते. तोंडात ओवीऐवजी शिवी येते. मराठी भाषा गौरवदिनी याच चिंताजनक अवनतीच्या वळणावर सध्या मराठी उभी आहे.