शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

भाजप देशाच्या संरक्षणाच्या बाजूने आहे की कसाबच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:31 IST

हा देश आणि सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात? आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

‘दहशतवादाला धर्म नसतो. ती मनोवृत्ती नाहीशीच करायची असते’ हे महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख कै. हेमंत करकरे या देशभक्ताचे उद्गार आहेत. आपली मुलगी जुई नवरे हिला त्यांनी ते ऐकविले आहेत. जुई आता अमेरिकेत राहते. ती दोन मुलांची आई आहे. ‘हेमंत करकरे मी दिलेल्या शापामुळे मरण पावले’ असे अभद्र उद्गार काढणाऱ्या प्रज्ञा ठाकूर या भाजपच्या भोपाळमधील उमेदवार बाईविषयी बोलताना जुई म्हणाली, ‘तिला किंवा तिच्या शापवाणीला मला प्रतिष्ठा मिळवून द्यायची नाही. मात्र दहशत हा माणुसकीविरोधी अपराध आहे. कोणत्याही धर्माचा माणूस वा स्त्री तो करू शकतो. देशाचे पोलीस व अन्य संरक्षक यंत्रणा यांनी या अपराधाचा बंदोबस्त केला पाहिजे,’ असेही ती एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी म्हणाली.

मालेगाव बॉम्बस्फोटात दोन डझन निरपराध माणसे मारली गेली. त्या स्फोटात प्रज्ञा ठाकूर ही पहिल्या क्रमांकाची आरोपी होती. तिला सगळ्या पुराव्यांनिशी करकरे यांनी पकडून गजाआड केले होते. त्या वेळी प्रज्ञाच्या नावामागे असलेल्या ‘साध्वी’ या उपाधीमुळे अनेक कर्मठ हिंदुत्ववाद्यांचे पित्त खवळले होते. त्यांनी करकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फलक त्यांच्या घराभोवती लावले होते. मात्र त्याच सुमारास मुंबईवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बंदोबस्त करताना कसाब या शत्रूसैनिकाच्या गोळ्यांनी करकरे यांचा बळी घेतला. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच त्यांच्या घराभोवतीचे ते फलक संबंधितांनी गुपचूप काढून घेतले. हेमंत करकरे यांना त्यांच्या देशभक्तीसाठी शौर्य पदके दिली गेली. त्यांचे पुतळे अनेक जागी लागले. अनेक शहरांतील चौकांना त्यांचे नाव दिले गेले. इकडे प्रज्ञा ठाकूरविरुद्धचे पुरावे क्रमाने कमी होत गेले. साक्षीदार फितूर होत गेले व संशयाचा फायदा देत न्यायालयाने तिची नाइलाजाने सुटका केली. या खुनाच्या व दहशतखोरीच्या आरोपी स्त्रीला भाजपने भोपाळचे लोकसभेचे तिकीट दिले. वर ‘तिला तिकीट देऊन हिंदुत्वावरील दहशतखोरीच्या आरोपाला आम्ही उत्तर दिले’ असे निंदनीय उद्गार खुद्द पंतप्रधान मोदी यांनी काढले.

हा देश आणि त्याचे सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात, ते दहशतीला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांना न्याय देणारे की त्यांना शाप देणाऱ्यांच्या बाजूने जाणारे आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे. हेमंत करकरे पोलीस खात्यात असताना त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा बीमोड केला, म्हणून त्यांना ‘रॉ’मध्ये बोलाविले होते. काही काळ परदेशात प्रशिक्षण घेऊन ते भारतात आले व महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख झाले. जेथे जेथे त्यांची नियुक्ती होती तेथे तेथे त्यांनी आपल्या निष्पक्ष कामाचा ठसा उमटवला. अन्याय करणाऱ्यांवर कारवाई केली. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांशी नाते ठेवणारे करकरे आपल्या कर्तव्यात चोख होते. त्यांना त्यांचा पोलिसी गणवेश व देश याविषयी अभिमान होता. दहशतवाद्यांच्या धमक्या येत असताना व कर्मठ हिंदुत्ववाद्यांचे पक्ष त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असताना व त्यांचे सारे कुटुंब दहशतीच्या छायेखाली असतानाही हा बेडर अधिकारी आपल्या कर्तव्याला जागला. त्याने प्राण दिला तोही देशाचे व मुंबईचे रक्षण करताना.

त्याला शाप देण्याची बुद्धी फक्त बुद्धिभ्रष्टांना व देशविरोधी वृत्तीच्या लोकांनाच होऊ शकते. करकरे हे त्यांच्या खात्यातील लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या, मराठी माणसांच्या व देशाच्याही अभिमानाचा विषय होते व आहेत. त्यांची देशभक्ती व दहशतवादाला त्यांनी केलेला विरोध जरा लक्षात घेतला असता तर या साध्वीचे डोकेही ठिकाणावर राहिले असते. साध्वीच्या शापाला पाठिंबा दर्शविणारे पंतप्रधान आणि त्यांचा भाजप देशाच्या संरक्षणाच्या बाजूने आहे की त्याच्यावर हल्ला करणाऱ्या कसाबच्या बाजूने, हा प्रश्न अशा वेळी साऱ्यांना पडावा. साध्वीची बाजू देशविरोधी आणि करकरे यांची बाजू देशभक्तीची आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाNarendra Modiनरेंद्र मोदी