शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

आजचा अग्रलेख : पेपर फुटतातच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 08:18 IST

सार्वजनिक आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या पदभरतीतही लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आल्याने राज्य सरकारच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या पदभरतीतही लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आल्याने राज्य सरकारच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले आहेत. त्यातच या दोन्ही विभागांतील पेपरफुटीमागे काही समान दुवे होते हे समोर आल्याने सरकारी नोकऱ्या लावून देण्यासाठीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची बाबही अस्वस्थता वाढविणारी आहे. आरोग्य विभागाने गट क आणि ड च्या ६ हजार पदांसाठी लेखी परीक्षा घेतली होती आणि त्यासाठी ६ लाखांहून अधिक उमेदवार होते. म्हाडामध्ये ५६५ पदांसाठी २ लाख ७४ हजार इच्छुक होते. म्हाडावर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. 

आरोग्य खात्यातील घोटाळ्याची चौकशी करता करता पोलिसांना या घोटाळ्याची तार म्हाडाच्या परीक्षेशी जुळलेली असल्याचे  पुरावे मिळाले आणि म्हाडाचा परीक्षा घोटाळा उघडकीस आला. आरोग्य खात्यातील परीक्षा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणून खात्याचा सहसंचालक डॉ. महेश बोटले याचे नाव समोर येत असून तो सध्या अटकेत आहे. राज्यातील तीन वैद्यकीय महाविद्यालयांमधील तज्ज्ञ, वरिष्ठ आरोग्य अधिकारी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समितीने दिलेल्या प्रश्नपेढीतून निवडक प्रश्न काढून ते अंतिम करण्यात आले आणि अंतिम केलेले प्रश्न हे परीक्षेचे आयोजन करणाऱ्या न्यासा या कंपनीला देण्याचे काम याच सहसंचालकाकडे होते. त्यांच्या माध्यमातूनच प्रश्नपत्रिकेला पाय फुटले.  

एकीकडे बेरोजगारीची भीषण समस्या! पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार शिपायाची नोकरी मिळविण्याच्या रांगेत उभे आहेत. दुसरीकडे  प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करत नोकरीची आस लावून बसलेल्यांची फसवणूक केली जात आहे. प्रगत महाराष्ट्राला ही बाब शोभणारी नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या क्लासेसचे  लहानमोठ्या शहरांमध्ये सध्या पेव फुटलेले आहे. त्यापैकी काही जण सध्या कोठडीत आहेत, ज्यांना पेपर मिळाले अशा काही उमेदवारांनाही कोठडीची हवा खावी लागली आहे. एकेका विद्यार्थ्याकडून दहा-पंधरा लाख रुपये घ्यायचे, एकत्रित केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम संबंधित अधिकारी वा अन्य घोटाळेबाजांना द्यायची, असे षडयंत्र रचले गेले. कोचिंग क्लासचा गोरखधंदा करणाऱ्यांचा त्यातील सक्रिय सहभागही समोर आला आहे. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांपासून नोकरभरतीपर्यंत कोट्यवधी रुपयांचे डील करून आपला कार्यभाग उरकरणाऱ्यांची यापुढे तसे करण्याची हिंमतच होणार नाही इतकी कठोर कारवाई त्यांच्याविरुद्ध झाली पाहिजे. आरोग्य विभागाच्या परीक्षेची जबाबदारी असलेल्या कंपनीने पारदर्शकतेचा दावा करत हात वर केले असले तरी त्या कंपनीची चौकशी होण्याची गरज आहे. 

म्हाडाच्या परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी ज्या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलाॅजीज कंपनीकडे होती, त्या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, त्याच्याकडे आलेले दलाल यांनाही अटक झाली आहे. आरोग्य विभाग असो की म्हाडा दोन्हींच्या पेपर घोटाळ्यात कुंपणानेच शेत खाल्ल्याचे दिसते. त्यामुळेच या दोन्ही विभागांचे मंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकारी हे त्यांची जबाबदारी झटकू शकत नाहीत. परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्या नेमताना त्यांचा पूर्वेतिहास तपासून घेणे गरजेचे आहे. परीक्षांच्या ढिसाळ आयोजनासाठी यापूर्वी दंड झालेल्या कंपन्या परत कंत्राट मिळवतात; हे कसे? त्यांच्याबाबत घेतल्या गेलेल्या आक्षेपांना केराची टोपली दाखवून मंत्री, अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कंपन्यांना  कंत्राटे दिली जातात, तेवढ्यापुरत्या बातम्या होतात, पण ‘अर्थपूर्ण व्यवहार’ सुरूच राहतात.  परीक्षेच्या आयोजनासाठी सरकार स्वत:ची यंत्रणा उभी करू शकत नाहीत, असे कारण देत खासगी कंपन्यांची मदत घेतली जाते. यापुढे म्हाडा स्वत:च्या परीक्षा  घेईल, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

स्वत:च्या विभागाच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी अवास्तव वाक्ये पेरली जातात; त्यातलेच हे! सर्व भरती परीक्षा एमपीएससीकडे सोपवाव्यात हा विचार बऱ्याच वर्षांपासून कागदावरच आहे. पारदर्शकतेच्या हमीसाठी परीक्षा यंत्रणेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी करणे आणि एकाच व्यक्तीच्या हाती  सर्व चाव्या राहणार नाहीत याची काळजी घेणे असा समन्वय साधावा लागेल. लाखो बेरोजगार तरुण-तरुणींमध्ये प्रचंड रोष आहे.  सरकारी नोकरीत चिकटण्यासाठी आठ-दहा वर्षे  धडपड करणाऱ्या लाखो लोकांची पेपरफूट ही घोर फसवणूकच आहे. या फसवणुकीचे प्रायश्चित्त सरकारी यंत्रणांनी घेतले पाहिजे.

टॅग्स :mhadaम्हाडाexamपरीक्षा