शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

`बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 08:54 IST

शांततामय सहजीवन ही कितीही सुंदर संकल्पना असली तरी, प्रत्यक्षात `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य असल्याचे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

‘‘आमचा देश वाचविण्यासाठी आम्हाला एकटं सोडून देण्यात आलंय. आमच्यासोबत लढायला कोण तयार आहे? प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मला कुणीही दिसत नाही!’’ हे अगतिक उद्गार आहेत, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे! शांततामय सहजीवन ही कितीही सुंदर संकल्पना असली तरी, प्रत्यक्षात `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य असल्याचे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मनुष्य स्वत:ला इतर सजीवांच्या तुलनेत खूप प्रगत समजत असला तरी, जो शक्तिशाली तोच टिकेल, हे प्राणीजगतात लागू पडणारे तत्त्वच एकविसाव्या शतकातही मनुष्यजगतास देखील लागू पडत असल्याचेच ताज्या घटनाक्रमामुळे सिद्ध झाले आहे. 

मनुष्य अजूनही आदिम अवस्थेतून बाहेर पडू शकला नसल्याचेच हे द्योतक! युद्धास तोंड फुटेपर्यंत युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा करणारी अमेरिका व तिचे मित्रदेश, युद्ध सुरू होताच युक्रेनला वाऱ्यावर सोडून मोकळे झाले. त्यामागेही भय ही आदिम प्रेरणाच कारणीभूत होती. विस्तारवादी, साम्राज्यवादी भूमिकांमुळे जगाने अत्यंत विध्वंसक अशी दोन महायुद्धे अनुभवली. त्यापासून धडा घेऊन मनुष्य यापुढे तरी शांततामय सहजीवनाचे तत्त्व अंगिकारेल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरत आहे. ताज्या संघर्षाने त्यावर  शिक्कामोर्तब तर केलेच; पण हा संघर्ष निकटच्या भविष्यात इतरांसाठी प्रेरक ठरण्याची भीतीही निर्माण केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण जग अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये विभाजित झाले. भारत, इजिप्त व युगोस्लाव्हियाच्या पुढाकाराने, त्या दोन्ही गटांशी संलग्न नसलेल्या देशांची अलिप्त राष्ट्र संघटना अस्तित्वात आली होती खरी; पण मुळातच त्या देशांची शक्ती खूप क्षीण होती. अमेरिका व रशिया या दोन्ही देशांच्या नेतृत्वाखालील गटांना एकमेकांविषयी जो भयगंड वाटत होता, त्यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धेस अतोनात चालना मिळाली, पण परस्परांविषयीच्या त्या भयगंडामुळेच तिसऱ्या महायुद्धास तोंड फुटले नाही, हेदेखील तेवढेच खरे! 

गत काही वर्षांत अमेरिकेच्या आर्थिक शक्तीस व जगभरातील प्रभावास जी ओहोटी लागली, त्याची परिणती अमेरिकेबद्दलचा धाक कमी होण्यात झाली. त्याचेच प्रतिबिंब अमेरिका व `नाटो’ देशांच्या इशाऱ्यांना भीक न घालता युक्रेनवर हल्ला चढविण्याच्या रशियाच्या निर्णयात उमटलेले दिसते. अमेरिका व `नाटो’ने काढता पाय घेतल्याने युक्रेन अगदी हतबल बनला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत एक तर संपूर्ण युक्रेन रशियाचा भाग होऊन, अथवा त्याचे दोन तुकडे होऊन, युद्ध संपुष्टात येईल; पण अमेरिका व `नाटो’ची भीती बाळगण्याचे काही कारण नाही, हा जो संदेश गेला आहे, तो खूपच धोकादायक आहे. आजही जगातील काही विस्तारवादी शक्ती इतर देशांच्या भूभागांचा घास घेण्यास टपून बसल्या आहेत, अशा शक्तींना ताज्या घडामोडीमुळे चेव चढू शकतो. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चीन व तैवान! गुरुवारीच चीनची नऊ लढाऊ विमाने आपल्या हवाई हद्दीत घुसल्याचा आरोप तैवानने केला. आतापर्यंत अमेरिका व `नाटो’ तैवानच्या मदतीला धावून येण्याच्या धास्तीमुळे चीनने लष्करी बळाचा वापर करून तैवान बळकावला नव्हता; पण आता चीन किती काळ कळ काढेल, याची शंकाच वाटते. त्याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेने जपानसारख्या ज्या पराभूत देशांना सुरक्षा पुरविण्याचे करार केले होते, त्यांनी आता अमेरिकेवर कितपत विसंबून राहावे, हादेखील प्रश्नच आहे. 

शिवाय युक्रेन घशात घातल्यावर पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघातून फुटून निघालेल्या आणखी काही देशांकडे रशियाची नजर वक्र होण्याचा धोकाही आहेच! चीनच्या सीमेवरील आगळीकींना आणि हिंद महासागरातील विस्तारवादी धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिकेवर आणि `क्वाड’वर कितपत अवलंबून राहायचे, याचा निर्णय भारतालादेखील घ्यावा लागेल. बांगलादेश युद्धाच्यावेळी सोव्हिएत रशियाने भारतासोबतच्या मैत्री कराराचे पालन करीत, भारताला संपूर्ण राजकीय व लष्करी समर्थन दिले होते. अमेरिकेने युक्रेनला सोडले, तसे वाऱ्यावर सोडले नव्हते! गत काही वर्षांपासून भारत-रशिया मैत्रीत अंतर पडत आहे आणि भारत-अमेरिका जवळीक वाढत आहे; मात्र युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नेतृत्वाला उभय महाशक्तींसोबतच्या द्पिवक्षीय संबंधांचा आढावा घ्यावा लागेल. एकंदरीत निकट भविष्यात जगाच्या भौगोलिक-राजकीय चित्रात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाchinaचीन