अहमद अल-शरा. कोण आहे ही व्यक्ती? सिरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज त्यांना ओळखलं जात असलं तरी त्यांची मूळ ओळख आहे ती म्हणजे एकेकाळचा मोस्ट वाँटेड अतिरेकी, अल कायदा या दहशतवादी संघटनेचा सिरिया शाखेेचा प्रमुख. हाच मोस्ट वाँटेड अतिरेकी आज सिरियाचा राष्ट्राध्यक्ष आहे!
त्याहीपेक्षा आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नामचिन अतिरेक्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोस्तीचा हात पुढे केला आहे. ट्रम्प नुकतेच सौदी अरेबियात गेले असताना तिथे त्यांनी अहमद अल शरा यांची भेट घेतली, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि अहमद अल शरा हे युवा, आकर्षक नेते असून इस्रायलशी संबंध सामान्य करण्यापासून ते सिरियातून विदेशी अतिरेक्यांना बाहेर काढण्याचं काम ते करतील, अशा शब्दांत त्यांनी त्यांचं कौतुक केलं.
२५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. अल शरा यांनीही अर्थातच ट्रम्प यांचं कौतुक करताना म्हटलं, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प हे अतिशय सक्षम नेतृत्व आहे. विशेष म्हणजे याच अल शरा यांना याआधी अल जुलानी या नावानं ओळखलं जात होतं. २०११मध्ये सिरीयामध्ये त्यांनी अनेक आत्मघातकी अतिरेकी हल्ले घडवून आणले होते. त्याचमुळे अमेरिकेनं त्यांच्यावर एक कोटी डॉलर्सचं (सुमारे ८५ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केलं होतं.
गेल्या अनेक काळापासून सिरीया हा देश अस्थिर आणि अशांत म्हणून प्रसिद्ध आहे, याचं कारण तिथे सुरू असलेल्या अतिरेकी कारवाया. याच कारणानं अमेरिकेनं या देशावर बंदी घातली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून सिरीयावर लादलेले निर्बंध ट्रम्प यांनी नुकतेच हटवले. अगदी काही महिन्यांपूर्वीही अमेरिकेसाठी ‘मोस्ट वाॅंटेड’ असलेला हा अतिरेकी ट्रम्प यांना इतका प्यारा कसा काय झाला, याचं अनेकांना गूढ वाटतं आहे. सोशल मीडियावर तर याबाबत प्रतिक्रियांचा अक्षरश: पूर आला आहे. अमेरिकेनं सिरियावर सर्वाधिक निर्बंध २०११मध्ये लादले होते. त्यावेळी तिथे गृहयुद्ध सुरू झालं होतं. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारनं विरोधकांचा विरोध चिरडून काढला होता. त्यात हजारो नागरिक मारले गेले होते. सिरियन सरकारनं त्यावेळी आपल्याच नागरिकांना मारण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. जगभरातून त्यावेळी त्यांचा निषेध करण्यात आला होता.
सन २०१९ मध्ये अमेरिकेनं सिरियावरील निर्बंध आणखीच कठोर केले होते. सिरियासोबतचा सर्व व्यापार आणि पैशांचे व्यवहार बंद केले होते. तेल आणि गॅसवर कठोर निर्बंध आणले होते. बँकिंग व्यवहार आणि गुंतवणूक रोखण्यात आली होती. सिरियाला कोणत्याही प्रकारचं लष्करी आणि संरक्षण साहित्य देण्यावर बंदी घालण्यात आली होती.
सिरियावर ‘सिझर ॲक्ट’ लागू करण्यात आला होता, सिरियाला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे सिरियाची अर्थव्यवस्था तब्बल ८४ टक्क्यांनी आखडली. सिरियातली ९० टक्क्यांपेक्षाही अधिक लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली गेली. असं असतानाही ट्रम्प यांना सिरिया आणि तिथला ‘मोस्ट वाँटेड’ अतिरेकी यांच्याविषयी अचानक प्रेम का वाटायला लागलं, याविषयी सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे.