डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी जगाला अक्षरश: सळो की पळो करून सोडलं आहे. आपली मनमानी करताना सारासार विवेकही त्यांनी चव्हाट्यावर बसवला आहे. लोकांना नैतिकतेचे धडे देणारे ट्रम्प मात्र कधीच धुतल्या तांदळाचे नव्हते, नाहीत. अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक संपत्तीत किती प्रचंड वाढ झाली याचे आकडे आता बाहेर येत आहेत.
आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा (गैर)वापर करून त्यांनी आपला फॅमिली बिझिनेस प्रचंड प्रमाणात वाढवला. केवळ एका वर्षात त्यांची संपत्ती सुमारे १३ हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. जगभरात त्यांचे कोट्यवधी डॉलर्सचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर तर सुरू केलंच, पण त्याचा भार उलट अमेरिकन ग्राहकांवरच पडला. याच काळात त्यांचं स्वत:चं उखळ मात्र चांगलंच पांढरं झालं. गेल्या वर्षभरात ट्रम्प यांची संपत्ती किमान १२,८१० कोटी रुपयांनी वाढली, मात्र त्यांची खरी कमाई याहून कितीतरी जास्त असू शकते, कारण ज्या ज्या उद्योगांतून त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले, त्यातले बरेचसे आकडे अजून सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, भारतात ‘ट्रम्प ब्रँड’चे किमान आठ प्रोजेक्ट सुरू आहेत किंवा नियोजित आहेत. यामध्ये रेसिडेन्शियल टॉवर्स, कमर्शियल स्पेस आणि इतर प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या ताकदीचा वापर करून स्वतःचा आणि कुटुंबाचा प्रचंड फायदा करून घेतला. ट्रम्प परदेशी सरकारं आणि कंपन्यांसोबत असे व्यवहार करत आहेत, ज्यातून त्यांच्या कुटुंबाला थेट पैसा मिळतो. ट्रम्प यांच्या कमाईचा मोठा हिस्सा परदेशातील रिअल इस्टेट प्रोजेक्ट्समधून आला आहे. ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’ वीसपेक्षा जास्त परदेशी प्रोजेक्ट्स चालवत आहे. ‘ट्रम्प’ नावाचं लायसन्स देऊन त्यांनी सुमारे २१० कोटी रुपये कमावले, ज्यात ओमानमधील लक्झरी हॉटेल आणि सौदी अरेबियातील गोल्फ कोर्सचा समावेश आहे.भारतामधला पहिला ट्रम्प-ब्रँडेड कमर्शियल प्रोजेक्ट पुण्यातील ट्रम्प वर्ल्ड सेंटर आहे. यातून ट्रम्प यांना २८९ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई होण्याचा अंदाज आहे. गुरुग्राममध्ये रेसिडेन्शियल आणि हॉटेल प्रोजेक्ट्स लिस्टेड आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारताला ‘डेड इकॉनॉमी’ म्हटलं होतं. मात्र, नफा कमावण्यासाठी भारतातली त्यांची वैयक्तिक गुंतवणूक मात्र वाढते आहे.
मागील वर्षी अमेरिकेनं व्हिएतनामवर ४६ टक्के टॅरिफ लावलं होतं. टॅरिफ कमी करण्याच्या बदल्यात ट्रम्प ऑर्गनायझेशनला हनोईमध्ये दीड अब्ज डॉलर्सचा गोल्फ प्रोजेक्ट सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यासाठी कायदेही बाजूला ठेवण्यात आले. ट्रम्प ऑर्गनायझेशन व्हिएतनामच्या हनोईमध्ये आणखी एक गोल्फ प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प यांची सर्वात मोठी कमाई क्रिप्टो करन्सीतून झाली आहे. गेल्यावर्षी त्यांच्या कुटुंबाशी संबंधित वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल कंपनी आणि एका मीम कॉइनमधून त्यांना किमान ८६७ दशलक्ष डॉलर्स मिळाले. ही यादी आणखी कितीही वाढू शकते..
Web Summary : Donald Trump's family wealth surged by ₹13,000 crore in a year, exploiting his presidency. Deals, especially in real estate across countries like India and Vietnam, fueled this growth. He profited from projects including golf courses and cryptocurrency ventures, raising ethical questions.
Web Summary : डोनाल्ड ट्रंप के परिवार की संपत्ति में एक साल में ₹13,000 करोड़ की वृद्धि हुई, जो उनके राष्ट्रपति पद के इस्तेमाल से हुई। भारत और वियतनाम जैसे देशों में रियल एस्टेट सौदों ने इस वृद्धि को बढ़ावा दिया। उन्होंने गोल्फ कोर्स और क्रिप्टोकरेंसी परियोजनाओं से लाभ कमाया, जिससे नैतिक सवाल उठे।