संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे
दादासाहेब कडक शिस्तीचे शिक्षक होते व मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. दादासाहेब यांनी त्यांना मिळणाऱ्या वेतनात काटकसरीने (दात कोरून नव्हे) संसार केला. कधी कुणाला काही कमी पडू दिले नाही. दादासाहेब नोकरी करायचे तेव्हा त्यांच्याकडे कपड्याचे दोन जोड होते. दोन दिवस एक शर्ट-पँट वापरला तर तो धुऊन ते दुसरा वापरायचे. कपड्याचा तिसरा जोड त्यांनी कधी शिवला नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांच्या नातवाने त्यांच्या हातात ब्रँडेड नवा कोरा शर्ट व पँट ठेवली तेव्हा त्यांना याची आठवण झाली.
दादासाहेबांनी नातवाला हाताला धरून आपल्या खोलीत नेले. वॉडरोब उघडला तर तेथे किमान डझनभर शर्ट-पँट हँगरला लटकले होते. तीन ब्लेझर होते. यापैकी किमान चार तरी शर्ट-पँट आपण अजून अंगावर चढवले नसताना हा नवा कपड्यांचा जोड कशाला आणला, असा सवाल दादासाहेब यांनी नातवाला केला. मुलाने आणि नातवाने लग्नकार्यात बळेबळे अंगावर चढवलेल्या ब्लेझरला असाच एक किंवा दोनवेळा कायास्पर्श झाला होता. लागलीच नातू म्हणाला की, “आब्बा, आता तुमची ती जुनी कॅसेट वाजवू नका. मला माहीत आहे तो सारा इतिहास. पण, दिवाळीत कुठे बाहेर जायचे तर तेच ते कपडे घालणे शोभत नाही आपल्याला.” त्यावर दादासाहेब गालातल्या गालात हसले. आजोबा आणि नातवाची ही स्टोरी कुठल्याही उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.
दादासाहेब हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या मुलाला इलेक्ट्रिकल इंजिनीअर केले. तो एका मोठ्या कंपनीत उच्चपदावरून अलीकडेच निवृत्त झालाय. आता त्याने कन्सल्टिंग फर्म सुरू केलीय. त्याचा मुलगा आयटी इंजिनीअर झाला. काही काळ मोठ्ठ्या पॅकेजची नोकरी केल्यावर आता त्याने स्वत:चा बिझनेस सुरू केलाय आणि अल्पावधीत प्रचंड यश मिळवलेय. दादासाहेबांच्या नातवाची बायको श्रीमंत घरातली. ती वकील झालीय आणि तिनेही अल्पावधीत हायकोर्ट, सुप्रीम कोर्टातील नामांकित वकिलांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. कधीकाळी चाळीत व वनरूम किचनमध्ये संसार केलेले दादासाहेब आता आलिशान बंगल्यात राहतात. दरवाजात पाचेक मोटारी झुलत असतात.
देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर एका विशिष्ट वर्गाला त्याचे प्रचंड लाभ झाले. दसरा-दिवाळीचा सण येतो तेव्हा दागिन्यांपासून बूट-चपलांपर्यंत आणि फ्लॅटपासून दुचाकींपर्यंत असंख्य वस्तूंचा ग्राहक हाच वर्ग असतो. वेगवेगळ्या ऑफर्स, कर्जाचे आमिष, दागिन्यांच्या घडनावळीवर सूट, अमुकवर तमुक फ्री हे सारे याच उच्च मध्यमवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून केले जाते. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘बाय नाऊ’ ही वेबसिरीज आली होती. त्यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता कंपन्या कशा जाळे फेकतात, ग्राहक त्यांच्याकडे असलेल्या वस्तूच परत परत कशा खरेदी करतात, अगोदरच्या फारशा खराब न झालेल्या किंवा दुरुस्तीयोग्य वस्तू कशा फेकून देतात, याचे डोळ्यात अंजन घालणारे चित्रण केले होते.
यंदा दिवाळीच्या तोंडावर जीएसटीत केंद्र सरकारने मोठी सवलत दिली व जीएसटी उत्सव सुरू झाला. त्यामुळे वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकरिता दुकानांत, बाजारपेठेत अक्षरश: झुंबड उडाली होती. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग पार धुऊन निघालेला असल्याने सरकारी आर्थिक मदतीची वाट पाहत असला तरी शहरात त्याच्या विपरीत चित्र होते. अर्थात शहरातील या ‘ग्राहका’ने सणासुदीच्या निमित्ताने बरीच खरेदी केल्याने पुराच्या पाण्यात कपडे वाहून गेलेल्यांना दिवाळीत अंगावर घालण्याकरिता चांगल्या स्थितीमधील कपडे पुरवले गेले. एकेकाळी टीव्हीवर चित्र दिसणे बंद झाल्यावर आपण टीव्ही खरेदी करीत होतो. आता अधिक जास्त मोठा टीव्ही खरेदी करण्याकरिता अगोदरचा वापरयोग्य टीव्ही आपण देऊन टाकतो.
मोबाइलचे तेच आहे. १० वर्षांपूर्वी तेव्हाच्या डिझाईनचा केलेला सोन्याचा हार मोडून नव्या डिझाईनचा हार अगदी सहजपणे केला जातो. दहा ते बारा वर्षे चालवलेली मोटार (खरे तर, सर्वाधिक काळ ती बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच उभी होती) चुटकीसरशी विकून आपण वेगवेगळ्या सुविधा असलेली नवी प्रशस्त सनरुफ असलेली मोटार दारात आणून उभी करतो. दादासाहेबांचा विचार तत्कालीन आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी कालसुसंगत होता. दिवाळीत इतकी प्रलोभने असताना तुमच्यातील ग्राहक स्वस्थ कसा बरं बसेल? sandeep.pradhan@lokmat.com
Web Summary : An article reflects on consumerism during Diwali, contrasting frugal past generations with today's affluent buyers driven by offers and trends. It questions discarding usable items for upgrades, fueled by economic liberalization and marketing tactics.
Web Summary : एक लेख में दिवाली के दौरान उपभोक्तावाद पर प्रकाश डाला गया है, जिसमें मितव्ययी पिछली पीढ़ियों और आज के समृद्ध खरीदारों के बीच तुलना की गई है, जो ऑफ़र और रुझानों से प्रेरित हैं। यह आर्थिक उदारीकरण और विपणन रणनीति द्वारा संचालित अपग्रेड के लिए उपयोगी वस्तुओं को त्यागने पर सवाल उठाता है।