- राजदीप सरदेसाई(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)प्रिय देवेन्द्रजी, खरं तर पुढील महिन्या तुमच्या मुख्यमंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने हे पत्र आपले अभिनंदन करण्यासाठीच लिहायला हवे होते. पण महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसातील घटना लक्षात घेता आजचा काळ कोणताही उत्सव साजरा करण्याचा नसून जरा अंतर्मुख होऊन विचार करण्याचा आहे. ‘आदर्श’ घोटाळ्यावरील एका चित्रवाहिनीच्या चर्चेत तुम्ही सहभागी झाला होता, तेव्हां म्हणजे २०१०च्या सुमारास मी सर्वप्रथम तुम्हाला बघितले. चर्चा करण्याचे तुमचे कौशल्य आणि भ्रष्टाराबाबत कोणतीही तडजोड न करण्याची तुमची वृत्ती पाहून मी अत्यंत प्रभावित झालो होतो. साहजिकच गेल्या वर्षी जेव्हां तुम्ही मुख्यमंत्री बनलात, तेव्हां ते एक सुचिन्ह असल्याची माझी धारणा बनली होती. ज्या राज्याचे राजकारण पाताळयंत्री आणि भ्रष्ट राजकारण्यांमुळे बरबटून गेले आहे, त्या राज्यात नव्या कल्पना आणि नवी ऊर्जा धारण करणाऱ्या ४४ वर्षाच्या एका तरुण मुख्यमंत्र्याचे येणे जनतेच्या आशा पल्लवीत करणारे होते. परंतु दुर्दैवाने केवळ वर्षभरापूर्वी जे स्वर तुमच्या कौतुकाचे होते, तेच आता नकारात्मकतेने ठासून भरले जाऊ लागले आहेत.मी तुमच्या अलीकडील केवळ तीनच निर्णयांचा उल्लेख करणार आहे. पहिला म्हणजे चुकीच्या सल्ल्यावरुन चार दिवस मुंबईत मासविक्री बंदी लागू करणे. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्व काळात तुमच्या पूर्वसुरींच्या राजवटीतही मुंबईत अशी बंदी लागू केली जात असे. पण तुमच्या सरकारने ही बंदी थेट मीरा-भाईंदरपर्यंत वाढविली आणि लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आणली. त्यातून तुमच्या सरकारवर जी टीका झाली, ती टाळता येण्यासारखी होती.आधी गोमांसबंदी आणि आता ही सर्वंकष मासबंदी. कशासाठी हे शासन नियंंत्रणाऐवजी खाद्यपदार्थ नियंत्रण? महाराष्ट्रातील मोजके ब्राह्मण वगळले तर बाकी सारे मांसाहारीच आहेत हे तुमच्या निर्णयाच्या विरुद्ध शिवसेना आणि मनसे यांनी जे आंदोलन केले, त्यावरुन स्पष्ट झाले. तुम्ही एक स्वयंसेवक आहात आणि तुमच्या कुटुंबाचा रा.स्व.संघाशी निकटचा संबंध आहे व संघाचा तुम्हाला अभिमान वाटतो, हे मी जाणतो. पण संघाची कार्यक्रम पत्रिका राबविण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या नावाखाली थेट लोकांच्या आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकानी तुम्हाला निवडून दिलेले नाही. तुमचा दुसरा निर्णय अधिकच काळजी आणि चिंता निर्माण करणारा. अगदी थोड्याच दिवसात ज्यांची बढती होणार होती, ते मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तुम्ही अचानक बदली केली. शीना बोरा प्रकरणाचा तपास करीत असतानाच ही बदली झाल्याने तर संशय अधिकच घट्ट झाला. त्या प्रकरणात मारिया यांनी घेतलेल्या स्वारस्यावर चर्चा नक्कीच होऊ शकते, परंतु त्यांच्या बदलीमुळे पोलीस दलातील अगदी शिपायापर्यंत अगदी चुकीचा संदेश गेला. तुमच्या या निर्णयावरही माध्यमातून प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर मारिया गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदावरुनही शीना बोरा प्रकरणाचा तपास जारी ठेवतील, असे तुमच्या सरकारने जाहीर केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात बदल्यांचे जे कारखाने चालवले जात होते, त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला जबर हादरे बसले होते पण तुमच्या निर्णयाने तर या दलाच्या नीतीधैर्याचेच खच्चीकरण झाले.तुमच्या सरकारचा तिसरा निर्णय म्हणजे राजद्रोहाच्या गुन्ह्यासंबंधी तुम्ही पोलिसांसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्वे. ‘लोकप्रतिनिधी (किंवा सरकारचा प्रतिनिधी) यांच्यावर शब्द, चित्र किंवा अन्य मार्गांनी केलेली टीका हा राजद्रोह ठरेल’, असे हे मार्गदर्शक तत्त्व म्हणते. याचा अर्थ, मी सरकारवर टीका केली तर माझ्यावरही राजद्रोहाचा खटला भरला जाईल? आपण सरकार विरुद्धची टीका आणि राष्ट्रविरोधी कारवाई यांची गल्लत तर करीत नाही? तुमच्या आधीचे सरकार माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ चा गैरवापर करीत असल्याबद्दल तुम्हीच तर तीव्रतेने सरकारवर आघात करीत होता ना? खरे तर आज आता तुमच्या सरकारचे संपूर्ण लक्ष राज्यातील कृषी क्षेत्रावर कोसळलेल्या संकटावर केन्द्रीत व्हावयास हवे. पण अकारणच्या वादविवादांमुळे आपली तिकडे डोळेझाक होते आहे. आधी विदर्भ आणि आता मराठवाडा दुष्काळी परिस्थितीच्या तोंडापाशी जाऊन पोहोचला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पुरेसे पिण्याचे पाणी नसल्याने टँकर माफिया जोमात धंदा करीत आहेत. त्यातच गोहत्त्या बंदीमुळे शेतकरीे त्यांच्याकडील निकामी पशुधनसुद्धा विकू शकत नाही. मागील आठवड्यात चित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात माझ्यासोबत अभिनेते नाना पाटेकर होते. आत्महत्त्या केलेल्या १०० शेतकऱ्यांच्या विधवांना त्यांनी नुकतीच आर्थिक मदत केली व तेव्हां ते म्हणाले होते की, अशा परिस्थितीपायी कुणाचाही जीव जाऊ नये. दुर्दैवाने शासकीय यंत्रणा पाहिजे तितक्या गतीने कामाला लागलेली दिसत नाही. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी ७० हजार कोटी मंजूर करण्यात आले पण त्यातून सिंचनाखालील जमिनीत केवळ ०.१ टक्का भर पडली. सिंचन प्रकल्पांचे हे अपयश व त्यातील भ्रष्टाचार हाच तर तुमच्या प्रचाराचा मुद्दा होता आणि घोटाळेबाजांना शिक्षा करण्याचे वचनही तुम्ही दिले होते. याबाबत अद्याप काहीही घडलेले नाही. आपल्या पंतप्रधानांसारखेच तुम्हीही मागील वर्षभरात सतत दौऱ्यावर होतात. तुम्ही जगभरात अनेक ठिकाणी भेटी दिल्या. मी तुम्हाला अशी विनंती करू शकतो का, की पुढचे काही महिने तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी घालवा? मी जेवणात काय खावे किंवा शीना बोरा प्रकरणात काय होईल याची चिंता करू नका. शेतकऱ्यांच्या चिंता आणि दुरवस्था जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच शांत झोप लागणार नाही. ताजा कलम- तुमच्या शासनाच्या काही चुकांकडे बोट दाखविताना मी असेही म्हणेन की चटपटीत बातम्यांच्याच मागे असणारी माध्यमेदेखील तितकीच दोषी आहेत. आत्महत्त्येस प्रवृत्त होऊन तशी कृती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथांपेक्षा माध्यमांना स्वार्थाने बरबटलेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये अधिक स्वारस्य होते.
‘देवेन्द्रजी, भ्रमनिरास केलात हो तुम्ही’!
By admin | Updated: September 18, 2015 03:18 IST