शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

फडणवीस आले, गडकरी गेले; याचा अर्थ काय?

By यदू जोशी | Updated: August 19, 2022 12:40 IST

Devendra Fadnavis and Nitin Gadkari : पंतप्रधानपदाचे मराठी माणसाचे स्वप्न गेली कितीतरी वर्षे अधुरेच राहिलेले आहे. कदाचित फडणवीसच ते पूर्ण करतील! ...उम्मीद पे दुनिया कायम है!!

- यदु जोशी(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील; पण, समजा उद्या ते दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं नितीन गडकरी नागपुरातील बावनकुळेंच्या सत्कारात म्हणाले. त्यानंतर आठच दिवसात भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी बाहेर गेले आणि फडणवीस समितीत आले. फडणवीस यांचा  दिल्लीत जाण्याचा हा आणखी पुढचा टप्पा आहे. २०२४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार बसवण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण झाला तर त्यानंतर दीड-दोन वर्षात ते दिल्लीत जातील. पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळण्याची पूर्ण पात्रता आणि भाजप कार्यकर्त्यांची अतीव इच्छा त्यांच्या पाठीशी आहेच.  कदाचित, महाराष्ट्रातील यशाचे बक्षीस म्हणून त्यांना दिल्लीत लगेच मोठे  मंत्रिपद दिले जाईल. 

- यावेळी हाती आलेले त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा त्याचे अनेक अर्थ काढले गेले. २०२४ मध्ये पुन्हा तसेच तर नाही होणार? पण एक नक्की की फडणवीस कालही थांबले नव्हते, आजही थांबलेले नाहीत आणि उद्याही थांबणार नाहीत. भाजपच्या आणि विशेषत: मोदींच्या ७५ वर्षांच्या नियमानुसार त्यांना आणखी २३ वर्षांची बॅटिंग करायची आहे. सध्या वानखेडेच्या पिचवर खेळताहेत; उद्या फिरोजशहा कोटलावर फटकेबाजी करतील. केवळ राज्यापुरते मर्यादित राहणारे हे नेतृत्व नाही. आवाका अफाट आहे. भविष्यात ते दिल्लीला आणि दिल्ली त्यांना खुणावत राहील. 

मराठी माणसाने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करावे, हे स्वप्न कधी यशवंतराव चव्हाण, शरद पवार तर कधी प्रमोद महाजनांमध्ये महाराष्ट्राने पाहिले खरे, पण पूर्ण झाले नाही. गडकरींबाबतही मध्यंतरी ते स्वप्न पडले  आणि अजूनही अर्धवट झोपेत दिसत राहाते.. पंतप्रधानपदाच्या अपूर्ण स्वप्नांचे पांघरूण मराठी माणसाच्या अंगावरून काही निघत नाही. कदाचित फडणवीसांच्या रुपाने ते आज ना उद्या निघेल. उम्मीद पे दुनिया कायम है. 

अनेक जण म्हणत आहेत की, गडकरींचा पत्ता कापला गेला. त्यात थोडेबहुत तथ्य असेल, पण ते पूर्ण सत्य नाही. सायकल अन् कारची धडक झाली की लोकांना सायकलवाल्याबद्दल सहानुभूती असते, चुका या कारवाल्याच्याच शोधल्या जातात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार ज्यांनी आपल्यात बदल केले त्यांना यश आले.  हा नियम राजकीय पक्षांनाही लागू  आहे. आज तो गडकरींना लावला, उद्या संघ, परिस्थिती आणि कदाचित भाजपमधूनही तो मोदी-शहांनादेखील लावला जाईल. बदलांची प्रक्रिया कुणाजवळही जाऊन थांबू शकते. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. 

वर्षानुवर्षे त्याच त्या चेहऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या पक्षाची काँग्रेस होते. भाजपने बदल केले म्हणून नवीन नेतृत्वाला संधी मिळत गेली. उत्तर प्रदेशात योगी, महाराष्ट्रात फडणवीस ही त्याचीच उदाहरणे आहेत. आपल्याला वाटते की, गडकरींना अचानक डावलले, पण ते तसे नाही; त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय झाला, अशी माहिती आहे. एक मात्र नक्की की मोदी, शहा आणि गडकरींमध्ये कुठेतरी काहीतरी कटुता आहे अन् त्यातूनच हे घडले असावे, असे अगदी भाजपच्याही कार्यकर्त्यांना वाटते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपची तिकिटे वाटण्यात महत्त्वाची भूमिका असेल. नियती अशी अजब असते. तिकीट कापले गेले तेव्हा बावनकुळे सैरभैर झाले होते, डोळ्यांत पाणी होते, नशिबाला दोष देत होते, आज त्याच नशिबाने त्यांना साथ दिली आहे. 

‘गर्दिश मे नसीब के सितारे हो गये, सब जख्म फिर से हरे हो गये’ असा सुखद अनुभव त्यांना आला. फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांनी नाराजीचा सूर लावला नाही, बावनकुळेंचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी नेतृत्वाऐवजी नशिबाला दोष दिला. दोघेही आज टॉपवर आहेत, हे पाहता थोडे काही मिळाले नाही की लगेच आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांंनी संयमाची गोळी खाऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तशी गरज कमी महत्त्वाची खाती मिळालेल्या राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनादेखील आहे. केवळ टीव्हीवर बोलून राजकारण होत नसते, पक्षाला रिझल्ट द्यावे लागतात आणि ते देणार नसाल तर पक्षाला गृहित धरू नका, असा स्पष्ट संदेश पक्षश्रेष्ठींनी यानिमित्ताने दिला आहे.

जाता जाता  मंत्रिमंडळात आपला पत्ता कटू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजपचे तीन नेते दिल्लीत गेले होते. त्यापैकी एक जण जेव्हा भाजपच्या महानेत्याकडे गेले तेव्हा त्या महानेत्याने मंत्रिपद जाण्याची भीती दाटलेल्या त्या नेत्याला विचारले, कैसे है आपके वह देशपांडे (पीएस); क्या कर रहे है आजकल? ...अरे बापरे! आपल्या महानेत्याला तर आपले सगळेच माहिती आहे; अगदी देशपांडेसुद्धा!  हे लक्षात आल्याने तो नेता बिचारा जागीच थिजला म्हणतात. - तुम्ही इकडे कितीही महाजनकी करा, तुमची कुंडली दिल्लीत लिहिलेली असते, याची प्रचिती देणारा हा थरारक अनुभव आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस